निर्धारित वेळेपूर्वीच बाजी मारली
| मुंबई | प्रतिनिधी |
गवंडी वडीलांनी मुलीची कुस्तीची आवड जपण्यासाठी त्यांनी हातउसने पैसे घेतले. मुलीच्या बक्षिसातून ते फेडता येईल, याची त्यांना खात्री होती. तो वडिलांचा विश्वास मुलीने सार्थ ठरवला. 17 वर्षांखालील गटाच्या आशियाई कुस्तीच्या स्पर्धेत मुलींमध्ये ऋतुजा गुरवने भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय चाचणी स्पर्धेत सोनेरी यश मिळवून भारतीय संघात स्थान मिळवलेल्या ऋतुजाने आपला उच्च दर्जा अंतिम लढतीत अधोरेखित केले. तिला या स्पर्धेत आठवे मानांकन होते. मात्र, तिने तिसरे मानांकन असलेल्या उझबेकिस्तानच्या माशखुरा अब्दुमुसाएवा हिला 11-0 असे पराभूत करीत निर्धारित वेळेपूर्वीच बाजी मारली. त्यापूर्वी ऋतुजाने उपांत्य फेरीत आशियाई महिला कुस्तीत ताकद असलेल्या जपानच्या कोहारू अकुत्सूला 4-2 असे हरवले होते.
ऋतुजाने सुरू केलेला धडाका तिच्या सहकाऱ्यांनी कायम राखला. महिला कुस्तीगिरांनी पहिल्या दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके जिंकली आहेत. मनीषाने 69 किलो गटातील आपले अव्वल मानांकन सिद्ध करताना चीनच्या जिआक्वी झूला निर्णायक लढतीत 8-0 असे पराभूत केले. चेस्ता 40 किलो गटाच्या अंतिम लढतीत शोखिस्ता शोनाझारोवाच्याविरुद्ध 2-4 अशी पराजित झाली. तिना पुनिया 61 किलो गटाच्या विजेतेपदाच्या लढतीत काहीशी दुर्दैवी ठरली. तिला शैदार मुकातच्याविरुद्ध अखेरचा गुण गमावल्यामुळे सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले.
गवंडी पित्याच्या कष्टाचं चीझ
ऋतुजाचे वडील संतोष हे कोल्हापूरचे असून ते गवंडीकाम करतात. ऋतुजाला लहानपणापासून स्पर्धा करण्याची सवय होती. ती मुलांसोबतही कुस्ती खेळायची. त्यामुळे ऋतुजाची आवड तिच्या वडीलांनी जोपासली. ऋतुजाच्या प्रगतीसाठी त्यांनी तिला साथ दिली. तिच्या सरावासाठी काहींकडून मदत घेतली, तर, काहींनी हातउसने पैसे दिले. राज्य संघटनेनेही मदत केली. मात्र, तरीही पैसे कमी पडत होते. गेल्या वर्षी 15 वर्षांखालील गटाच्या आशियाई कुस्तीतील स्पर्धेत ऋतुजारे रौप्यपदक जिंकले होते. त्या बक्षिसातून हातउसने घेतलेले पैसे फेडू शकलो. ऋतुजा रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर करण्यासाठी खूप मेहनत घेत होती. आत्ताही स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी काही जणांकडून पैसे घेतले आहेत. ते आता लवकरच फेडणार हा विश्वास आहे, असे ऋतुजाचे संतोष यांनी सांगितले.






