वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू
पत्रकार परिषदेत कोल्ही-कोपर भूमीपुत्रांचा एल्गार
। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या आमिषाला बळी पडून आपली पिकती सुपीक जमीन व सुस्थितीत असलेली घरेदारे सिडकोला तुटपुंज्या दरात बहाल केल्यानंतर सिडकोने योजना दाखवून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. साडेबावीस टक्के जमीन देण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष साडेबारा टक्केच जमीन देऊन दहाटक्के मोबदला देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात साडेबारा टक्के जमीन मिळण्याऐवजी पावणे आठ टक्केच जमीन भूमीपुत्रांच्या वाट्याला आली असून सिडकोने भूमीपुत्रांची घोर फसवणूक केली आहे. या संदर्भात बुधवारी (दि.22) कोल्ही-कोपर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात भूमीपुत्रांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या झालेल्या फसवणुकीचा पाडा वाचला.
या पत्रकार परिषदेला पंचकमिटीचे मोहन नाईक, धनराज भोईर, सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, मनखुश नाईक, जनार्दन करावकर, बाळराम नाईक, महेंद्र नाईक, राहुल नाईक, तान्हाजी भोईर, हृषीकेश भोईर, गंगाराम नाईक, कृष्णा नाईक, प्रल्हाद नाईक, बबन घरत, राम पाटील, कृष्णा भोईर, अमृत भोईर, मधुकर भोईर, प्रभाकर नाईक, हरिभाऊ नाईक, काशिनाथ भोईर, रोहिदास पाटील, शंकर डोंगरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी येथील गाव कमिटीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिडकोच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. यासंदर्भात सिडको विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा एल्गारही यावेळी करण्यात आला. येथील प्रकल्पबाधित गाव कमिटीने सांगितले की, आमची घरे उठविल्यानंतर आम्हाला अठरा महिन्यांचे घरभाडे देण्याचे सिडकोने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात बारा महिन्यांचे घरभाडे देण्यात आले असून आज साडेचार वर्षे उलटूनही अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक भाड्याच्या घरातच राहत आहेत. यासंदर्भात सिडकोच्या संबंधित अधिकार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा व पत्रव्यवहार करून सुद्धा सिडको आम्हा भूमीपुत्रांना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उपस्थित भूमीपुत्रांनी सांगितले. यामुळे कोल्ही कोपर ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून या लढ्यात सिडकोने जर पोलीसबळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही दबणार नाही. त्याचबरोबर या विभागातील सिडकोची होणारी सर्व विकास कामेही बंद करण्याचा इशाराही यावेळी भूमीपुत्रांनी दिला.