मासेमारी बंदी रोखण्यासाठी कोळी बांधवांची मागणी

| उरण । वार्ताहर ।

पावसाळी मासेमारीस बंदी असतानाही उरणमध्ये मत्स्यव्यवसाय अधिकारी वर्गाच्या आर्थिक हितसबंधातून मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असते. याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रारी करूनही अधिकारी वर्ग आर्थिक हितसबंधातून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. त्यामुळे बंदी काळात मासेमारी जोरात सुरू असते. हे टाळण्यासाठी मच्छीमार बोटींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर नक्कीच त्याचा फायदा पावसाळी बंदी काळात होईल असा विश्‍वास पारंपरिक मच्छीमार बाधवांकडून व्यक्त केला जात आहे.

पर्सनेट मासेमारीस बंदी असतानाही आजतागायत पर्सनेट मासेमारी उरण परिसरात जोरात सुरू आहे. उरणमधील करंजा व मोरा बंदरात नांगरून उभ्या असलेल्या बोटींवर पर्सनेटसाठी लागणारे साहित्य अधिकारी वर्गाच्या निदर्शनास येऊनही ते याकडे आर्थिक लालसेपोटी दुर्लक्ष करीत आहेत. फक्त कागदावरच हे अधिकारी वर्ग पर्सनेट व पावसाळी मासेमारीस बंदी असल्याचे उपदेशाचे डोस देण्याचे काम करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते.

1 जून पासून माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारीस बंदी असते. ही बंदी फक्त दाखविण्यासाठीच असते, प्रत्यक्षात बंदीच्या काळातच मासेमारी जोरात सुरू असल्याचे चित्र उरण परिसरातील करंजा व मोरा बंदरात प्रामुख्याने पहावयास मिळते. यामध्ये करंजा, मोरा येथील नामांकित मच्छीमार संस्थेचे चेअरमन व इतर पदाधिकारी यांच्याच बोटी प्रामुख्याने मासेमारी करून हेच पदाधिकारी बाजारात मासळी विक्री करीत असतात. यावेळी मत्स्यविभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन आपला पॉकेटमनी घेऊन पावसाळी मासेमारीस एकप्रकारे सहकार्य करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते.

पावसाळी मासेमारी सुरू असल्याची लेखी तक्रार मत्स्यविभाग आयुक्त अतुल पाटणे यांच्याकडे करूनही त्यांनी कोणतीही कारवाई आजतागायत केलेली नाही. तसेच उरणमधील मत्स्यविभाग अधिकारी, अलिबाग मत्स्यविभाग अधिकारी हेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यावरून त्यांचे आर्थिक हितसंबध असल्याचे उघड होत आहे. पावसाळी माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारीस बंदी असते, परंतु ही बंदी फक्त कागदोपत्री असते प्रत्यक्षात धनदांडगे मच्छीमार बांधव व मत्स्यविभाग अधिकारी यांचे आर्थिक साटेलोट असल्यामुळेच उरणमध्ये पावसाळी मासेमारी व बाराही महिने पर्सनेट मासेमारी सुरू असल्याचे चित्र उरणमध्ये पहावयास मिळते असे हातावर पोट असणारे पारंपरिक मच्छीमार बांधव सांगतात. हे टाळण्यासाठी मच्छीमार बोटींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर नक्कीच उघड होईल असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version