कोळीवाडा प्रिमिअर लीग उत्साहात

अक्षया प्रशांत नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण
। अलिबाग । वार्ताहर ।

अलिबाग येथील कोळीवाड्यात सागर किनारा मित्र-मंडळ आयोजित कोळीवाडा प्रिमिअर लीग – 2022 ही क्रिकेट स्पर्धा 5 व 6 फेब्रुवारी या दोन दिवसात अतिशय उत्साहात संपन्न झाली. 6 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण अक्षया प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अनिल चोप्रा, पिंट्या ठाकुर व सागर किनारा मित्रमंडळाचे सर्व अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सागर किनारा मित्र-मंडळ आयोजित कोळीवाडा प्रिमिअर लीग – 2022 या स्पर्धेत आर्वी अ‍ॅड प्रांजल इलेव्हन, कियारा प्रित पुरस्कृत शौनक इलेव्हन, गार्विक भगत, सिद्धेश इलेव्हन, राहुल स्पोर्ट्स, मल्हार फायटर्स, साहील इलेव्हन, कै. परशुराम सारंग पुरस्कृत झेंब्या टायगर्स अशा एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आर्वी अँड प्रांजल इलेव्हन या संघाने प्रथम क्रमांकचे पारितोषिक पटकाविले असून त्यांना 44 हजार 444 रूपयांचे रोख पारितोषिक व प्रियांशू योगेश पाटील यांच्यातर्फे बोकड मिळाला आहे. तर, या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक कियारा प्रित पुरस्कृत शौनक इलेव्हन या संघाने पटकाविले असून त्यांना 22 हजार 222 रूपयांचे रोख पारितोषिक मिळाले आहे.
या क्रिकेट स्पर्धेचा मालिकावीर हा सन्मान सागर तांडेल (आर्वी अँड प्रांजल इलेव्हन संघ) याने पटकाविला असून उत्कृष्ट गोलंदाज मयुरेश पोरे (कियारा प्रित पुरस्कृत शौनक इलेव्हन संघ) तर उत्कृष्ट फलंदाज रोहीत पाटील (आर्वी अँड प्रांजल इलेव्हन संघ) यांना मिळाले आहे.
तसेच कोळीवाडा प्रिमिअर लीगचे समालोचन काका पाटील (विद्यानगर) व प्रितेश पाटील (झिराड) यांनी केले. या सामन्याचे गुणलेखक विराज सखे (नवगाव) हे होते तर पंच समीर ठाकुर (रसायनी), प्रणव लबडे (रसायनी), विक्रांत ठाकुर (रसायनी) हे होते. तसेच दोन दिवस सुरू असणार्‍या या सामन्यांना ऑनलाईन पद्धतीने जवळपास 182 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचे काम ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील यांनी केले. तर, सातत्याने प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या कामगिरीला डीजे च्या गाण्यांमधून दाद देण्याचे काम गणेश कांदू यांनी केले.

Exit mobile version