इंग्लंड-पाकिस्तान सामन्याला सुरक्षा पुरविण्यास असमर्थता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
विश्वचषकाचे नवे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच आता कोलकाता पोलिसांनीदेखील ऐनवेळी पाकिस्तानच्या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा 12 नोव्हेंबर रोजी इडन गार्डनवर होणाऱ्या सामन्याला दिवाळी सणामुळे सुरक्षेचा अतिरिक्त ताण असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सुरक्षा देऊ शकत नसल्याचे सांगत सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी होणाऱ्या भारत-पाक सामन्यादरम्यान गुजरात पोलिसांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याने वेळापत्रकात बदल केला होता.
भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा गोंधळ अजून संपलेला नाही. कोलकातामध्ये 12 नोव्हेंबरला काली पूजा सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. त्याच दिवशी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे कोलकाता पोलिसांवर वर्ल्डकप सामन्यासाठी सुरक्षा पुरवण्याचा अतिरिक्त ताण येणार आहे. विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होणारच आहे. नवरात्रीमुळे 15 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात येणारच आहे. आता पाकिस्तान आणि इंग्लंड याचेदेखील वेळापत्रक बदलण्यात येण्याची शक्यता आहे.जर असं झालं, तर विश्वचशकामधील पाकिस्तानच्या तिसऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदललं जाईल. पाकिस्तानचा श्रीलंकेविरूद्धचा 12 ऑक्टोबरला होणारा सामना 10 ऑक्टोबरला होणार आहे.
गेल्या विश्वचषकापेक्षा यंदाच्या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यास आधीच उशीर झाला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने एका वर्षापूर्वीच वेळापत्रक जाहीर केलं होतं. मात्र, बीसीसीआयने फक्त तीन महिने शिल्लक असताना वेळापत्रकाची घोषणा केली होती. आता त्यात पुन्हा बदल होणार आहेत.