कोलकाताच्या विजयाने मुंबईसह बंगळुरुला झटका
| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएलच्या 53 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सचा पाच गडी राखून पराभव केला. यंदाच्या हंगामातील कोलकाताचा हा पाचवा विजय आणि पंजाबचा सहावा पराभव ठरला. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघ प्रत्येकी 11-11 सामने खेळले असून, दोन्ही संघाकडे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण, चांगल्या नेट रनरेटमुळे कोलकाता संघ गुणतालिकेत उडी मारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर पंजाब सातव्या स्थानावर कायम आहे. कोलकाताच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक बनली आहे.
कोलकाताच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघाला झटका बसला आहे. कोलकाताने पंजाब विरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या आरसबीला धक्का देत पाचवं स्थान काबीज केलं आहे. यानंतर बंगळुरु संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाताकडील पराभवानंतर पंजाब सातव्या स्थानावर स्थिर आहे. कोलकाताच्या विजयानंतर मुंबई सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरली आहे.
‘टॉप 4’मध्ये बदल नाही
आयपीएल गुणतालिकेत गुजरात टायटन्स संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. टॉप 4 संघाच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. चेन्नई सुपर किंग्स 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौ संघाकडे 11 गुण आहेत. तर राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
इतर संघांची स्थिती काय?
कोलकाता, बंगळुरु, पंजाब आणि मुंबई संघाकडे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण, नेट रनरेटमुळे संघांच्या क्रमवारीत बदल झाला आहे. सनरायजर्स हैदराबाद सध्या नवव्या स्थानावर आहे. हैदराबाद संघाकडे आठ गुण आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सर्वात शेवटी दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाकडेही आठ गुण आहेत.