कोनमध्ये विधवा महिलांची प्रथेच्या जोखडातून मुक्तता

विधवा प्रथाबंदीचा ठराव ग्रामपंचायतीत संमत; इतर गावांसमोर ठेवला आदर्श
। पनवेल । वार्ताहर ।
मुंबईचे प्रवेशद्वार असणार्‍या कोन ग्रामपंचायतीने गावात विधवा प्रथाबंदीचा ठराव संमत केला आहे. या गावाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आणि पुरोगामित्व सिद्ध करणार आहे. त्यांनी इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे या गावातील वैधव्याची एक प्रकारे जोखडातून मुक्तता होणार आहे.

एखाद्या स्त्रीचा पती मृत्यू पावला म्हणजे तिने सण-उत्सव साजरे करायचे नाही. त्याचबरोबर कपाळ पांढरे ठेवायचे हा त्या भगिनीवर एक प्रकारे अनेक वर्षांपासून अन्याय होत आला आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आजही वैधव्य आलेल्या स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्यास विरोध होत आहे. तिला दागिनेही घालत येत नाहीत. तसेच त्या महिलांना हळदीकुंकूसारख्या कार्यक्रमांना निमंत्रण दिले जात नाही. कोणताही दोष नसताना मंगलमय, उत्साह तसेच आनंदाच्या क्षणापासून तिला दूर ठेवले जाते. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात या जुन्या रूढी परंपरा संपुष्टात आणण्याच्या दृष्टीकोनातून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात या प्रथा बंद करण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीसुद्धा पुढाकार घेत आहेत. त्यामध्ये पनवेल तालुक्यातील कोन हे गाव मागे राहिले नाही.

ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत विधवा प्रथाबंदीचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. सरपंच दीपक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. ग्रामसेवक रमेश तारेकर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत हा विषय चर्चिला गेला. आणि लागलीच यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. विधवा प्रथाबंदीबाबत गावात जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येणार आहे. अशोक घरत यांनी हा ठराव मांडला, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्‍वर बडे यांनी अनुमोदन दिले. तसेच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, मा. उपसरपंच जितेश शिसवे, सदस्या आशा घरत, सुलोचना भागित, अशोक म्हात्रे, गोविंद पाटील, आदेश घरत, हरिभाऊ कांबळे, नामदेव गाताडे, भारती गव्हाणे, रोशन म्हात्रे, जितेश कांबळे, अजय गायकवाड अनंत म्हात्रे उपस्थित होते.

पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यातील मणी काढून त्या व्यक्तीच्या तोंडात ठेवण्याची प्रथा बंद करायची असेल तर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र न तोडता फक्त तुळशीपत्र तोंडात ठेवणे हे चालू करायचं. तसेच हातातील बांगड्या न फोडता तशाच ठेवायच्या आणि कपाळावरील कुंकूसुद्धा पुसायचे नाही. समाजात जेव्हा अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होईल, त्या वेळेपासून त्या-त्या स्त्रियांचा आपल्या समाजात कुठेच अपमान होणार नाही आणि ती एक स्त्री म्हणून सन्मानाने जगता येईल. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही विधवा प्रथाबंदी ठराव संमत केला आहे.

दीपक म्हात्रे, सरपंच, कोन

Exit mobile version