मुलांमध्ये लांजा, तर मुलींमध्ये कुडाळ संघाची बाजी
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व कोकण विभागीय विविध स्पर्धा संपन्न होत आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो मुले व मुली स्पर्धा दि. 10 ते 12 नोव्हेंबरदरम्यान सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयातील जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगण येथे संपन्न झाली. मुलांमध्ये लांजा, तर मुलींमध्ये कुडाळ महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारली.

या स्पर्धेचे उद्घाटन पाली सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सुएसोच्या अध्यक्षा गीता पालरेचा, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, सचिव ग.रा. म्हात्रे, संचालिका तृप्ती मराठे, हर्षा चांदोरकर, बल्लाळेश्वर देवस्थानचे सरपंच जितेंद्र गद्रे, पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग, कोकण विभागीय क्रीडा समिती समन्वयक शशांक उपशेटे, सचिव चंद्रकांत नाईक, महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत चिले, महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रा. संतोष भोईर, जिमखाना प्रमुख संजय काटकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे नामांकित पंच, विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक, पालीवाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी कोकण विभागातील मुलांचे 13 व मुलींच्या 9 संघांनी नाव नोंदवून एकूण 139 मुले व 86 मुलींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो मुले या स्पर्धेचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा मानकरी क्रमशः ए एस सी कॉलेज- लांजा, ए एस पी कॉलेज- देवरुख व जे एस एम कॉलेज-अलिबाग ठरला. तसेच खो-खो मुली या स्पर्धेचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा मानकरी अनुक्रमे एस आर एम कॉलेज-कुडाळ, जे एस एम कॉलेज- अलिबाग व एस पी के कॉलेज -सावंतवाडी ठरले.
ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपपचांग यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रमुख प्रा. संतोष भोईर, जिमखाना प्रमुख संजय काटकर, क्रीडा विभाग सदस्य प्रा. दिपाली बांगारे, प्रा. महेश राहीन्ज, प्रा. रुकसार महाडकर, क्रीडा शिक्षक चिंतामण शिंगवा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक -प्राध्यापकेत्तर कर्मचारी, क्रीडा विभागातील विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. संदेश गावडे व आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. स्नेहल बेलवलकर यांनी केले.







