कोकणात निवडणुकीवरुन राडा; शिवसेना कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये राजकारण तापलं असतानाच, निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना नेत्याच्या निकटवर्तीयावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला नेमका कुणी केला आणि का केला, याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.
करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे वारे जिल्ह्यात जोरदार वाहत असतानाच ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हा हल्ला झाला असून, जिल्ह्यातील विरोधकांनी गुंडांकरवी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक दहशतवादाने जिंकण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील जनता या दहशतीला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले.

Exit mobile version