| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष संदीप घरत यांच्या राजकीय, पर्यटन, सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत कोकण आयडॉल या पुरस्काराने रविवारी मुंबईत सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवारातील तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी दापोली येथील कृषी विद्यापिठाचे कुलगुरू बाळासाहेब सावंत, लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक, समृध्द कोकण चळवळीचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव आदी मान्यवरांसह राजेंद्र घरत, प्रवीण नाईक, कल्पेश नाईक, संजय घरत, शुभम मळेकर, निकीत घरत, केतन घरत, संवेद घरत, सुनील घरत, सचिन घरत, जयवंत घरत, अरविंद शिवलकर उपस्थित होते.
कोकण विझन परिषद, समृध्द कोकण चळवळीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच भारताच्या 75व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दादर येथील बी. एन. वैद्य सभागृहात संदिप घरत यांना कोकण आयडॉल पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून संदीप घरत व्यवसायिक म्हणून काम करीत आहेत. एक वेगळी ओळख या व्यवसायातून निर्माण करून पर्यटन वाढीला चालना देण्याचे काम केले आहे. त्यामुळे उत्कृष्ट उद्योजक म्हणून स्वतःचे नाव संपुर्ण कोकणात निर्माण केले आहे.