गतवर्षीपेक्षा एक टक्क्याने घट
| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
कोकणातील धरणांमधील पाणीसाठा यंदाच्या वर्षी राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत सरस आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक 82.63 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या विभागात याचवेळी 83.15 टक्के पाणीसाठा होता. जमतेम सरासरी पाऊस झालेल्या कोकणात मात्र गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात फक्त 1 टक्काने घसरण झाली आहे. पाणी साठ्याची ही स्थिती उन्हाळ्यातील चिंता वाढविणारी आहे.
राज्यातील अन्य विभागांमध्ये पाणी साठ्याची परिस्थिती चिंतेचीच आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे सहा विभागांतील धरणामधील पाणीसाठा 66.31 टक्कयांवर घसरला आहे. गेल्या वर्षी याच वेळी 87.10 टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा 20 टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण या सहा विभागांमध्ये 2595 लहान, मध्यम आणि मोठे धरणप्रकल्प आहेत. कोकणात यावर्षी यंदा अपवाद वगळता बहुतांश धरणे 100 टक्के भरली होती. मात्र, पावसात सातत्य न राहिल्याने धरणातील जलस्तर घटत राहिला. सध्या कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक 82.63 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या विभागात याच वेळी 83.15 टक्के पाणीसाठा होता. मात्र, गतवर्षाशी तुलना करता सध्यातरी एक टक्के पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात कोकणातील तहानलेल्या गावांची चणचण एप्रिलनंतरच वाढण्याची शक्यता आहे.