प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळी वेळापत्रक
| मुंबई | प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या मार्गात अनेक बोगदे, लहान मोठे पूल आहेत. परिणामी, कोकण रेल्वेमार्गात दरड कोसळण्यासाठी शक्यता, मुसळधार पावसामुळे कमी होणारी दृश्यमानता आदी बाबी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. पावसाळी वेळापत्रक 15 जूनपासून सुरू झाले असून, कोकणातील रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे प्रवाशांचा प्रवास प्रचंड विलंबाने होण्याची चिन्हे आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबरदरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्वपावसाळी आणि इतर पायाभूत कामे पूर्ण केल्याने पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली आहे. यंदा 10 जूनऐवजी 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर, 31 ऑक्टोबरऐवजी 20 ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रक लागू असणार आहे. त्यामुळे पावसाळी वेळापत्रकाचा कालावधी 15 दिवसांनी कमी झाला आहे.
महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूरपर्यंत 739 किमी पट्ट्यात कोकण रेल्वेचा विस्तार आहे. या मार्गात 72 स्थानके आहेत. 84.50 किमीचे 91 बोगदे असून, 378 उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग, 87 समांतर रस्ता फाटक (एलसी गेट) आहेत. तसेच कोकण रेल्वे मार्गात अनेक वळणे असून दरडप्रवण ठिकाणे आहेत. तसेच जोरदार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन रेल्वेगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते. कोकण रेल्वेच्या एकूण 739 किमी मार्गापैकी वीर ते उडुपी या 646 किमी मार्गावर पावसाळ्यात वेगमर्यादा लागू असते. परिणामी रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावतात.
कुठे, किती वेगमर्यादा
रोहा वीर (47 किमी)सामान्य वेग ते ताशी 120 किमी
वीर कणकवली (269 किमी) ताशी 120 किमी ते 75 किमी
कणकवली उडुपी (377 किमी) ताशी 120 किमी ते 90 किमी
उडुपी ठोकूर (47 किमी) सामान्य वेग ते ताशी 120 किमी
मुसळधार पाऊस कोसळू लागताच दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रेल्वेमार्ग पटकन दृष्टीस पडत नाही. तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यास लक्षात येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मुसळधार पाऊस कोसळत असताना रेल्वेचा वेग ताशी 40 किमी ठेवावा, अशी सूचना लोको पायलटना करण्यात आली आहे. लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकी टॉकी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. यासह सॅटेलाईटसारखी अत्याधुनिक यंत्रणा रिलीफ व्हॅनमध्ये सुसज्ज ठेवण्यात आली आहे.
