रेवदंडा | प्रतिनिधी |
कोर्लई येथील 19 बंगलेे घोटाळा प्रकरणी जागेची आणि कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी आलेल्या माजी खा. किरीट सोमय्या यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची पाहणी न करताच त्यांना परतावे लागले. ग्रामस्थ व समस्त शिवसैनिक व पदाधिकारी यांनी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पांठिबा देऊन आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे कोर्लई ग्रा.प. कार्यालयासमोर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.
सोमय्यांचा कोर्लई येथे सकाळी अकरा वाजता दौरा होता, त्या अनुषंगाने रेवदंडा पोलिस ठाणे व कोर्लई गाव नाका तसेच ग्रामपंचायत कार्यालय परिसरात कडकडीत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलिस बदोबस्त असून सुध्दा जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे कोर्लई ग्रामंचायत मध्ये जातीने उपस्थित होते, माजी सरपंच प्रशांत मिसाळ, सरपंच राजश्री मिसाळ, माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते, चौल उपसरपंच अजीत गुरव, मारूती भगत, मोठया संख्येने कोर्लई ग्रामस्थ व महिला तसेच शिवसैनिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मात्र सोमय्या हे वेशीवरून परत गेले अशी पोलिसांनी दिलेल्या वृत्ताने मोठा जल्लोष केला. यावेळी विविध घोषणांनी कोर्लई ग्रामपंचायत परिसर दणाणले.
उध्दव ठाकरे खरे बोलतात, की रश्मी ठाकरे खोटे बोलतात याबाबत माझ्या प्रमाणे पोलीसांनादेखील संभ्रमात आहेत. हा 19 बंगल्यांपुरता विषय राहिला नाही. तर आणखी काही बोगस बंगले, कागदपत्रांचे पुरावे हाती आले आहेत.भ्रष्टाचार झालेला आहे.असा आरोपही सोमय्या यांनी केला.त्यांनी अलिबाग येथे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. उध्दव ठाकरे सारख्यांसह आणखी काही मंडळींनी अशा प्रकारे गैरप्रकार केल्याचा संशय आहे. कोर्लई प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. तपास जसा पुढे जातो. तशी आणखी माहिती हातात येत आहे. महिनाभरात आणखी काही बाहेर येण्याची शक्यता आहे. तपासमामध्ये खुप काही बाहेर आले आहे.असा आरोपही त्यांनी केला.