कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांच्यावर चोरीचा आरोप

लोखंडी पाईपची चोरी करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास रेवदंडा पोलिसांची टाळाटाळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सरकारी मालमत्ता असलेल्या मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणार्‍या सुमारे 11 कि.मी लांबीच्या लोखंडी पाईपची चोरी करून विक्री करण्यात आली आहे. या संबंधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास रेवदंडा पोलीस टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देत चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या चोरीत खुद्द सरपंच प्रशांत मिसाळ यांचा सबंध असल्यानेच गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे आरोप देखील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत केला असल्याने खळबळ उडाली आहे.याबाबतचे वृत्त असे की, 2012-2013 मध्ये शासनाने भारत निर्माण योजनेअंतर्गत गावाला पाणी पुरवठा करण्याकरीता फडसाड धरण ते कोर्लई गाव अशी 11 किलोमीटर लांबीचे 4 इंच जीआय (लोखंडी पाईप) टाकण्यात आले होते. त्यानंतर 2022 मध्ये कोर्लई ग्रामपंचायती नवीन पाईपलाईन मंजूर झाल्याने फणसाड धरण ते कोर्लई अशी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम ठेकेदारातर्फे काम चालू आहे. यावेळी जुने पाईप काढून टाकण्यात आले. परंतु सरकारी मालमत्ता असलेले जुने पाईप ग्रामपंचायत कार्यालयात जमा न करता त्याचा अपहार करून चोरी करण्यात आली. याबाबत ग्रामपंयातीमध्ये कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रशांत जानू मिसाळ यांचा पाईप चोरीशी व विक्री करण्याच्या संदर्भात संबंध असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच चोरी केलेल्या पाईपांची वाहतुक करणारा टेम्पो क्रमांक एमएच 06 बीडब्ल्यू 6020 टेम्पो रंगेहाथ पकडून रेवदंडा पोलीस ठाण्यात जमा केला आहे.


याबाबत टेम्पो चालकास विचारले असता हे पाईप रेवदंडा बंदर येथून घेतले असून त्याठिकाणी वैभव महालकर यांनी ट्रकने आणल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र रेवदंडा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आरोपींना ते अभय देत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

Exit mobile version