सात किलोवॅट वीजनिर्मितीचा प्रकल्पाच्या पॅनलची उभारणी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील महिला विकास केंद्र आणि आदिवासी वसतिगृहचे माध्यमातून सामाजिक उपक्रम म्हणून चालविणार्या कोतवाल वाडी ट्रस्ट परिसर आजपासून सौर ऊर्जेवर प्रकाशमान झाला आहे. पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे सीएसआर दंडकडून सात किलोवॅट क्षमतेचे पॉवर पॅनल उभे करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात नेरळ येथे कोतवाल वाडी ट्रस्ट या संस्थेची निर्मिती झाली. स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी कोतवाल वाडी ट्रस्टमध्ये आदिवासी समाजासाठी समाजोत्थान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या ट्रस्टमध्ये सध्या महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत विविध प्रकारचे कोर्सेस राबविले जात असून, हजारो महिला तेथील शिवणकला, नर्सिंग, पार्लर असे कोर्सेस करून सधन झालेल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी मुलांचे वसतिगृहदेखील चालवले जात असून, कोतवाल वाडी परिसरात महिला विकास केंद्र, कार्यालय, प्रात्यक्षिक केंद्र, प्रशिक्षण केंद्र आणि आदिवासी वसतिगृह आदी सर्व ठिकाणी महिन्याला आठशे ते हजार युनिट विजेचा वापर होत होता आणि त्यासाठी ट्रस्टला साधारण दहा हजार रुपये विजेचे बिल अदा करावे लागत होते. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्ष संध्या देवस्थळे यांनी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे त्यांच्या सीएसआर फंडामधून सोलर पॅनल बसविण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार सह्याद्री हॉस्पिटलकडून ही मागणी पूर्ण करण्यात आली असून सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनी कडून काढण्यात आलेल्या सीएसआर फंड मधील साधारण आठ लाख इतकी रक्कम कोतवाल वाडी ट्रस्ट मधील सोलर पॅनल यांची उभारणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून कोतवाल वाडी ट्रस्टचे स्वतःचे असे पॉवर स्टेशन निर्माण झाले असून, या पॉवर स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.
कोतवाल वाडी ट्रस्ट मध्ये पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे सीएसआर फंडामधून उभारण्यात आलेल्या पॉवर स्टेशन चे उद्घाटन येथून शहीद भवन मध्ये करण्यात आले.त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संध्या देवस्थळे,संचालक कृषी रत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटलमधील सीएसआर फंड समितीचे अधिकारी उपस्थित होते.त्यामुळे आजपासून कोतवाल वाडी ट्रस्ट ही संस्था आणि परिसर सौर ऊर्जेवर प्रकाशमान झाला आहे. या ट्रस्ट साठी महिन्याला साधारण एक हजार युनिट विजेचा गरज भासते.त्यासाठी सात पॅनल शहीद भवनाच्या छपरावर बसवण्यात आले आहेत.त्यातून सात किलो वॅट विजेची निर्मिती होत असून, त्याची साठवण येथील सात किलो वॅट क्षमतेच्या इन्व्हर्टर मध्ये केली जात आहे. कोतवाल वाडी ट्रस्टमधील विजेचा वापर हा साधारण साडेचार किलो वॅटएवढा असून, त्यापेक्षा दुप्पट विजेची निर्मिती त्या सोलर पॅनलमधून होत आहे.त्याचा फायदा कोतवाल वाडी ट्रस्टमधील महावितरण कंपनीचे वीज बिलावर होणार असून, आता काही हजार रुपये वीज खर्च वाचणार आहे.