खालापूरमध्ये आज रंगणार कृषीवल हळदीकुंकू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कृषीवलचे हळदीकुंकू म्हणजे महिलांचा मान, सौभाग्याचं दान, कर्तृत्वाचा सन्मान या उक्तीनुसार मालिकेतील तिसरा हळदीकुंकू सोहळा शनिवारी (28 जानेवारी) खालापूर येथील खालापूर फाटा मैदान, श्री कृष्ण पेट्रोलपंजपाजवळ दिमाखात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी कृषीवल परिवार आणि शेकाप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. कृषीवलतर्फे आता रायगडात ठिकठिकाणी महिलांच्या सन्मानार्थ हळदीकुंकू सोहळे आयोजित केले जात आहेत. बुधवारी (18 जानेवारी) अलिबाग येथे हळदीकुंकूचा पहिला सोहळा, त्यानंतर (21 जानेवारी) पालीमध्ये दुसरा सोहळा पार पडला.

शनिवारी खालापूर येथील खालापूर फाटा मैदान, श्री कृष्ण पेट्रोलपंजपाजवळ सायंकाळी 4 ते 7 दरम्यान हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीवरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारणारे कलावंतांबरोबरच आपल्या लावणीने रायगडकरांच्या मनावर अधिराज्य करणारी सोनाली पवार प्रत्यक्ष खालापुरातील महिलांच्या भेटीला येऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करणार आहेत. हळदीकुंकू महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी प्राप्त करुन दिली आहे.

या हळदीकुंकू कार्यक्रमास सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध जीवाची होतिया काहिली फेम श्रुतकिर्ती सावंत त्याचप्रमाणे आशीर्वाद तुझा एकवीरा आई फेम अमृता पवार व अन्य कलाकार उपस्थित राहणार आहेत. यावेळी सोनाली हिचा लावणीचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे महिलांना एक वेगळीच पर्वणी मिळणार आहे. विक्रमावर विक्रम करणारा हा सोहळा म्हणजे खालापूर तालुक्यातील महिलांना सौभाग्याचे लेणे आणि साजशृंगार करण्यासाठी एक उत्सवच बनू पाहात आहे.

Exit mobile version