अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले; शिवराम शिंदे यांचे गौरवोद्गार
| नागोठणे | महेश पवार |
पळस येथील माध्यमिक विद्यालय विनाअनुदानित तत्त्वावर चालविताना हायस्कूलचे मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांनी केवळ 2 हजार रुपयांत काम केले. त्यांनी खूप मेहनत घेऊन शून्यातून ही शाळा उभी केली. शाळा व्यवस्थापन समिती, पळस व कोलेटीचे त्या त्या वेळचे सरपंच तसेच येथील सर्व कार्यकर्त्यांनी ठाकूर यांना वेळोवेळी सहकार्य केले. पगार कमी आहे म्हणून कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष न करता त्यांनी या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. तसेच, कृष्णा ठाकूर यांचे पळस विद्यालयाला भविष्यातही मार्गदर्शन आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या काळात निरोगी दीर्घायुष्य मिळावे, अशा शुभेच्छा रोहा पंचायत समितीचे माजी सभापती शिवराम शिंदे यांनी दिल्या.
पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीचे नागोठण्याजवळील पळस येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्याचे आयोजन बुधवारी (दि.20) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवराम शिंदे यांच्यासह पेणच्या नगरसेविका सुजाता म्हात्रे, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन भोईर, माजी अध्यक्ष गणपत डाकी, आ.का. म्हात्रे, किशोर म्हात्रे, जोमा तांबोळी, मारुती शिर्के, हिराजी शिंदे, पळसच्या सरपंच सुप्रिया डाकी, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, ज्ञानेश्वर शिर्के, सतीश डाकी, शशिकांत शिर्के, बबन शिंदे, किसन बोरकर, वासुदेव तांबोळी, सखाराम ताडकर, नागोठणे केंद्र प्रमुख रुपेश पाटील, पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीचे विक्रांत वार्डे, तेजेश म्हात्रे, दिनेश पाटील, वैशाली पाटील, शाळेच्या शिक्षिका सायली ठाकूर, विठ्ठल मोरे, पांडुरंग म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, संजय शिंदे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक, संस्थेच्या इतर शाळांतील शिक्षक, पळसकोलेटी विभागातील नागरिक, आजी-माजी विद्यार्थी, मित्र परिवार तसेच मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांचे नातेवाईक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी अनन्या शेलार, मंजिरी तांबोळी व तन्वी डाकी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट स्वरूपात दिली. दरम्यान, 14 वर्षात शाळेचा निकाल सतत 100 टक्के लावताना 900 हून अधिक विद्यार्थी या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. हे सर्व शाळा व्यवस्थापन समिती व माझे सहकारी शिक्षक यांच्यामुळे शक्य झाल्याची भावना यावेळी मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांनी आपल्या मनोगत व्यक्त केली.
मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांचे सासरे आणि राजिपचे निवृत्त शिक्षक आ.का. म्हात्रे यांनी ही शाळा सुरू करताना आपल्या अडचणी आणि शाळा स्थापनेची पार्श्वभूमी सविस्तरपणे कथन करतांना अनेक गोड व कटू आठवणींना उजाळा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे, विक्रांत वार्डे, हेमंत ठाकूर, बाबू तांबोळी आदींसह अनेकांनी आपल्या मनोगतातून मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांना सेवानिवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
