| चौल | प्रतिनिधी |
कोकण म्हटलं, की समोर येतो तो इथला निळाशार समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या मोठमोठाल्या बागा अन् त्याचबरोबर प्रसिद्ध असणारी देवी-देवतांची प्रसिद्ध मंदिरे. असेच एक अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील प्रसिद्ध असे स्वयंभू कृष्णादेवीचे मंदिर. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या कृष्णादेवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. चौल पंचक्रोशीसह अनेक ठिकाणांहून भाविक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.
चौलमळा येथील ग्रामदेवी कृष्णादेवीचे मंदिर आकर्षक असेच आहे. मंदिराच्या सभोवताली नारळी-पोफळीच्या झाडांची दाट वनराई असून, गर्द झाडीच्या कुशीत मंदिर वसले आहे. पूर्वीच्या कौलारु असणाऱ्या मंदिराचा 2000 साली जीर्णोद्धार करुन आरसीसी पद्धतीचे, सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर उभारण्यात आले आहे. यंदाच मंदराच्या जीर्णोद्धारास 25 वर्षे पूर्ण झाली असून, रौप्यमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. मंदिराच्या मध्यभागी संगमरवरी प्रभावळरुपी चौथरा तयार करुन त्यावर ग्रामदेवता कृष्णादेवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली असून, बापदेव आणि वाघबाप्पा हे दोन रक्षक तिच्या बाजूला आहेत. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तीच्या दैनंदिन पूजा अर्चेचा मान गावातील सर्व ग्रामस्थांना प्रत्येक दिवशी देण्यात येतो. देवीची दररोज सांजआरती होते. विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने देवीची उपासना केली जाते. नवसाला पावणारी देवी असल्याने इथे नेहमीच भक्तांची गर्दी दिसून येते.
नवरात्रात येथे दिमाखदार उत्सव साजरा केला जातो. भाविकांची खण-नारळ, साडी-चोळीने देवीची ओटी भरण्यासाठी गर्दी उसळते. नऊ दिवस येथे कृष्णादेवी युवक मंडळाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चौलमळा प्रासादिक भजन मंडळाकडून अध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली देवीचा जागर करण्यात येत आहे. या मंडळाचे बुवा चंद्रकांत नवगावकर (थळ-चालमळा) असून, त्यांना मृदुंगमणी म्हणून अजय वाडकर (चौलमळा), प्रथमेश पाथरे कुरुळ आणि विकास पाटील (ढवर) साथ करीत आहेत. नवरात्रोत्सवा दरम्यान युवक मंडळाकडून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. त्यात लहान मुलांसाठी विविध प्रकारचे फनी गेम्स, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, गीतगायन स्पर्धा, फॅन्सी गरबा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धा आयोजित करण्यामागे लहान मुलांसह तरुणाईच्या कलागुणांना वाव देणे, एवढाच उद्देश असतो. आणि त्यासाठी चौलमळा युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद मेहनत घेतात. नऊ दिवस विनातक्रार आपापली नोकरी-धंदा सांभाळून ही सर्व मंडळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असतात. ग्रामस्थ आणि महिला मंडळाचीही त्यांना तेवढीच साथ लाभत आहे.
नवरात्रात नऊ दिवस सकाळी आठ वाजल्यापासून दर्शन व देवीच्या वाडी भरण्याचा कार्यक्रम सुरु होतो. वाडी भरणे म्हणजे देवीला फुलांनी सजविणे. देवीला नऊ दिवस सजविण्याचे काम अनिता नाईक, ज्योती लोहार, अस्मिता पाटील, निलांबरी नाईक, निलेशा मुकादम आदी महिला हौशीने करतात. विजयादशमीच्या (दसरा) दिवशी ‘सोने लुटणे’हा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात हजर असतात. त्यानंतर रात्री नऊ दिवस आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचा बक्षीस समारंभ पार पडतो. नवरात्र उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक, उपाध्यक्ष तथा भजन मंडळ अध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी मेहनत घेत आहेत.
चौलमळा गावची आई कृष्णादेवी
