धक्कादायक अलविदा

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचेे हेलिकॉप्टर अपघातात दुःखद, धक्कादायक आणि अकाली निधन झाल्याने भारताच्या लष्करी नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे. देशाने तिन्ही दलांच्या एकत्रिकरणासाठी नियुक्त केलेले पहिले संयुक्त प्रमुख बिपिन रावत सशस्त्र दलांच्या महत्त्वाकांक्षी सुधारणांसाठी पावले उचलत असतानाच त्यांनी धक्कादायकपणे अलविदा म्हटल्याने या महत्त्वाकांक्षी सुधारणा साधण्याचे लक्ष्य अपूर्ण राहिले आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या या भीषण हेलिकॉप्टर अपघाताने संबंध देश हादरला. त्यात त्यांच्या पत्नीसह सशस्त्र दलाचे अन्य अधिकारीही शहीद झाले. जनरल बिपीन रावत यांनी ‘एमआय-17 व्ही 5’ या हेलिकॉप्टरची निवड तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जाण्यासाठी केली होती. अत्यंत सक्षम आणि सुरक्षित मानले जाणारे हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. सध्या प्राप्त माहितीनुसार यात कोणताही घातपात असण्याची शक्यता दिसत नाही आणि धुक्यात, उंच पृष्ठभागावरून जाताना जी अनेक अपघाताची कारणे असतात, तीच याही अपघाताला कारणीभूत ठरल्याची दिसतात. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, हे खरे परंतु आजवर अशा कोणत्याही चौकशीतून जनतेपर्यंत पारदर्शक माहिती पोचत नाही हा इतिहास आहे. दुर्घटनेआधी हेलिकॉप्टर कमी उंचीवरून जात होते; जमिनीवर कोसळण्याच्या आधीच हेलिकॉप्टरने पेट घेतला होता, हे व्हिडिओ फुटेजवरून दिसते. हा अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी कोसळत्या हेलिकॉप्टरमधून आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत दोघे खाली पडताना दिसल्याचे म्हटले आहे. बचावकर्त्या पथकाच्या म्हणण्यानुसार, जनरल रावत यांच्या शरीराचा खालचा भाग जळाला होता. ते जिवंत होते आणि त्यांनी त्यांचे नावही सांगितले होते, असे मदत आणि बचाव पथकातील एनसी मुरली नावाच्या कर्मचार्‍याने सांगितले. रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशीही माहिती त्याने दिली. एका ज्येष्ठ, कर्तृत्ववान सेनानीचा असा दुर्दैवी अंत होणे ही देशासाठी नुकसानीची बाब आहे. आता त्यांची जागा कोणीतरी घेईलच, मात्र अशा जाण्याने मौल्यवान अनुभवालाही देश मुकतो, हे वास्तव आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या लष्कर प्रमुख पदावरून ते निवृत्त होत असताना त्यांची या संयुक्त सशस्त्र सेनादल प्रमुखपदी नेमणूक झाली होती. 1999 च्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी अशा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. प्रत्यक्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली. 16 मार्च 1958 रोजी जन्मलेले जनरल रावत सप्टेंबर 2016 मध्ये भारताचे 26 वे लष्करप्रमुख बनले होते. डिसेंबर 1978 मध्ये सैन्यात दाखल झालेल्या रावत यांनी गोरखा रायफल्सच्या पाचव्या तुकडीतून आपल्या लष्करी सेवेला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी चीनलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात लष्करी तुकडीचे नेतृत्व केले होते. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोर्‍यात तैनात लष्करी तुकडीचेही नेतृत्व त्यांनी केले. ते ब्रिगेडपदी असताना त्यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचेही नेतृत्व केले होते. त्यांची अशी नेत्रदीपक लष्करी कारकीर्द असताना त्यांनी आपल्या अस्थायी वक्तव्यामुळे वादही निर्माण केले होते. आपल्या राजकीय तसेच मानवाधिकार विषयक, काश्मीरविषयक विनाकारण वक्तव्य करून त्यांनी वाद निर्माण केले होते. लष्कराने राजकारणापासून दूर असले पाहिजे या तत्वाविषयी त्यांच्या भूमिकेबाबत देशात चर्चा घडली होती. लष्कराने काश्मीरमध्ये स्थानिकाला जीपला बांधल्या प्रकरणी तसेच जवानाने सैन्यात जेवण चांगले मिळत नसल्याविषयी सोशल मिडियातून नाराजी जाहीर केल्याप्रकरणीही त्यांच्या भूमिकेवर वाद झाला होता. आता या अपघाताने देशाचे वरिष्ठ नेतृत्व, अतिमहनीय व्यक्ती हे सगळे हादरलेले आहेत. तसेच, अतिमहनीय व्यक्तींच्या प्राणघातक हॅलिकॉप्टर अपघातांच्या लांबलचक यादीत हा अजून एक हेलिकॉप्टर अपघात समाविष्ट झाला आहे. या हॅलिकॉप्टरमध्ये खूप शक्तिशाली इंजिन असतात, त्यामध्ये अत्याधुनिक एव्हीओनिक्स बसवलेले आहेत. मात्र खराब हवामान आणि खाली आल्यावर पुन्हा वर जाणे पायलटसाठी आव्हानात्मक ठरु शकते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर, माजी नागरी विमान वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचेही असेच अपघाती निधन झाले होते. तपास अहवाल तयार होतात, त्याचा तपशील कळत नाही, म्हणून त्यातून धडा घेण्याचीही शक्यता नाही, हे दुर्दैव आहे. लष्करप्रमुख रावत यांना विनम्र श्रद्धांजली!

Exit mobile version