एसटी कर्मचार्‍यांनो, अति ताणू नका

 गेल्या महिनाभरापासून अधिक काळ राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी अर्थात एसटी ही पूर्णपणे बंद राहिल्याने राज्याच्या विकासाची चक्रेच थांबली आहेत.विलिनीकरणाच्या एकाच मागणीसाठी एसटी कर्मचारी हट्टून बसले आहेत. त्यामुळे त्यावर तोडगा अद्याप न निघाल्याने विकासाची चाकेच ठप्प झालेली आहेत. कर्मचार्‍यांना सरकारने पगारवाढ दिलेली आहे. पण ती अमान्य करुन एसटी कर्मचारी विलिनीकरण व्हायलाच पाहिजे याच मागणीवर ठाम राहिले आहेत. एसटी महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच एवढा काळ एसटी कर्मचार्‍यांचा संप लांबला आहे. आतापर्यंत अनेकदा एसटी कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप केला. पण सरकारने तातडीने त्याची दखल घेत आवश्यक मागण्या मंजूर करुन संप मिटविण्यास भाग पाडले आहे. पण यावेळी मात्र संपकरी कर्मचारीही इरेला पडल्याने संप काही मिटण्याची चिन्हे दृष्टीक्षेपात दिसून येत नाही. संपामुळे एसटी महामंडळाचेही अपरिमित असे नुकसान झालेले आहे. ते नुकसान कसे भरुन काढायचे याचीच चिंता एसटी महामंडळाला लागलेली आहे. गेले दीड वर्षे तर कोरोना साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  राज्यातील एसटी आगारांमध्ये लालपरी वापराविना पडूनच होती. त्यात हा संप सुरु झाल्याने एसटीच्या मागची समस्या काय कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. विलिनीकरणाला कुणाचाच विरोध नाही. उलट अजूनही एसटी कर्मचार्‍यांबाबत सर्वसामान्यांना कमालीची सहानुभूती आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या विश्‍वासामुळेच सर्वसामान्यांना लालपरी आपली वाटत आलेली आहे. त्यामुळे आम्हीही याच स्तंभाच्या माध्यमातून विलिनीकरण आवश्यक असल्याचे आवर्जून नमूद करीत आलेलो आहोत. आजही तीच आमची भूमिका आहे.पण आता संप मागे घेऊन कायदेशीर मार्गाने एसटी कर्मचारी संघटनांनी चालणे हिताचे ठरणार आहे. कारण संपामुळे सरकारने आतापर्यंत 10 हजार कर्मचार्‍यांना निलंबित केलेले आहे. तर रोजंदारीवरील हजारो कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे. यातून मार्ग काढत राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सोमवारपर्यंत पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केले आहे. ते आवाहन करताना सर्वांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्याची ग्वाहीही दिलेली आहे.हीच संधी मानून कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा आणि लालपरीचा गिअर्स टाकावा. कारण जोपर्यंत लालपरी रस्त्यावर धावत नाही तोपर्यंत राज्याचा गावगाडा काही हलणार नाही. कारण एसटीवर अनेक घटक अवलंबून आहेत. त्यात एसटी कर्मचार्‍यांसारखेच सर्वसामान्य घटक मोठ्या प्रमाणात आहेत. शाळा, महाविद्यालये सुरु झालेली आहेत.पण एसटीच सुरु ज्ञानमंदिरे सुरु होऊनही विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे अशक्य झालेले आहे. अनेकांना परीक्षांना मुकावे लागले आहे. त्यात एसटी कर्मचार्‍यांची मुले, मुली आहेत हे विसरुन चालणार नाही. अनेक रुग्ण केवळ एसटी सुरु नसल्याने औषधोपचार घेण्यास मुकत आहेत. सर्वसामान्यांच्या घरातील लग्नाचे वर्‍हाड एसटी नसल्याने जागच्या जागी थांबलेले आहे. अशी कितीतरी अडीअडचणी केवळ एसटी सुरु नसल्याने उद्भवत आहेत. तुमचे पगार वाढविले पाहिजेत, तुम्हाला सर्व सुविधा मिळाल्याच पाहिजेत या मागण्यांशी आम्हीही सर्वजण सहमत आहोत. त्यासाठी संप करुन सर्वसामान्यांना वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे. शासन जे देते ते आधी पदरात पाडून घ्या आणि जे शिल्लक आहे त्यासाठी कायदेशीर मार्गाने झगडत राहण्यातच मोठेपण आहे. ज्यांनी तुमच्या संपाचे नेतृत्व केले ते कधीच गायब झालेले आहेत. त्यामुळे आता शहाण्यासारखा विचार करुन संप मागे घ्यावा, असे कळकळीचे आवाहन आम्ही यानिमित्ताने करीत आहोत. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’हे ब्रीदवाक्ये घेऊन लालपरी साठ वर्षे धावत आहे तिचे ब्रीद वाक्य ‘प्रवाशांच्या गैरसोयीसाठी’ असे बदलू नका, एवढेच सांगणे यानिमित्ताने. संप सुरुच राहिला तर त्याचा मोठा फटका एसटी कर्मचार्‍यांनाच बसणार आहे. कारण सरकारने सोमवार हे अखेरचे अल्टिमेटम दिलेले आहे. त्यानंतर सरकार मेस्मा कायद्याखाली कारवाई करणार आहे. ती कारवाई टाळण्यासाठी संप संपवून कामावर हजर होणे हिताचे ठरणार आहे. आधीच गेले महिनाभर संप सुरु राहिल्याने एसटी कर्मचार्‍यांची आर्थिक स्थितीही खालावलेली आहे. ती आणखी बिघडवून घेऊ नका. कारण तुमच्या उत्पन्नावरच तुमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालविला जातो हे लक्षात ठेवा. तो प्रपंचाचा गाडा सुरु राहण्यासाठी तरी संप मिटवा, असे आवाहन यानिमित्तानाने आम्ही करीत आहोत.

Exit mobile version