त्रुटी दूर व्हाव्यात

नवीन वर्षाच्या प्रारंभीच जम्मू आणि काश्मीरच्या कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 12 भाविक मृत्यूमुखी पडण्याची दुर्दैवी घटना घडली असून,देशभरात विविध ठिकाणी आणि काळात झालेल्या अनेक दुर्घटनांच्या यादीत अजून एका दुर्घटनेचा समावेश झाला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या या चेंगराचेंगरीचे सावट दीर्घ काळ यात्रेकरूंच्या मनावर असणार असून जे या भयावहतेतून वाचले आहेत त्यांच्या मनावरही या दुर्घटनेचे कधी मिटू न शकणारे डाग उमटले आहेत. भारतात गेल्या काही वर्षांत मंदिरे आणि इतर हिंदू धार्मिक मेळाव्यात चेंगराचेंगरी होउन शेकडो लोक मरण पावले आहेत. गेल्या केवळ 20 वर्षांत देशात घडलेल्या अशा काही प्रमुख दुर्घटनांच्या यादीकडे पाहिल्यास यातील भयावहतेची कल्पना येते. 27 ऑगस्ट 2003 रोजी नाशिक येथील कुंभमेळ्यात पवित्र स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 39 जण ठार तर सुमारे 140 जण जखमी झाले होते. दीडच वर्षांनंतर 25 जानेवारी 2005 रोजी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी मंदिराच्या वार्षिक यात्रेदरम्यान 340 हून अधिक भाविकांना तुडवले गेल्याने मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले होते. भाविकांनी नारळ फोडल्याने निसरड्या झालेल्या पायर्‍यांवरून काही लोक खाली पडले आणि एकच एक हलकल्लोळ माजल्याने चेंगराचेंगरी झाली आणि लोक जीव वाचवायला इतरांना तुडवून गेल्याने ही दुर्घटना घडली. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील नैना देवी मंदिरात तीन ऑगस्ट 2008 रोजी दगड कोसळल्याच्या अफवा पसरल्या आणि त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 162 जण ठार झाले होते. त्याच वर्षी राजस्थानमधील जोधपूर शहरातील चामुंडा देवी मंदिरात बॉम्बस्फोट झाल्याच्या अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 250 भाविक ठार आणि 60 हून अधिक जखमी झाले होते. उत्तर प्रदेशात कृपालू महाराजांच्या राम जानकी मंदिरात मोफत कपडे आणि अन्न घेण्यासाठी लोक जमले असताना झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 63 लोक ठार झाले होते. अशाच दुर्घटना नंतरच्या काळात हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावरील हर-की-पौरी घाटावर, तसेच पाटणा येथील गंगा नदीच्या तीरावर छठपूजेच्या वेळी घडल्या होत्या आणि दोन्ही ठिकाणी चेंगराचेंगरीमुळे प्रत्येकी 20 जण ठार झाले. मध्य प्रदेशातील रतनगड मंदिराजवळ नवरात्रोत्सवादरम्यान भाविक ओलांडत असलेला नदीचा पूल कोसळणार असल्याची अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी झाली होती आणि 115 लोक ठार आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. अशाच घटना दसर्‍याच्या काळात पाटणा येथे घडल्या आणि चेंगराचेंगरीत 32 लोक ठार झाले. आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीच्या काठावरील एका प्रमुख स्नानाच्या ठिकाणी येथे ‘पुष्करम’ उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली आणि 27 यात्रेकरूंचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. ही इतकी मोठी व सविस्तर माहिती येथे सांगण्याचे कारण म्हणजे या घटनातील सातत्य आणि त्याचा सारखा नमुना. शनिवारी पहाटे झालेल्या दुर्घटनेत अडकलेले आणि ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी जी माहिती दिली, त्यानुसार यातील काही गोष्टींवर प्रकाश पडतो. या दुर्घटनेला दोन गटांतील एकमेकांना ढकलण्याने सुरुवात झाली असली तरी गर्दीवर नियंत्रण ठेवणारे कोणीच नव्हते, ही बाबही दुर्लक्षित करता येण्याजोगी नाही. मंदिर बोर्डाने जर लाउडस्पीकरवरून किमान लोकांनी ते जिथे आहेत तेथेच उभे राहा अशी उद्घोषणा केली असती तरी ती टाळता आली असती, असे यात जखमी झालेल्यांचे म्हणणे आहे. यांच्या म्हणण्यानुसार सर्वत्र अराजकता पसरलेली होती. संकुलातील मनोकामना भवनाजवळ, सुमारे चारशे ते पाचशे लोकांचा गट पुढे जाण्यासाठी इतरांना बाजूला ढकलत होता. त्यानंतर अचानक लोक सगळीकडे धावू लागले. गर्दीवर नियंत्रण ठेवणारे कोणी नसल्याने जे खाली पडले त्यांच्यावरून इतर जण धावत गेले. एकाने सांगितल्यानुसार कोणीही त्यांच्या यात्रेच्या स्लिप आणि कोव्हिड चाचणी प्रमाणपत्रे तपासली नाहीत. ही बाबही महत्त्वाच्या त्रुटी दर्शवते. आता सदर चेंगराचेंगरीप्रकरणी सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशीचे स्वागत करताना विश्‍व हिंदू परिषदेने व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी त्याची मदत होईल, असे म्हटले आहे. जर निष्काळजीपणा असेल तर त्याला जबाबदार लोक ओळखता येतील. यात केवळ कोणाला बळीचा बकरा बनवून पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखा प्रकार होणार नाही याची काळजी प्राधान्याने घ्यायला हवी. एका ठिकाणी अमर्याद गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना करतानाच भक्तांच्या सुरक्षेला सर्वोच्च महत्व द्यायला हवे.

Exit mobile version