अवघ्या अनाथांच्या आई बनलेल्या आणि आपल्या अतुलनीय समाजसेवाकार्याने सर्वांना थक्क आणि स्तिमित करून सोडणार्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री-समाजसुधारकांच्या परंपरेतील एक महत्वाचे व थोर व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. स्वतः निराधार होऊन जगणेही दुरापास्त झालेले असताना आपल्यातील मातृत्वाला जागवत, आपल्यातील आईपणाच्या कक्षा विस्तारत त्या अवघ्या अनाथांच्या आई बनण्याचा त्यांचा प्रवास दंतकथेसारखाच विलक्षण आहे. मनाची असीम खंबीरता आणि स्थिर धैर्यशाली प्रवृत्ती यातून त्यांनी सगळ्यांनाच जीवनाचे धडे दिले. स्वतः जसे आपले घर हरवून बसलो, तसेच घर हरवलेल्यांना केवळ छप्पर आणि भिंतींचा आश्रय नव्हे तर मायेची उबही देण्याची गरज आहे, हे ओळखून हात रिकामे असतानाही त्यांनी सुरू केलेले कार्य चकित करणारे आहे. त्यांनी भारतीय स्त्रीजातीपुढील आव्हानांची विदारक परिस्थिती पुढे आणत असताना आणि समाजाच्या प्रवृत्तीविषयीची भीषणता स्पष्ट करत असताना आपले अवघे आयुष्यच आपल्या कर्तृत्वाद्वारे सर्वांपुढे आदर्शवत उभे केले. त्यांच्या सक्रीय व क्रियाशील जीवन पद्धतीतून अनेकांच्या आयुष्याला आकार आला, अनेकांच्या आयुष्यातील काळोख त्यांच्या उत्साही, चैतन्यमय जगण्याने नाहीसा झाला. निराश झालेल्यांना माया मिळाली आणि ज्यांची वाट काळोखलेली होती, ती उजळून निघाली. त्यांच्या या कार्यात त्यांना लाभलेली दैवी रसाळ आणि भावगर्भ वाणी, खडतर आयुष्याच्या अनुभवांनी दिलेली आपल्या मातीचा देशी गंध लाभलेली अमोघ वक्तृत्वशैलीही महत्त्वाची ठरली. त्यांच्या गाणी, कविता आणि भाषणाने त्यांचे सेवाकार्य मर्यादित न राहता ते उत्तरोत्तर वाढत समाजजागरण बनत गेले. त्यांचे कार्य चळवळीचे रूप धारण करू लागली. सर्वांचे मन सहजपणाने प्रभावित नव्हे तर आपलेसे करणारा त्यांच्यातील ममत्वाचा झरा अखंडपणे वाहत होता. आता तो थांबलेला आहे. या सर्वांच्या माई ठरलेल्या सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 चा, वर्धा येथील जंगल भागातील नवरगाव येथे झाला. वडील गुरे सांभाळायचे. गाव अतिशय मागास. सुविधा नाहीतच, शिक्षणाचा गंध देखील नाही असे वातावरण. त्यांचा विवाह अल्पवयातच म्हणजे त्यांच्या वयाच्या 9 व्या वर्षी त्यांच्याहून वयाने तिप्पट असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. अठराव्या वर्षापर्यंत त्यांची तीन बाळंतपणे झाली. चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्षलढा उभारला आणि जिंकला. शेकडो गुरांचे शेण काढणार्या बायांना त्या शेणाचा लिलाव जंगलखात्याकडून होऊनही कोणतीही मजुरी मिळायची नाही. या संघर्षाने ती गावकर्यांना मिळायला लागली. मात्र त्याबद्दल चिढलेल्या गावच्या सावकारांनी त्यांची बदनामी केली आणि त्यांच्या नवर्याने संशयाने त्यांना पूर्ण दिवस भरलेले असताना घराबाहेर काढले. गावकर्यांनी गावाबाहेर काढले. माहेरच्यांनीही आधार दिला नाही. हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतात तो होता. दोन घासांसाठी भीक मागण्याची आणि रेल्वे स्टेशनवर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. नैराश्याने आत्महत्या करण्याचाही त्यांनी विचार केला. मात्र त्यांच्या पोटातील मुलासाठी त्यांच्यात वसलेल्या ममतेने त्यांना त्यापासून परावृत्त केले. तेथून त्यांनी स्मशानात राहण्यास सुरुवात केली. या टप्प्यावर त्यांना असाच सापडलेल्या एका अनाथ मुलाचा सांभाळ करण्याचे ठरवले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांना जगण्याचा उद्देश सापडला आणि अनेक अनाथांना मातृत्वाचे छत्र सापडले. त्यांनी आश्रम काढले आणि शेकडोंना पदराखाली घेतले. त्यांनी केलेल्या आजवरच्या कार्याची आणि संघर्षाची पावती म्हणजे त्यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आणि पद्मश्री हा नागरी किताब. मात्र त्यासाठी त्यांनी केलेले त्याग असमान्य म्हणावेत असे आहेत. आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलीप्रती अन्य मुलांच्या तुलनेत अधिक प्रेम आपल्यात निर्माण होईल, आपण कदाचित स्वार्थी बनू म्हणून त्यांनी आपल्या मुलीला इतरांकडे सांभाळायला दिले. व्याघ्र प्रकल्पाविरोधात मोर्चे काढून गावकर्यांना न्याय मिळवून दिला. पुरस्कार सन्मान मिळूनही संघर्ष सुरूच राहिला. कारण अनेक मुलांचा सांभाळ करण्यासाठी सुरू केलेल्या आश्रमांचा खर्च पुरस्कारातून भागत नव्हता. सातत्याने मदतीची गरज लागायची. मात्र त्यांनी त्याबद्दल कुरकुर केली नाही. आपणच हे पदरात बांधून घेतलेले निखारे आहेत, असे म्हणून त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. त्यांनी नवीन आदर्श घालून दिले आणि स्रीची शक्तीही दाखवून दिली. प्रेमाची जगाला गरज आहे आणि आपण प्रेमाने कोणाशीही नाते जोडू शकतो, त्यावर मायेची पाखर धरू शकतो, हे दाखवून दिले. या महान आत्म्याला विनम्र अभिवादन!
वात्सल्यसिंधू आई

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025