जवळपास निम्म्या जगाला वेढणार्या मान्सूनचे वर्णन नेहमी ‘काही वेळा अजिबात नाही आणि एकाच वेळी खूप असतो,’ असे केले जाते. हे वर्णन सध्या रायगड जिल्ह्यापासून महाराष्ट्र राज्य, राजधानी दिल्लीसह हिमाचल, उत्तराखंड ही उत्तरेकडील राज्ये अनुभवत आहेत. जूनमध्ये अंदाजानुसार वेळेत आणि अपेक्षेच्या आसपास प्रमाणात व्यवस्थित पाऊस झाला आणि बळीराजा सुखावून गेला. जूनमध्ये रायगड कोंकण परिसरात पेरणीची जोरदार सुरुवात झाली. मात्र जून अखेरीस मान्सूनचा जोर ओसरला आणि शेतकर्यांची चिंता वाढली. आणि जुलैच्या प्रारंभीही मान्सूनने जोर न धरल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. हवामान खात्याचा जुलैच्या प्रारंभीचा पाऊस पुन्हा वेग धरणार हा अंदाज चुकला. मात्र आठ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज दिल्यावर त्याच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या. तो अंदाज खरा ठरला आणि त्यानंतर रविवारी हवामान खात्याने दिलेला पावसाचे रूप रौद्र बनणार असल्याचा इशाराही खरा ठरला आणि पावसाने जवळपास सगळ्या नद्या भरल्या. कोकण, रायगडमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते ते या अचानक वाढलेल्या पावसाने सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली. रविवारी रात्रीपासून राज्याच्या बहुसंख्य भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने 24 तासांत अडीचशे ते साडेतीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने हजेरी लावली आहे. मात्र नेहमी मुंबईच्या वाट्याला जो अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर निर्माण होते तशी परिस्थिती सुदैवाने यावेळी निर्माण झालेली नाही. मुंबई एका अर्थी पावसाच्या या नव्या तडाख्यातून वाचली, असेच म्हणायला हवे. मराठवाडा विदर्भात अनेक पिकांच्या पेरण्या रखडल्या होत्या, त्या आता या मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुन्हा सुरू होऊ शकतील. महाबळेश्वरसह कोल्हापूर, सातारा आदी भागांबरोबरच परभणी, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांतही उत्तम पाऊस झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. नेहमी मान्सूनच्या तावडीत असणार्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशाराही दिला आहे. तरीही काही ठिकाणी दुथडी भरलेल्या नदीने दिसेनाशा झालेल्या रस्त्यावरून बस हाकण्यासारखे अनावश्यक जोखमीचे प्रकार घडले आणि अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील जीर्ण पुल खचल्याने रात्रीच्या काळोखात कोसळला. अरमान सय्यद या तरुणाच्या प्रसंगावधानाने आणि समयसूचकतेने अधिकची प्राणहानी वाचली. एकंदर रायगड जिल्ह्यातील पावसाने काही ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद झाले तर घरांचेही तुरळक प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिले. आणि हा जोर अजून दोन तीन दिवस असणार आहे, हा हवामान खात्याचा अंदाज गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. यावेळी पावसाने खरा दिलासा दिला तो राजधानी दिल्लीला आणि मोठ्या प्रमाणात हानी घडवून आणली ती हिमाचल प्रदेशात. राजस्थानात वीज पडून कैक जणांचे प्राण गेले. दिल्लीला यंदा पावसाने विलंबाने भेट दिली आणि मुसळधार पावसाने राहिलेली कसर भरून काढली. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळून पूर येणे हे अनपेक्षित नसले तरी अलिकडच्या काळात तेथे भीषण परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्याला जसे तीव्र होत चाललेल्या मान्सूनचे कारण आहे त्याचप्रमाणे तेथे पर्यटनाच्या वाढलेल्या संधीतून नियोजनअभावी झालेली बेसुमार बांधकाम वाढ हे देखील कारण आहे. गेल्या दोन दिवसांत धर्मशाळा या पर्यटकांचे अलिकडील नवीन आकर्षण केंद्र बनलेल्या भागात अनेक मोटारी तसेच इमारती देखील वाहून गेल्या आहेत. मुसळधार पाऊस कोसळतच असल्याने आणि त्याची तीव्रता अजून काही दिवस कायम राहणार असल्याच्या अंदाजाने पर्यटकांना येण्यास मनाई करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. तेथील हवामानही धोक्याचे बनल्याने विमानतळही बंद ठेवण्यात आला आहे. अनेक हॉटेल्स, इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. तर काही इमारती तर वाहून गेल्याने परिस्थिती हतबल करणारी आहे. कारण, उत्तरेकडील हिमाचल, उत्तराखंड हे भूगर्भीय दृष्टीने जितके संवेदनशील आहेत, तितकेच ते काँक्रिटच्या अतिक्रमणामुळे जोखमीचे बनले आहेत. तशात मान्सून दरवर्षी अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. अलिकडच्या काळात या प्रदेशावर कोसळलेल्या आपत्तीतून आपण काय धडा घेणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
पावसाचे रौद्ररूप

- Categories: अलिबाग, रायगड, संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
एचपी गॅस ग्राहकांना ई- केवायसी करण्याचे आवाहन
by
Sanika Mhatre
August 3, 2026
तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच
by
Sanika Mhatre
August 3, 2026
बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा
by
Sanika Mhatre
August 3, 2026
कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
by
Sanika Mhatre
August 3, 2026
खंडणी प्रकरण भोवले! भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी विरुद्ध गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
August 3, 2026
जाज्वल इतिहास पुढे नेणार - ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
August 2, 2026