कडेलोट

सोमवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऐकणार्‍या तमाम देशवासीयांना दोन प्रश्‍न पडले. पहिला हा की पंतप्रधानांना आपण संसदेत बोलत आहोत, निवडणूक प्रचारात नाही, याचे भान आहे की ते खरोखरीच त्यांच्या मूलभूत इलेक्शनजीवी प्रवृत्तीनुसार उत्तर प्रदेश व अन्य विधानसभा निवडणुकींच्या प्रचारात असल्याने संसदेचे भान विसरून भाषण करीत आहेत? दुसरा प्रश्‍न असा की संसदेत खोटे बोलण्यावर काही निर्बंध आहेत की नाहीत; की तेथे काहीही बरळता येते? कारण, त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल प्रचलित प्रथेप्रमाणे आभार मानणारे भाषण करणे अपेक्षित होते. त्याला त्यांनी संपूर्ण बगल देऊन आपल्या खास खोटेनाटे रेटून बोलण्याच्या निवडणूक प्रचाराच्या शैलीत काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांवर टीका केली. काँग्रेसला त्यांनी, ‘तुमच्या वृत्तीवरून असे दिसते की पुढील 100 वर्षे तरी सत्तेवर यायचे नाही’, असा टोला लगावला. काँग्रेस कशी गेल्या काही वर्षांत, दशकांत गोवा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, बंगाल, बिहार, तामिळनाडू आदी राज्यांतून हद्दपार झाली, याचा त्यांनी तपशील मांडला. या माहितीकडे तटस्थपणे पाहिल्यास बर्‍याच अंशी तथ्य आहे. मग अशा जी शंभर वर्षे सत्तेवर येऊ शकत नाही, ज्याला सगळ्या राज्यांनी गेली अनेक दशके सत्तेपासून लांब ठेवले आहे, ज्याची संख्या संसदेत विरोधी पक्षाच्या पात्रतेतही बसत नाही अशी जेमतेम पन्नासच्या आसपास असलेल्या काँग्रेसवर टीका करण्याचे कारण काय? तेही सत्तारूढ भाजपाकडे अजस्त्र बहुमत असताना? म्हणूनच मोदी यांच्या काँग्रेस पक्षावरील प्रदीर्घ टीकेनंतर काँग्रेसने केवळ  ‘खौफ अच्छा हैं!’ अशा केवळ तीन शब्दांत प्रत्युत्तर दिले. या निमित्ताने स्वतंत्र भारताच्या इतिहासात देशाने पहिल्यांदाच रेटून धडधडीत खोटे बोलणारा पंतप्रधान पाहिला. नरेंद्र मोदी यांच्या नावावर अनेक पहिल्यांदाचे बिरुद लागलेले आहे, त्यात हेही जमा झाले. काँग्रेस पक्षावर गेली सात वर्षे सतत टीका करीत, त्यात वेळोवेळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सामील करून घेत आपले अपयश आणि जनतेविरोधी व भांडवलशाही धार्जिणी धोरणे झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे ही त्यांची पद्धती आता जनतेला नीट माहिती झाली आहे. संसदेत खोटी माहिती देता येत नाही आणि त्यामुळे तेथे देण्यात येणारी माहिती देशासाठी शंकेपलिकडची असते. त्या विरुद्ध कायदाही आहे. परंतु गलितगात्र बनलेला विरोधी पक्ष त्या कायद्याचा वापर करण्याच्या परिस्थितीत नाही. काही दशकांपूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अशीच राजकीय स्थिती होती. तेव्हा इंदिरा गांधी यांची ताकद म्हणजे कमकुवत विरोधी पक्ष असल्याचे राजकीय विश्‍लेेषण केले जायचे. तशीच पुनरावृत्ती आता नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली दिसते. परंतु तरीही असे पंतप्रधानांनी बेधडक खोटे बोलणे आता पहिल्यांदाच घडले आहे. काँग्रेसवर तोंडसुख घेताना त्यांनी काँग्रेसने कोरोना देशभर पसरवला असा आरोप केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणार्‍या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते, असे ते म्हणाले. काँग्रेसने लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते, असे सांगतानाच त्यांनी काँग्रेसने लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आणि देशभर कोरोना पसरवला असा आरोपही त्यांनी केला. वास्तविक, नरेंद्र मोदी यांनी अचानक लागू केलेल्या टाळेबंदीमुळे लाखो मजूर व गोरगरिबांचे हाल झाले होते. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकारने केली होती. अडकून पडलेल्या 50 हजार मजुरांना काँग्रेस पक्षाने स्वखर्चाने आपापल्या गावी परत पाठविले होते. तसेच, लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने अनेक श्रमिक ट्रेन चालविल्या. त्याबद्दल जाहिरातही केली आणि संसदेत माहितीही दिली. मोदी यांनी केवळ निवडणुका असलेल्या राज्यांची नावे घेतली आणि जेथे आपल्या पक्षाला सत्ता मिळाली नाही, त्या राज्यांवर टीका केली. वास्तविक, सर्वाधिक ट्रेन या गुजरात राज्यातून सुटलेल्या होत्या. परंतु सत्य कोणाला हवे आहे? देशाचा पंतप्रधान खुद्द संसदेत सत्याचा कडेलोट करत असताना त्याची जपणूक कोण करेल, हा खरा प्रश्‍न आहे.

Exit mobile version