एखादा असाध्य आजार झाला की भल्या-भल्यांची मती कुंठित होते. एलोपथीच्या जोडीने आयुर्वेदिक, होमिओपथी, निसर्गोपचार अशी जमतील ती सर्व औषधे घेऊन पाहिली जातात. त्याहूनही पुढच्या स्थितीत मग एखाद्या स्वामींचा जप किंवा उपासतापास इत्यादींचे प्रयोग सुरू होतात. 135 वर्षांची परंपरा सांगणार्या आणि जवळपास साठ वर्षे देशावर राज्य केलेल्या काँग्रेस नावाच्या वृध्देचेही असेच झालेले दिसते. आपल्यामागे काहीतरी पनवती लागली आहे आणि प्रशांत किशोरबाबांचा अंगारा लावून तिचा निरास करता येईल असा सोनिया गांधी यांचा समज झालेला दिसतो. सध्या त्यांच्या व बाबा प्रशांत किशोर यांच्या बैठका चालू आहेत. किशोर यांनी 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी टक्कर घेण्यासाठी एक कार्यक्रम तयार केला आहे. तो सोनियांना बराच आवडला आहे. आता त्या कार्यक्रमातल्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारे पक्षाला चालना देता येईल हे ठरवण्यासाठी पक्षाच्या प्रथेप्रमाणे एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात चिदंबरमपासून तमाम सगळे जुने नेते आहेत. हे नेते प्रशांतबाबांच्या कार्यक्रमावर खल करणार आहेत. ज्यांनी ग्रामपंचायतीची सुध्दा कधी निवडणूक लढवली नाही किंवा एक राजकीय संघटना कधी चालवली नाही त्या प्रशांत किशोर यांच्या सूचना किती महान आहेत हे आता, ज्यांची हयात सत्ताकारणामध्ये गेली ते काँग्रेसवाले शोधून काढणार आहेत. खरं तर काँग्रेसचा आजार जगजाहीर आहे. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घराणेशाही, मुस्लिमांचे लांगूलचालन, स्वार्थीपणा ही प्रतिमा जनमानसात रुढ झाली आहे. गेल्या सत्तर वर्षांमध्ये देशात काहीही प्रगती झाली नाही असा एक भ्रम भारतीय जनता पक्षाने देशात तयार केला आहे. शिवाय हा देश हिंदूंचा असूनही काँग्रेसने त्याला मुस्लिमधार्जिणा करण्याचा प्रयत्न केला हा भाजपचा प्रचारही अतिशय प्रभावी ठरला आहे. हा भ्रम दूर करणे व प्रचार खोडून काढणे हे काँग्रेससमोरचे मोठे आव्हान आहे. काँग्रेस उभी राहिली ती महात्मा गांधींच्या पुण्याईवर. महात्मा गांधी हे काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षाचे नव्हे तर संघटनेचे नेते होते. त्यांचा सत्तेशी काहीही संबंध नव्हता. आज काँग्रेसला पुन्हा उभे करायचे असेलच तर सर्व नेत्यांना सत्तेच्या त्यागाची घोषणा करून जनतेत जावे लागेल. विमानांनी फिरणे बंद करून पदयात्रा काढाव्या लागतील. लोकांमध्ये जावे लागेल. यासाठी पैसा लागणार नाही. तळमळ लागेल. महत्वाचे म्हणजे भाजपच्या विरोधात लढण्याची एक ईर्ष्या लागेल. पण ती आजच्या एकाही नेत्यामध्ये नाही. प्रशांत किशोर हे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. निवडणुका, पक्षसंघटना इत्यादींचा त्यांचा अभ्यास आहे. संगणकशास्त्राचा कसा वापर करायचा हे त्यांना चांगलं अवगत आहे. या त्यांच्या गुणांचा उपयोग करून घ्यायला काहीच हरकत नाही. पण हे सर्व बाहेरचे उपाय आहेत आणि एका मर्यादेपर्यंतच उपयुक्त ठरतील. किशोर हे जातीची गणिते मांडून देतील. राहुल किंवा प्रियांका यांनी तरुणांसोबत कॉफी कशी प्यावी किंवा मोबाईलवरून कसा प्रचार करावा हे सांगू शकतील. त्यातून एखाद दुसरे चुकार यश मिळेलही. पण ते तात्काळ कोसळून पडेल. आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, गोवा यांच्यासारखी अक्षरशः हातातली राज्ये ज्यांनी घालवली त्यांना व्यवस्थापनाचे कितीही धडे दिले तरी ते निरुपयोगीच आहेत. शिवाय हे सर्व बाहेरून प्रोटीन्स टॉनिक देतात तसला प्रकार आहे. मुळातच जर बिघाड असेल तर हे बाह्य उपचारांचा उपयोग काय? कोणत्या तरी ध्येयासाठी केले तरच दीर्घ काळचे राजकारण उभे राहते. एखाद्या कंपनीसारखा राजकीय पक्ष चालवण्याची ज्यांची कल्पना आहे ते फार टिकू शकणार नाहीत. काँग्रेसमध्ये घुसण्याचा प्रशांत किशोर गेले तीन-चार वर्षे प्रयत्न करत आहेत. दरम्यान त्यांनी काँग्रेसच्या तमाम विरोधकांसाठी काम करून झाले आहे. शिवाय, 2024 मध्ये मोदींना हरवणे कठीण आहे असेही ते अनेकदा म्हणाले आहेत. पूर्वी दोन-तीनदा चर्चा फिसकटल्यानंतर किशोर यांनी आता पुन्हा काँग्रेसवर काय जादू केली आणि त्यांचे हेतू काय आहेत हाही एक संशोधनाचा विषय आहे.
किशोरबाबांचा अंगारा

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
रायगड जिल्ह्याचा ‘एनसीसी मॅन’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
by
Antara Parange
June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026