गेल्या वर्षी चीनने निर्यातीवर बंदी घातल्याने बाजारातील युरिआच्या किमती प्रचंड वाढल्या. या वर्षाच्या प्रारंभी युक्रेन युध्दानंतर रशियानेही नैसर्गिक वायूच्या निर्यातीवरही निर्बंध आणले. युरिआच्या उत्पादनासाठी नैसर्गिक वायू हा प्रमुख घटक असतो. याचा परिणाम म्हणजे युरिआच्या आयातकर्त्यांचे अंदाजपत्रक कोलमडले. युरिआच्या किमती गेल्या वर्षभरात तीनशे रुपये प्रति मेट्रिक टनावरून एक हजार रुपयांवर गेल्या. भारतातील एकूण गरजेच्या पंचवीस टक्के युरिआ आयात करावा लागतो. अर्थातच आपल्याला याचा मोठा फटका बसला. या सगळ्याचा विचार करून एकीकडे आपण युरिआचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहोत. यातील द्रवरुप नॅनो युरिआचा प्रयोग हा युरिआच्या वापराची सर्व गणितेच बदलून टाकेल असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातेतील कलोळ येथे देशातील पहिल्या द्रवरुप नॅनो युरिआच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. शेतकर्यांचे पीक कोणतेही असो, त्याची नायट्रोेजनची गरज भागवण्यासाठी युरिआ हे अत्यंत निर्णायक महत्त्वाचे खत ठरते. भारतीय शेतकरी सध्या सरासरी एक एकर शेतीसाठी एका हंगामात किमान दोन बॅगा युरिआचे दाणेदार खत वापरतो. 45 किलोची एक बॅग साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपयांना पडते. आंतरराष्ट्रीय बाजारात या खताचा दर एका बॅगला साडेतीन ते चार हजार रुपये असा आहे. सरकार त्यावर प्रचंड अनुदान देऊन विकत असल्याने शेतकर्याला तो स्वस्तात मिळतो. त्यामुळे त्याचा प्रचंड दुरुपयोगही होत असतो. हा युरिआ विविध प्रकारच्या प्लास्टिक निर्मितीसाठी तसेच पशुखाद्यासाठी वापरता येत असल्याने रेशनवरचा गहू किवा तांदुळ यांच्याप्रमाणे पाय फुटून तो काळ्या बाजारात रवाना होत असे. त्याला अटकाव करण्यासाठी नीम कोटेड युरियाची कल्पना मांडण्यात आली. या पार्श्वभूमीवर नव्याने विकसित करण्यात आलेला नॅनो द्रवरुप युरिया हा स्वस्त व अधिक फायदेशीर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पारंपरिक दाणेदार युरिआ हा पिकांमध्ये अंदाधुंदपणे वापरला जातो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता केवळ 25 टक्के इतकी असते. द्रवरुप नॅनो युरिआ हा मात्र अधिक नेमकेपणाने काम करत असल्याने त्याची कार्यक्षमत 85 टक्क्यांच्या वर आहे. म्हणजेच द्रवरुप युरिआतील केवळ 15 टक्के हिस्सा वाया जातो. त्यातील नायट्रोजन थेट पानांवर फवारावा लागतो. तेथून शोषून घेतल्यावर तो झाडाला मिळतो. हा तयार करणार्या इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह अर्थात, इफोने केवळ एका लिटर पाण्यात दोन-चार मिलीलीटर द्रवरुप नायट्रोजन पुरेसा आहे असे म्हटले आहे. सध्याच्या दरांनुसार अर्धा लिटरला केवळ 240 रुपये पडतील. त्याची प्रभावक्षमता एक वर्षापर्यंत टिकू शकणारी असल्याने वारंवार त्याची खरेदी करण्याची गरज नाही. कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने देशात अकरा हजार ठिकाणी आणि 90 पिकांवर त्याची चाचणी घेण्यात आली व त्याचा चांगला उपयोग झाल्याचे दिसले. या आकड्यांवरून तरी ही चाचणी व्यापक क्षेत्रात व भरपूर पिकांमध्ये झाल्याचे दिसते. आता त्चाचे उत्पादन व वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला तर अनेक फायदे होऊ शकतात. एक म्हणजे, मौल्यवान असे परकीय चलन वाचेल. दुसरे म्हणजे खतांच्या बेफाट वापरामुळे माती व पिकांची होणारी हानी टळेल. कलोळच्या कारखान्यात गेल्या ऑगस्टपासूनच उत्पादनाला सुरुवात झाली होती. (कदाचित गुजरातच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मोदींनी त्याचे पुन्हा उद्घाटन केले असावे.) त्याच्या आतापर्यंत अडीच कोटी बाटल्या विकल्या गेल्या आहेत. भारतीय शेतकरी हा जितका पारंपरिक आहे तितकाच तो नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारा आहे हे आजवर अनेकदा सिध्द झाले आहे. याच शेतकर्याने हरित क्रांती घडवली. अलिकडे जाणकारांमध्ये बरेच वाद असूनदेखील अडाणी मानल्या गेलेल्या शेतकर्याने मात्र बीटी कापसाचे बियाणे वापरून त्याच्या आधारे विक्रमी पीक घेऊन दाखवले. त्यामुळे द्रवरुप युरिआ हा खरेच फायदेशीर असल्याचे त्याला दिसले तर तो त्याचाही अंगीकार करील यात शंका नाही. सध्या खतांवरच्या अनुदानापोटी सरकार दोन लाख कोटी रुपये खर्च करते. नॅनो द्रवरुप युरिआ हा त्यात थोडी बचत करू शकेल.
द्रवरुप नॅनो युरिआ

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026