श्रीलंका हा मुख्यतः सिंहली बौद्धधर्मीयांचा देश. मात्र देशाच्या उत्तर व पूर्वेकडच्या भागात भारतातून आलेल्या तमिळांची मोठी संख्या एकवटलेली आहे. वर्षानुवर्षे सिंहली व तमीळ यांच्यात संघर्ष होताच. पण गेल्या वीस वर्षांमध्ये सिंहलींच्या राष्ट्रवादी भावनेला खतपाणी घालून गोताबाय राजपक्षे यांच्यासारख्यांनी सत्ता काबीज केली. तमीळ लोकांचे बंड चिरडून टाकताना त्यांनी अनन्वित अत्याचार केले. पण सिंहली लोकांना राष्ट्रवादाची नशा इतकी चढलेली होती की राजपक्षे करतील त्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी डोळे झाकून पाठिंबा दिला. राजपक्षे यांच्या चीनसोबतच्या अतिरेकी मैत्रीबाबतही हेच झाले. भारताला घेरण्यासाठी चीनला श्रीलंकेत लष्करी तळ आवश्यक वाटत होता. त्याने श्रीलंकेला मुक्त हस्ताने कर्जे वाटली. त्या बदल्यात हंबनटोटासारख्या मोक्याच्या बंदरावर ताबा मिळवला. ही कर्जे म्हणजे लंकेच्या गळ्याचा फास ठरतील असा इशारा अनेकांनी दिला होता. पण राजपक्षे आणि त्यांच्या प्रेमात असलेल्या सिंहली जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले. आता चीनची व इतर देशांची कर्जे फेडणे श्रीलंकेला अशक्य झाले आहे. आणि चीनचे कर्ज म्हणजे जुन्या काळातील पठाणी कर्जांचा नमुना आहे. त्यात दयामाया नसते. त्यामुळेच पर्यटनापलिकडे उत्पन्नाचे कोणतेही मोठे साधन नसलेला हा देश आज पाहता पाहता भिकेला लागला आहे. रामायण काळात हनुमानाने लंका जाळली होती. आज तिथले नागरिकच सर्व काही पेटवून देण्याच्या मनःस्थितीत आहेत. शनिवारी देशातील आंदोलकांनी अध्यक्षांच्या प्रासादाचा ताबा घेतला आणि पंतप्रधानांचे घर पेटवून दिले. दोन महिन्यांपूर्वी याच आंदोलकांनी खासदार व मंत्र्यांची घरे जाळली होती. हा आगडोंब उसळल्याने अध्यक्ष गोताबाय राजपक्षे पळून गेले आहेत. तर पंतप्रधान रोनिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. श्रीलंकेची लोकसंख्या सुमारे दोन कोटी वीस लाख म्हणजे साधारणपणे मुंबई महानगर प्रदेशाएवढी आहे. अगदी अलिकडपर्यंत या देशाचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षाही अधिक होते. पण आता मात्र तेथे तीस टक्के लोकांना रोजचे जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे. देशभरात पेट्रोल व गॅस मिळेनासे झाले आहे. अन्नधान्याचा इतका तुटवडा आहे की त्यावरून दंगली पेटतील अशी स्थिती आहे. संयुक्त राष्ट्रसंघ दयेची भीक म्हणून कधी धान्य पाठवील याकडे लोक डोळे लावून बसले आहेत. महागाई कमालीची वाढली आहे. दिवाळखोर म्हणा पण आम्हाला कर्ज द्या अशी विनंती घेऊन देशाचे अर्थमंत्री नाणेनिधीसारख्या संस्था व विविध देशांकडे फिरत आहेत. गेली सहा महिने ही स्थिती चिघळत गेली आहे. लोकांचा उद्रेक प्रचंड झाला की अध्यक्ष राजपक्षे तात्पुरती काही मलमपट्टी करीत होते. त्यानुसार मे महिन्यामध्ये त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला लावला. विरोधी गटातील विक्रमसिंघे यांना पंतप्रधान म्हणून नेमले. यामुळे जनतेचा राग तेवढ्यापुरता शमला पण परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. खरे तर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी व विविध क्षेत्रातील लोकांनी गोताबाय राजपक्षे यांनीही राजीनामा द्यावा अशी तेव्हाच मागणी केली होती. पण ते सत्तेला चिकटून राहिले. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तमीळ फुटिरतावाद्यांनी चालवलेली यादवी मोडून काढण्यासाठी लष्कराने अत्यंत निर्घृण कारवाई केली होती. गोताबाय यांनी यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्या कारवाईमुळे श्रीलंकेतील लष्करामध्ये राजपक्षे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळेच दोन महिन्यांपूर्वी महिंदा यांना आणि काल गोताबाय यांना लष्कराने सुरक्षितरीत्या अज्ञात स्थळी हलवले. श्रीलंकेतील या उलथापालथीतून भारतीयांनी काही धडे घेण्यासारखे आहेत. पेट्रोल-गॅसचे दर वाढताहेत, महागाई गगनाला भिडली आहे अशा स्थितीत देशातील सत्ताधारी मंडळी कायम मुसलमान, मशिदीवरचे भोंगे, काश्मीर अशा गोष्टी बोलत असतील तर काहीतरी गंभीर चूक होते आहे हे लक्षात घ्यायला हवे. देशातील रेल्वेसेवा धड चालत नसताना बुलेट ट्रेनचा अट्टाहास केला जात असेल आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांचा नुसताच गाजावाजा केला जात असेल तर ती धोक्याची घंटा मानायला हवी. आग दूर श्रीलंकेत लागली असली तरी उद्या ती आपल्या घरापर्यंत पोचू शकते.
लंकेतील आग

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
रायगड जिल्ह्याचा ‘एनसीसी मॅन’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
by
Antara Parange
June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026