पहिला टी-20 विश्वचषक जेव्हा 2007 मध्ये भरवण्यात आला तेव्हा ही काहीतरी पोराटोरांची गंमत आहे असा काहीसा समज होता. त्यामुळेच स्पर्धेसाठी भारताने पाठवलेल्या संघाचे नेतृत्व तेव्हा 26 वर्षांच्या असलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आले. संघातला सर्वात ज्येष्ठ खेळाडू 33 वर्षांचा अजित आगरकर होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली इत्यादी दादा खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले होते आणि गोलंदाजांमध्ये हरभजनसिंग व आगरकर वगळता फारसा अनुभवी कोणीही नव्हता. अंतिमतः तरुण खेळाडूंनीच पराक्रम गाजवला आणि भारताला हा चषक जिंकून दिला. याउलट यंदाच्या विश्वचषकात जो संघ आपण घेऊन गेलो होतो त्यात बहुतांश लोक हे तिशीच्या आसपासचे वा त्यावरचे होते. 2007 च्या पहिल्या संघात खेळलेले रोहित शर्मा, दिनेश कार्तिक हे याही संघात होते. त्या दोहोंचीही कामगिरी सामान्य राहिली. गुरुवारी उपांत्य लढतीत भारत इंग्लंडविरुध्द ज्या लाजिरवाण्या रीतीने हरला त्याचे प्रमुख कारण आपल्या संघातील तरुण उर्जेचा अभाव हे होते. बाद फेरीतील आपली कामगिरीही फारशी आश्वासक नव्हती. नेदरलँड्स आणि झिंबाब्वे वगळता अन्य प्रतिस्पर्ध्यांविरुध्दचे विजय हे नशिबाने किंवा कोण्या एका खेळाडूच्या कामगिरीच्या आधारेच मिळालेले होते. सांघिक कामगिरीचा हिस्सा त्यात कमी होता. रोहित शर्माची फलंदाज आणि कर्णधार या दोन्ही भूमिकांमधील कामगिरी सामान्य होती. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे दोनच फलंदाज सातत्याने चमकले. पण त्यातही जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हा म्हणजे इंग्लंडच्या सामन्यात यादव लवकर बाद झाला तर विराट पुन्हा एकवार अर्धशतकापर्यंत जाऊन थांबला. गोलंदाजीही कमालीची कमकुवत होती. पहिल्या स्पेलमध्ये हमखास गडी बाद करणारा ही भुवनेश्वरकुमारची ओळख आता राहिलेली नाही. शमीचा समावेश तसाही आयत्या वेळीच करण्यात आला होता. अश्विन हा भारतीय खेळपट्ट्यांवरही फारसा प्रभावी न ठरणारा गोलंदाज ऑस्ट्रेलियात का नेण्यात आला हा एक प्रश्नच होता. त्याच्या ऐवजी यजुवेंद्र चहलला अधिक संधी दिली जायला हवी होती. तीच बाब दिनेश कार्तिक याची. भारतीय खेळपट्ट्यांवर आयपीएलमध्ये त्याने फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली होती हे खरे आहे. पण त्याच्या कामगिरीमध्ये कधीही सातत्य राहिलेले नाही. त्याच्या ऐवजी गेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात उत्तम फलंदाजी केलेल्या ऋषभ पंतला का प्राधान्य देण्यात आले नाही हे अनाकलनीय आहे. शेवटी शेवटी तसा विचार झाला. पण तोवर उशीर झाला होता. विश्वचषकासारख्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत जिंकणारे संघ हे एकांड्या शिलेदारावर अवलंबून नसतात. सांघिक कामगिरी असेल तरच ते विजयी होताना दिसतात. सोळा वर्षांपूर्वी धोनी अगदीच नवखा होता. पण संघाची उभारणी करण्याचे त्याचे कौशल्य त्या पहिल्या विश्वचषकातही दिसले होते. दुर्दैवाने यंदा अनेक स्टार खेळाडू असूनही, किंवा ते तसे असल्यामुळेच, संघ म्हणून आपण एकत्रित चांगली कामगिरी करू शकलो नाही. आपल्याकडे आयपीएल सामने हेच या स्पर्धेची तयारी मानली गेली जे की गैर होते. भारतीय संथ खेळपट्ट्यांवरची आयपीएल सतत खेळत राहिल्याने आपले खेळाडू दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया तर सोडाच पण वेस्ट इंडिजसारख्या काहीशा दुबळ्या संघासमोरही त्यांच्या देशातल्या खेळपट्टयांवर टिकू शकत नाहीत. भारतीय खेळाडूंना बिग बॅश किंवा अन्य टी-20 लीग स्पर्धांमध्ये सामील होण्यावर आपल्या बोर्डाने बंदी केलेली आहे. त्यामुळे आयपीएलमधील टीम मालकांना कोट्यवधींचा फायदा होत असेल पण भारतीय क्रिकेटचा मात्र जबरदस्त तोटा होत आहे. आपल्या महत्वाच्या खेळाडूंबाबतही योग्य ती काळजी घेतली गेली नाही. जसप्रित बुमराला दुखापतीचा संशय असतानाही आयपीएलमध्ये व नंतर खेळू दिले गेले. तर रवीन्द्र जडेजा हा अत्यंत निष्काळजीपणे समुद्रात खेळताना नाहक जखमी होऊन बसला. याउलट इंग्लंडचे मोईन अली, बेन स्टोक्स किंवा सॅम करन अशा खेळाडूंनी यापूर्वी आपल्या फिटनेसला अधिक महत्व देऊन महत्वाच्या स्पर्धांमधून अंग काढून घेतलेे. भारतातील आयपीएलमध्ये इंग्लंडचे फारसे खेळाडू दिसत नाहीत तेही त्याचमुळे. थोडक्यात, भारतीय संघात आता मोठे बदल करण्याची वेळ आली आहे. मग राहुल द्रवीडचे मतकाहीही असो.





