पुणे शहरावर ब्राह्मण समाजाचा मोठा पगडा आहे. तरीही तिथे वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. कारण, पूर्व भागातील बहुजन समाज हा महात्मा फुले आणि नंतर जेधे-जवळकरांच्या मुशीत तयार झालेला होता. तो काँग्रेसची पाठराखण करी. 1990 नंतर हे चित्र बदललं. बहुजनांना फितवण्यात भाजपला यश आलं. 1991 ला भाजपने पहिल्यांदा लोकसभा जिंकली. पण त्या पक्षाला सर्व शहरभर सलग यश कधीही मिळवता आलं नाही. 2014 च्या मोदी लाटेनंतर मात्र पुणं पूर्णपणे भाजपच्या कह्यात गेलं असं वाटू लागलं. कोथरुडमध्ये बाहेरचे असल्याने चंद्रकांत पाटलांना प्रखर होता. पण ते भाजपचे असल्याने विजयी झाले. पक्षाने महापालिकेवरही वर्चस्व स्थापन केलं. त्यातून एक उन्माद तयार झाला. कसब्यातील पोटनिवडणूक निकालाने त्या उन्मादाला जबरदस्त हादरा दिला आहे. बहुजनांचा पूर्व भाग आणि ब्राह्मणबहुल शनिवार, सदाशिव इत्यादी पेठा यांचा सांधा म्हणजे कसबा मतदारसंघ. गेली सुमारे तीस वर्षे तेथे भाजपचा आमदार होता. अर्थात, त्यात गिरीश बापट यांच्या सर्वपक्षीय लोकप्रियतेचा मोठा वाटा होता. तेथे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकिट द्यावे अशी मागणी होती. ती मान्य न करता भाजपच्या मुंबईत बसलेल्या नेत्यांनी हेमंत रासने यांचे नाव रेटले. त्याविरुद्ध मोठी नाराजी होतीच. पण एकनाथ शिंदे यांचे बंड आणि देशातील व राज्यातील भाजपची वागणूक यामुळे भ्रमनिरास झालेल्यांची संख्याही मोठी होती. ती या निकालातून व्यक्त झाली. ब्राह्मण आणि बहुजन हे भाजपच्या प्रचारी गुंगीतून बाहेर येत आहेत असा याचा अर्थ आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भक्कमपणे एकत्र राहिले. रवीन्द्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असूनही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादीने बंडखोरांना चाप लावला. या सर्वांचा परिणाम म्हणून धंगेकरांनी सर्व फेर्यांमध्ये आघाडी घेतली. भाजपचे ढीगभर मंत्री आणि नेते प्रचारात उतरले. कडेकडेने अमित शाह येऊन गेले. नाकातोंडात नळ्या असलेल्या गिरीश बापटांनादेखील जबरदस्तीने प्रचारासाठी आणले गेले. अखेरच्या टप्प्यात पैसे वाटल्याचा आरोप झाला. पण तरीही मतदार ठाम राहिले. भाजपचे मायाजाल आता आटत आणि फाटत चालले आहे याची ही खूण आहे. एकजूट दाखवली तर भाजपला हरवता येऊ शकेल असा आत्मविश्वास यातून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळेल. चिंचवडमध्येदेखील बंडखोर राहुल कलाटे यांनी मते खाल्ल्यामुळेच भाजपला विजय शक्य झाला आहे. कलाटे यांच्यासारख्यांची योग्य रीतीने समजूत काढणे व त्यांनाही सामावून घेणे हेदेखील महाविकास आघाडीला जमले पाहिजे असा याचा धडा आहे. तिथे प्रकाश आंबेडकरांनी कलाटे यांना पाठिंबा दिला होता हेही लक्षात ठेवायला हवे. एकुणात, भाजपच्या ताकदीचा जो एक जबरदस्त फुगा गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाला होता त्याला कसब्याच्या निकालाने टाचणी लावली आहे. यापूर्वी अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून भाजपने घेतलेली माघार हीदेखील त्याचीच निदर्शक होती. भाजपच्या हुकुमशाही राजवटीला विरोध असणार्या सर्व सुबुध्द नागरिकांना आनंद वाटेल असे हे बदल आहेत.
फुगा फुटला

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026