इंग्रजांकडून लढून, प्राणांची आहुती देउन प्राप्त केलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देश मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. या निमित्ताने पंतप्रधान करीत असलेल्या भाषणाकडे खूप लक्ष असते. आज आपला देशही अनेक अडचणींवर मात करून एकसंघ राहून लोकशाहीच्या मार्गाने सातत्याने वाटचाल करीत आलेला आहे. यादृष्टीने एका वेळी सिंहावलोकन करताना भविष्यासाठी आवश्यक असलेली पायाभरणी करण्याचेही वेध लागलेले असतात. कारण भारतासारख्या वैविध्यपूर्णचे विलक्षण वैशिष्ट्य असलेल्या देशाच्या इतिहासात पाऊणशे वर्षांचा काळ हा दीर्घ असतो. या कालखंडात आपल्या देशाने स्वत:चे भविष्य कसे घडवले हे जाणून घेण्यासाठी विशाल सामायिक दृष्टीकोन हवा. तसेच, तो आपला भविष्यकाळ कसा बदलू शकतो, यादृष्टीने द्रष्टेपणा आवश्यक असतो. पंतप्रधानांनी ही मोठी संधी काही लोकप्रिय घोषणांचा पायी वाया घालवली असेच म्हणायला हवे. त्यांनी काही घोषणा केल्या मात्र एकंदर राजकीय प्रचारकीचे आणि नेहमीप्रमाणे अर्धसत्य पद्धतीने आपल्या भाषणांत मांडणी केली. ही मोठी संधी गेली तरी निदान त्यांनी केलेल्या काही घोषणा नीट अंमलात याव्यात इतकीच जनतेची इच्छा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करताना त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची यादी आणि राबवलेल्या योजनांचा त्याच्या यशासकट उल्लेख केला. यात वेगळी घोषणा आहे ती राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची. कोरोनानंतर जगभरात राजकीय मांडणी नव्याने होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी आज संपूर्ण जग भारताला नव्या दृष्टीने पाहत आहे, असे सांगितले. दहशतवाद आणि विस्तारवाद या आव्हानांशी भारत लढत असून या आव्हानांना पूर्ण हिमतीने उत्तरही देत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. नवी शिक्षण धोरणांतर्गत सदर शिक्षण योजना गरिबीशी लढण्यासाठी असून मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देण्याचेही त्यांनी जाहीर केले. उर्जाबाबत देश स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान एका बाजूला आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी पूर्वनिश्चित आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करण्याचेही आव्हान आहे. त्यासंदर्भात हायड्रोजन मिशन महत्त्वाचे आहे. तसेच आपला देश कृषीप्रधान असल्याने शेतकर्यांना डावलून कोणताही विकास साध्य होणे शक्य नाही. मोदी यांनी यावेळी कृषी क्षेत्राशी वैज्ञानिकांना जोडण्याची गरज प्रतिपादित केली. कृषी क्षेत्राशी वैज्ञानिकांना जोडण्याची गरज आहे, कारण देशाला अन्न सुरक्षा देण्यासोबत त्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत मिळेल, तसेच जगापर्यंत पोहोचण्यासही मदत होईल, असे ते म्हणाले. हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी आकडेवारी दिली की देशातील 80 टक्क्यांहून अधिक शेतकरी दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी आहेत. त्यामुळे पूर्वी देशात जी धोरणे बनवली गेली होती, त्यामध्ये छोट्या शेतकर्यांना एकप्रकारे डावलले गेले. आता या छोट्या शेतकर्यांना डोळ्यापुढे ठेवूनच निर्णय घेतले जात असल्याचे सांगत त्यांनी छोटा शेतकरी हा देशाचा गौरव बनला पाहिजे, असा संकल्पही जाहीर केला. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांची एकूण कारकीर्द, कार्यपद्धती पाहिली तर त्यांचा सगळा भर घोषणांवर असतो आणि त्यातील पोकळपणाला कोणी पुढे प्रश्न करीत नाही म्हणून तो चर्चिला जात नाही. या आधी त्यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याची घोषणा केली होती. त्यांना कोणीही ते साध्य करण्याचे मार्ग काय किंवा ते कसे शक्य होईल, असा प्रश्न विचारला नाही. त्यांचे सगळे खुशमस्करे मंत्री आणि माध्यमांतील समर्थक केवळ पोपटाप्रमाणे पाच ट्रिलियनचा शब्द पुटपुटत राहिले. परिणामी अर्थव्यवस्था वाढण्याची सोडा, पण होती ती गाळात गेली. तसे या हायड्रोजन मिशनचे होऊ नये. तसेही हे काही नवीन नाही. याआधीही यावर चर्चा झालेली आहे. सौर उर्जेचा वापर करण्याचे काय झाले, याकडेही पाहिले पाहिजे. कारण त्यावर सुरुवातीला देण्यात आलेली प्रोत्साहक अनुदान रक्कम बंद केल्याने त्याचा प्रसार हवा तसा झाला नाही. आता या नवीन लाखो कोटींच्या योजनेचा लाभ केवळ धनदांडग्या उद्योजकांना केवळ होणार असेल तर उपयोग नाही. त्यासाठी याकरिता या क्षेत्रातील दिग्गजांना सोबत घ्यावे लागेल. मात्र प्रश्न विचारणारे बुद्धिमान लोक त्यांना चालत नाहीत. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या काळात देशाची पत घसरत असताना, देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य त्यांच्या कारकिर्दीत धोक्यात आणले गेले असताना, केवळ लोकप्रिय घोषणा केल्याने परिस्थिती बदलत नाही. घोषणांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली तरच देश सर्वार्थाने विकास करेल.
घोषणा अंमलात याव्यात

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026