आंतरराष्ट्रीय पातळीवर समाज शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या, फुले-आंबेडकर तत्त्वज्ञान आणि चळवळींची नव्याने मांडणी करणार्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या निधनाने महाराष्ट्राची फार मोठी, कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे. स्त्रीमुक्तीवादी विचारांबरोबर देशातील जाती संघर्ष व समानता, श्रमिकांचा संघर्ष, बौद्ध, फुले-आंबेडकर, मार्क्सवादी तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास, तसेच महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वारकरी तत्त्वज्ञानाची नव्याने मांडणी त्यांनी केली. एका अर्थी स्मरणातून लयास दिलेल्या महात्मा फुले यांच्या कार्यचळवळीचे नव्याने महत्व त्यांनी जगाला पटवून दिले. मूळ अमेरिकन वंशाच्या असलेल्या गेल ऑम्वेट या विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक चळवळीत उतरलेल्या होत्या. तेव्हा सत्तरच्या दशकात अमेरिकेत व्हिएतनाम मधील अमेरिकेतील युद्ध सहभागाच्या विरोधात जी आंदोलने झाली, त्यात त्या अग्रभागी होत्या. त्या भारतात आल्या. त्यातल्या त्यात महाराष्ट्राने त्यांच्या प्रकृतीला साजेसा असा कार्यानुभव दिला आणि त्यांच्या कुशाग्र बुद्धीला आवश्यक असलेले आव्हानही प्राप्त झाले. त्यातूनच त्यांनी आपला डॉक्टरकीचा प्रबंध 1873 ते 1930 या कालखंडातील पश्चिम भारतातील ब्राह्मणेतर चळवळींवर सादर केला. त्यांना त्याबद्दल कॅलिफोर्निया विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळालीच, शिवाय तो जगभर वाखाणला गेला. त्यानंतर त्या ब्राह्मणेतर चळवळी, महिलांची स्थिती, जाती संघर्ष या चळवळीशी कायमच्या जोडल्या गेल्या. त्यावर त्यांनी खूप सखोल, मोलाचे असे विद्वत्तापूर्वक संशोधन आणि लेखन हयातभर केले. एरव्ही विद्वानात दिसून येणार्या आपले अस्तित्व पुस्तके, वाचनालय आणि विद्यापीठांच्या आवारात मर्यादित करण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांचा स्वभाव होता. त्या थेट ज्याबद्दल आपण लिहितो, ते जिथे घडते त्या जीवनात सामील झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या रूपात त्यांनी अनेक चळवळी सुरू केल्या, त्यात सहभाग घेतला. त्यात त्यांचा संपर्क डॉ. भारत पाटणकर या हाडाच्या कार्यकर्त्याशी आला आणि वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण सोडून सामाजिक चळवळीत गुंतलेले व्यक्तिमत्त्व त्यांना भावले आणि त्या दोघांचे सहजीवन सुरू झाले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी ज्या आदर्शाने आपले कार्य केले, तसा या दोघांचाही प्रवास प्रदीर्घ काळ महाराष्ट्राने पाहिला. प्रामुख्याने त्या दलित आणि जाती विरोधी चळवळी, पर्यावरणविषयक चळवळी, शेतकर्यांचे आंदोलन, विशेषतः ग्रामीण स्त्रिया त्यांच्याशी संबंधित आंदोलनात सहभागी झाल्या. श्रमिक मुक्ती दल आणि स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विशेषतः सांगली, सातारा जिल्ह्यात काम केले. शेतकरी महिला आघाडीत त्यांचा सहभाग होता, श्रमिक मुक्ती दलाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. वाचनाचा अफाट आवाका, प्रखर बुद्धिमत्ता आणि सामाजिक प्रश्नाची आच त्यांना सातत्याने प्रवासात आणि कार्यमग्न ठेवायची. या तिन्ही कार्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांचा प्रत्येक क्षण अन् क्षण त्यासाठी समर्पित झाला. त्यांनी रीतसर भारताचे नागरिकत्व घेतले आणि त्या अमेरिकेवर कायम त्याच्या वर्णद्वेषी प्रवृत्तीवर प्रहार करीत राहिल्या. त्यांच्या विद्वत्तेमुळे त्या अनेक विद्यापीठात वेगवेगळ्या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी देशातील अनेक प्रमुख विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून काम केले आहे. पुणे विद्यापीठात फुले-आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख म्हणून, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक म्हणून, ओरिसामध्येही आंबेडकर अध्यासनाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. सिमला येथेही त्या प्राध्यापक होत्या. कोपनहागेन, नॉर्डिक देशांच्या विद्यापीठ संघटनेत आशियाई प्रतिनिधी म्हणून त्या नियुक्त झाल्या होत्या. तसेच दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी त्या सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. त्याबरोबर त्यांचे लेखनही अफाट होते. इकॉनोमिक अँड पॉलिटिकल विकली या प्रतिष्ठित अंकामध्ये त्यांचे लेख असत, तसेच आपला विषय सर्वसामान्यांपर्यंत गेला पाहिजे या हेतूने त्या आवर्जून वृत्तपत्रातूनही लेखन करत. यातून त्यांच्या हातून 25 हून अधिक आंतरराष्ट्रीय ख्यातीची पुस्तके निर्माण झाली. त्यामध्ये अर्थातच ‘नॉन ब्राह्मीन मोमेंट इन वेस्टर्न इंडिया,’ ‘सिंकिंग बेगमपुरा’, ‘बुद्धीजन इन इंडिया’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले’यांच्यावरील ग्रंथ आदींचा समावेश आहे. त्यांनी वेद, हिंदुत्व यावरही भाष्य केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान झाला नसता तरच नवल! त्यांना असंख्य पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. दूरदेशी जन्मून भारताला आणि प्रामुख्याने महाराष्ट्राला आपली कर्मभूमी करणार्या आणि आपले अवघे जीवन येथील श्रमिकांसाठी, दलितांसाठी आणि स्त्रियांसाठी समर्पित करणार्या या विदुषीला कृषीवलचा सलाम!
विचारवंत कार्यकर्त्या

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026