परम झोल

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिला या निवासस्थानासमोर स्फोटके भरलेले वाहन आणि नंतर मनसुख याचा खून इथपासून सुरू झालेला रहस्यमय अनाकलनीय घटनाक्रम तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची खंडणी वसूल केल्याच्या आरोपापर्यंत आला. त्यातील अनेक सुरस व चमत्कारीक घटनाक्रमांनी व आरोपांनी अवघा देश गांगरला. आता या कहाणीत विलक्षण ट्वीस्ट आला असून हा देशभर खळबळ उडवून देणारा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच आता कोणालाही सापडेनासे झाले आहेत. देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्यावरही अनेक आरोप आणि त्यांच्याविरोधात अनेक एफआयआर दाखल झाले होते. आता मात्र खुद्द तपास यंत्रणांनादेखील ते सापडत नसून ते देश सोडून गेले असावेत, असा कयास आहे. एनआयएने ऑगस्टमध्ये परमबीर सिंह यांना अनेकदा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले, मात्र ते चौकशीसाठी आले नाहीत. त्यामुळे नेमके परमबीर सिंह आहेत कुठे? हा प्रश्‍न सगळ्यांनाच पडला असताना कानोकानी येत असलेल्या खबरानुसार ते रशियाला गेले आहेत असे समजते. मात्र पोलीस अधिकार्‍यांचे नियामक खाते असलेल्या गृहखात्यालाही त्यांच्याविषयी काहीही माहिती नाही. खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील ही कबुली दिली आहे. त्यामुळे एकंदर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ते रशियाला गेले असतील अशी जोरदार चर्चा असली तरी ते एक सरकारी अधिकारी या नात्याने सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत, असे वळसे पाटील म्हणाले आहेत. परमबीर सिंह जर पळून गेले असतील, तर ते परवानगी घेऊन जातील का? त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली असल्याने जर ते भारताबाहेर गेले असतील, तर ती त्यांच्यासाठी चांगली बाब नाही, हे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनाही माहित असणारच. त्याचप्रमाणे अशा प्रतिष्ठित पदावर ज्येष्ठतम नेमणुकीवर असलेले अधिकारी म्हणून लपण्याचे आणि गायब होण्याचे, तसेच परदेशी नाहीशेे होण्याचे अनेक छुपे मार्गही त्यांना माहिती असणार. आपला शेजारदेश नेपाळ हा जगात कोठेही अजिबात संशय न येता जाण्याचे प्रवेशद्वार आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अनधिकृत वृत्तानुसार परमवीर यांनीही याच मार्गाचा वापर केला आहे. तसेच अशा प्रकारे गायब होणारे ते काही पहिले उच्चाधिकारी नाहीत. असे म्हणतात की आयएएस, आयपीएस अधिकारी हा आपल्या कारकिर्दीत आठशे ते हजार कोटी रुपयांपर्यंतची कमाई करतो. स्वत:ला आणि पुढच्या सात पिढ्यांनाही परदेशात कोठेही सुरक्षित आयुष्य घालवायला ती पुरेशी असते. अर्थात अन्य क्षेत्रानुसार यालाही सन्माननीय अपवाद आहेतच. तथापि, परमवीर यांची चमकदार कारकिर्द अशी काळोख्या, अदृश्य वाटांवरून नाहिशी व्हावी, यासारखे आपल्या देशाचे दुर्दैव नाही. भाजपा नेत्यांचा आशिर्वाद असल्यानेच परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेण्याचे धाडस केले अशी सुरुवातीलाच चर्चा सुरू होती. अँटिला प्रकरणी एप्रिल मध्ये सचिन वाझेच्या अटकेनंतर एनआयएने सर्वात प्रथम परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. हे प्रकरण उजेडात आले तेव्हा वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होता. एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यानेच त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते, पण त्यांनी उत्तर दिले नाही. त्याचबरोबर देशमुख प्रकरणी राज्य सरकार कारवाई करेल, या भीतीने त्यांनी मुंबई सोडली होती व चंदीगडमध्ये वैद्यकीय कारण देत मुक्काम केला होता. तसेच त्यांनी न्यायालयातही आपल्याविरोधातील कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनावणीत परमबीर सिंह यांच्यावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढत, ‘गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत?’ अशी विचारणा केली होती. गृहविभाग मे महिन्यापासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, तो अजूनही झाला नाही आणि आता होण्याची शक्यता कमी दिसते. देशात गुन्हे करून परदेशी जाणारे अनेक निघाले. त्यांना पकडणारेच आता गुन्हे करून देशाबाहेर गायब होत आहेत. व्यवस्थेतूनच मदत मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. नुकताच युपीएससीचा निकाल लागून त्यात तरुण या सेवेत, अशा पदांवर येत असताना त्यांच्यापुढे काय आदर्श आहेत, हे पाहता चिंता अधिक वाढते.

Exit mobile version