गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे दुखणं आता संपणार, अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. कारण या महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 250 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मिळावा यासाठी रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी पाठपुरावा केला. याबद्दल उभयतांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. आता कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता या महामार्गाचे काम त्वरेने पूर्ण केेले जावे, एवढीच माफक अपेक्षा रायगडवासियांची आहे. चांगले, दर्जेदार रस्ते हे विकासाचे प्रतिक मानले जातात आणि त्यात गैर असं काहीच नाही. कारण, रस्ते चांगले असणे, हे आता आवश्यक बाब बनली आहे. महाराष्ट्रात गेल्या पंधरा-वीस वर्षांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. अनेक कामे पूर्णही झालेली आहेत. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. भविष्यात महाराष्ट्रात चांगल्या रस्त्यांचे जाळे विणलेले दिसेल. दुर्दैवाने चांगले रस्ते हे कोकणाला अजूनही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे कोकणच्या विकासाला खीळ बसली आहे, हे खेदाने नमूद करावे लागेल. कोकणच्या विकासाला चालना देणारा मुंबई-गोवा महामार्ग हा गेल्या 15 वर्षांपासून रखडला आहे. कोकणासह गोव्याला जोडणारा हा महामार्ग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून जात आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विकासाबरोबरच कोकणचा विकासही अपेक्षित आहे. पण, वीस वर्षांपासून या महामार्गाचे काम विविध कारणांनी रखडले आहे. आधी या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी विविध सामाजिक संस्था, पत्रकार संघटना, राजकीय पक्षांनी विविध स्तरांवर आंदोलने करुन सरकारला काम सुरु करण्यास भाग पाडले खरे; पण त्यानंतर या महामार्गाच्या कामात शुक्लकाष्टच मागे लागलेय, ते आजतागायत सुटलेले नाही. आधी जमीन संपादनाचा मुद्दा, त्यानंतर शेतकर्यांची भरपाई, ठेकेदाराची नियुक्ती, पहिला ठेकेदार सोडून गेला म्हणून पुन्हा दुसरा ठेकेदार नियुक्त, त्यातून कोर्टकचेर्या आदी कारणांमुळे हा मार्ग पूर्ण होण्याऐवजी रखडतच राहिला. तो आजतागायत पूर्ण झालेला नाही. जो काही झाला आहे, त्याच्या कामाबाबतही अजूनही ओरड ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे हा मार्ग होणार, की असाच अर्धवट राहणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याउलट, राज्यातील अन्य प्रकल्प मंजूर होऊन ते पूर्णही होत आलेत. पण, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचे घोंगडे जे काही भिजत पडले आहे, ते काही सुकायला तयार नाही. याची दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या रखडलेल्या महामार्गाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी नुकतीच पुण्यात केंद्रीय रस्ते, विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत चर्चा करुन हा महामार्ग तातडीने पूर्ण केला जावा, असे आवाहन गडकरी यांना केलेे होते. त्यानुसार मंगळवारी 5 ऑक्टोबरला नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खा. सुनील तटकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चाही केली. आणि पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील क्राँक्रिटीकरणासाठी 200 कोटी तसेच अन्य कामांसाठी 50 कोटी असा एकूण 250 कोटींचा निधी दिला जावा, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार बैठकीत हा निधी तातडीने देण्याची ग्वाही गडकरी यांनी दिल्याने या महामार्गाच्या रखडलेल्या कामांना निश्चित चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. हा महामार्ग पूर्ण झाल्यास निश्चितच रायगडसह कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे, हे निश्चित. आतापर्यंत महामार्गाचे काम का रखडले, याचाही उहापोह करणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेला विकासाच्या झारीतील शुक्राचार्य कोण आहे, हे समजले पाहिजे. कारण, दुर्दैवाने आपल्याकडे असे अनेक प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. ते वेळीच पूर्ण झाले असते, तर महाराष्ट्रासह देशाची प्रगती आणखी कितीतरी पटीने वाढली असती. आता मात्र हे टाळून वेळेत प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत नितीन गडकरी हे नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आता विदर्भातच नव्हे तर, कोकणातही महामार्गाचे काम पूर्णत्वास नेऊन विकासाची समृद्धी आणावी. आता निधी वेळेत उपलब्ध व्हावा व त्याचा नीट विनियोग व्हावा आणि महामार्ग सुसाट होऊन कोकणच्या प्रगतीचा वेग वाढावा, एवढीच माफक अपेक्षा.
महामार्गाचे दुखणे संपणार

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026