दसर्याच्या निमित्ताने राजकीय पातळीवर महाराष्ट्रात तीन भाषणे प्रसिद्ध असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरमधील सरसंघचालकांचे भाषण, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा आणि भाषण, तसेच भगवानगड येथे होणार्या दसरा उत्सवानिमित्त गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेले भाषण. शिवसेनेचा मेळावा गेल्या वर्षी कोरोनामुळे ऑनलाईन झाला आणि यंदा प्रत्यक्ष परंतु सभागृहात. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भाषणे झाली. भाषणात चिंतन असावे अशी अपेक्षा असते, मात्र ही भाषणे आपापल्या चिंता व्यक्त करणारी ठरली असे म्हणायला हवे. महाविकास आघाडी सरकारवर भाजपातर्फे सातत्याने आरोप आणि विविध यंत्रणांचा वापर करून त्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला खरमरीत उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. या दबावाखाली येण्यापेक्षा थेट आव्हान देणे हे त्यांच्या सरकारसाठी आवश्यक होते आणि त्यांनी तसे केले. तुम्ही चिरकत रहा, पण माझा वाडा चिरेबंद आहे. टकरा मारा.. मुसंड्या मारा, डोकी फुटतील, पण अजिबात तडा जाणार नाही. तसेच, आमचा आवाज दाबणारा कधीच जन्माला येणार नाही, अशा भाषेत त्यांनी आपली टीका केली आणि ठाकरे कुटुंबावर हल्ला करणारा आता कोणी मायेचा पूत जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथे ठेचून टाकू असा खास ठाकरी भाषेतला परंतु मुख्यमंत्रीपदाला न शोभणारा इशाराही दिला. अर्थात अन्य ठिकाणी मुख्यमंत्री जे काही करत आहेत आणि बोलत आहेत, त्यातुलनेत हे अपेक्षेच्या मर्यादेत असले तरी न शोभणारेच आहे. मात्र त्यांना ठाकरी भाषेसाठी आवश्यक वाटले असणार. साकीनाका येथील बलात्कार प्रकरणी राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेबद्दल चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले होते, त्याचाही उल्लेख करीत ठाकरे यांनी तेव्हा पाठविलेल्या उत्तराची आठवण करून दिली. त्यानंतर, उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा मळा फुलला आहे का? असा खोचक प्रश्नही विचारला. राजकीय उत्तर म्हणून हे ठीक आहे, परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशचा निकष ठेवण्याचे काही कारण नाही. मात्र आता आक्रमक झाल्याशिवाय पर्याय नाही, या चिंतेपोटी त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविलेले असू शकते. तसेच महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनीही तसे ठरवलेले असू शकते. कारण, शनिवारी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही अशी आक्रमक भूमिका दिसली. दुसर्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सत्तेत बसलेल्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आपला नेहमीचा मुस्लिमविरोधी सूर न चुकता लावला. तसेच, या भाषणाला चिंतन असे शीर्षक असावे अशी अपेक्षा असल्याने त्यासदृश्य मजकूरही असावा म्हणून बिटकॉईन, ओटीटी याबाबत आपल्या प्रतिगामी भूमिका मांडल्या. आपलेच सरकार आपले ऐकत नाही, असा तक्रारीचा सूर त्यांच्या एकंदर भाषणाला होता. सत्तेत बसलेलेच असे वर्तन करत नसतील तर लोकांना दिशा कशी मिळणार? असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. अशी भाषणे लोकांची दिशाभूल करण्यासाठी असतात आणि त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे आता अनेकांना चांगलेच माहितीचे झाले आहे. त्यामुळे ते कोणी गंभीरपणे घेत नाही. घेतले तर, तुमचेच सरकार आहे, तुमचेच प्रचारक मोक्याच्या निर्णयक्षम ठिकाणी नेमलेले आहेत, त्यांना आदेश देऊन प्रश्न सोडवू शकता, असे उलटे उत्तर दिले जाते. मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे आणि हिंदूंची कमी होत आहे, त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण धोरण हवे, हे जुने रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवले. गेल्या अनेक वर्षांत खानेसुमारीच्या आकडेवारीनिशी हे खरे नसल्याचे तज्ज्ञांनी दाखवून दिले आहे. मात्र काहीही करून मुस्लिमांना शत्रू बनविले नाही तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता असते. कारण, देशाच्या आत शिरलेल्या चीनशी पंगा घेण्याची हिम्मत नाही आणि सीमेवर दहशत निर्माण करणार्या पाकला सीमेवर जाऊन भिडणे हा अजेंडाच नाही. त्यामुळे काहीही करून उत्तर प्रदेशातील निवडणुका होईपर्यंत मुस्लिमविरोध जिवंत ठेवायचा आहे. शेवटचे पंकजा मुंडे यांचे भाषण. आपल्या पक्षाला घरचा आहेर देणे असो, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असो की मराठा आरक्षण, ते सगळे त्यांचे पक्षातील अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची मन की बात होती, एवढेच.
चिंता, चिंतन आणि भाषण

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025