प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सर्वांच्या परिचयाचे त्यांचे ‘गाणारे व्हायोलिन’ मूक झाले आहे. व्हायोलिन वादनातून शब्द उमटण्याचा आभास निर्माण करणारे त्यांचे प्रयोग गाजले होते. त्यांची संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिनवादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त काळ सुरू असलेली कारकीर्द खूप मोठी आहे. मराठी – हिंदी चित्रपट संगीतासोबत भावसंगीताच्या क्षेत्रातही जोग यांनी खूप मोठे काम केले. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी पुण्यात व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम सुरू केले होते. त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गीतरामायण. संगीतकार सुधीर फडके यांचे सहायक म्हणून काम करीत असताना ‘गीतरामायण’ या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निर्मितीत प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर जोडले गेले. गीतरामायणच्या पाचशेहून अधिक कार्यक्रमांत जोग यांनी फडके यांना साथ दिली. प्रभाकर जोग यांच्या वडिलांना संगीत नाटकांची आवड होती. ही आवड प्रभाकर जोगांमध्ये उतरली. ते वयाच्या पाचव्या वर्षापासून गायन शिकू लागले होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू वामनराव आकाशवाणीवर व्हायोलिनवादक होते व घरी व्हायोलिनचे वर्ग घेत. प्रभाकर यांनीही या वाद्यावर प्रभुत्व मिळवले. वडिलांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर कठीण परिस्थिती आली आणि प्रभाकर जोग यांनाही खूप संघर्ष करावा लागला. म्हणून वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानात स्नेहसंमेलनात ते व्हायोलिन वाजवत असताना मैदानापलिकडे राहणार्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि जोगांना भेटायला बोलावले. पुढचा सगळा इतिहास आहे. 1952 साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून ते स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. स्नेहल भाटकर यांच्याकडे त्यांनी ‘गुरुदेवदत्त’ या 1951 च्या चित्रपटात व्हायोलिनवादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असल्याने जोग यांनी संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबरही काम करू लागले. आपला अवीट संगीत ठेवा मागे ठेवून जाणार्या प्रभाकर जोग यांना विनम्र आदरांजली!
गाणारे व्हायोलिन मूक

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026