बोले कंगना

कंगना राणावतने ‘देशाला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे इंग्रजांकडून मिळालेली भीक होती आणि खरे स्वातंत्र्य भारताला 2014 साली मिळाले’ असे एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य करुन देशभरात आणि समाज माध्यमांत मोठा हलकल्लोळ निर्माण केला आहे. कंगना राणावतचा इतिहास पाहता आणि ती ज्या पद्धतीने बेधडक म्हणण्यापेक्षा बेजबाबदारपणे वक्तव्य करते, ते पाहता हे फार आश्‍चर्य वाटण्याजोगे नसायला हवे होते. परंतु, तिला आत्ताच ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देण्यात आल्याने, तसेच तिचे हे वक्तव्य कोणा एका व्यक्तीविषयी किंवा समुदायाविषयी अथवा क्षेत्राविषयी नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली. आता तिच्यावर खटले दाखल केले जात आहेत आणि पद्मश्री सन्मान काढून घ्यावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली जात आहे. याआधी कंगनाने करण जोहर, ऋतिक रोशन यांच्याबद्दल काही वर्षांपूर्वी वादग्रस्त विधाने केली होती. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या निमित्ताने रिया चक्रवर्तीबद्दल विधाने केली होती. खरे तर, ती अभिनेत्री म्हणून सिनेक्षेत्रात आल्यापासून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करत एक गुणी आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत मान्यता पावली. ती प्रतिभाशाली आहे, हे तिने आपल्या अनेक वर्षांतील विविध चित्रपटांतून सिद्ध केले आहे. याचा अर्थ, ती मूर्ख नाही. त्यामुळे तिचे आता व्यक्त केलेल्या विधानातून दोन अर्थ निघू शकतात. पहिला म्हणजे, तिला सातत्याने चर्चेत राहण्याचा, ज्याला ‘अटेंशन सिकिंग’ असा मानसिक आजार आहे. अशा प्रकारचे लोक आपली दखल घेतली नाही तर अस्वस्थ होतात आणि त्यांना सातत्याने समाजाने आपली दखल घ्यावी, चर्चा करावी, याची खूप मानसिक गरज असते. तो तिला झालेला असू शकतो. दुसरा अर्थ, ती गेल्या काही वर्षांपासून या विशिष्ट प्रकारची विधाने करते, आरोपयुक्त वादग्रस्त वातावरण निर्माण करते, सध्याच्या सत्तारूढ राजकीय विचारसरणीला सोयीची आहे. ही विचारसरणी द्वेषमूलक आहे. देशात द्वेषाच्या विषाची पेरणी करून आलेली ही सत्ता आहे. त्याचा व्यक्तिगत लाभ उठवण्यासाठी, सत्ताधार्‍यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी त्यांना सोयीस्कर असे विधान ती करत असावी, अशी शक्यता आहे. कारण, केंद्रातील सरकारमागे ज्यांचा वैचारिक पाठिंबा आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचा इतिहास पुसायचा आहे. नवीन काही न करू शकलेले जे होऊन गेले, ते विकृत करण्यापलीकडे आणखीन काय करू शकतात? त्यामुळे त्यांना इतिहास बदलायचा आहे. विशेषत: ज्याच्यामध्ये त्यांचा काडीचाही सहभाग वा योगदान नव्हते, तो स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास त्यांना पुसायचा आहे. म्हणून याबाबतीत वेगवेगळ्या अफवा, दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे, 1947 साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे 99 वर्षांच्या भाडेकरारावर दिले गेले. केवळ मूर्ख आणि आंधळेच विश्‍वास ठेवू शकतील अशा प्रकारचे हे पिल्लू सोडले गेल्यावर या देशात अशा मूर्ख, अंधांची काही कमी नाही, हे दिसलेच. नाहीतर, कंगनाने ज्या ठिकाणी वरील वक्तव्य केले, त्यावेळी त्या कार्यक्रमात अनेक लोकांनी टाळ्या वाजवल्या; ते कोण होते हे पहिल्याच मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्गसुद्धा या अंधमूर्खांत आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच कंगनाने या विधानातून अनेक पक्षी मारले, असे समजण्यास वाव आहे. पहिली गोष्ट म्हणजे, या विकृतीतून खर्‍या इतिहासाबद्दल गोंधळ निर्माण करून तो लोकांच्या मनातून पुसून टाकणे. दुसरी गोष्ट, तिच्या या विधानामुळे सगळे लोक तिच्याविरोधात टीकाटिप्पणी करण्यात मशगुल झाले. त्यामुळे देशातील महत्त्वाचे पेट्रोेल दरवाढ, महागाई, लोकांचे हलाखीचे बनलेले जगणे, या सगळ्यांकडे दुर्लक्ष झाले. नोटाबंदीच्या विध्वंसक निर्णयाला पाच वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्या नुकसानीची चर्चा मागे पडली. त्याचबरोबर या विद्वेषी अजेंडा येत्या फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी आवश्यक असल्याने तेही यातून साध्य झाले. मात्र, तिच्या विधानांकडे साफ दुर्लक्ष करणे, हा सर्वोत्तम मार्ग ठरला असता. परंतु, तिने ते जाहीर वक्तव्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो जणांनी प्राण दिले, त्या सर्वांचा अपमान करणारे आहे. त्याबद्दल तिला जाहीर माफी मागण्यास भाग पाडले पाहिजे. आणि, हा विषय त्वरित बाजूला ठेवून यामागे सरकारचा तो द्वेष पसरवण्याचा अजेंडा आहे, तो उघड करण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याची खरी गरज आहे.

Exit mobile version