दंगल नको,शांतता राखा

त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटून मालेगाव, नांदेड, अमरावतीमध्ये ज्या काही हिंसाचाराच्या घटना घडल्या त्या निषेधार्हच आहेत असेच खेदाने नमूद करावे लागेल. यावरुन राज्यातील विविध घटकांमध्ये किती असंतुष्ट आत्मे आहेत हे प्रकर्षाने दिसून आले. कारण महाराष्ट्रात दंगल घडवून राज्यातील कायदा, सुव्यवस्था मोडून काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात काही असंतुष्ट घटकांना विकृत समाधान मिळत असते. त्याचेच हे उदाहरण म्हटले पाहिजे. वास्तविक घटना त्रिपुरातील.त्याचे इतके तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची काहीही गरज नाही. याचाच अर्थ कोणत्याही कारणावरुन समाजात अशांतता निर्माण करण्याची विकृत सवय लागलेल्या प्रवृत्तीचेचे हे कृत्य आहे असेच खेदाने नमूद करावेसे वाटते. त्रिपुरात मुस्लिम समाजावर अन्याय होत असेल तर त्याचा लोकशाही मार्गाने निषेध करणे हे लोकशाही संकेताला धरुन योग्य आहे. पण त्यावरुन जर महाराष्ट्रात मालेगाव, नांदेड, अमरावती सारख्या संवेदनशील भागात दंगल निर्माण होत असेल तर ते अतिशय चिंताजनकच म्हटले पाहिजे. घटना कुठलीही असो त्याचे पडसाद महाराष्ट्रात अनेकदा उमटलेले आहेत. त्यावरुन समाज किती संवेदनशील बनत चाललाय हे त्यावरुन दिसून येते.वास्तविक सध्या सर्व राज्य, देश कोरोनासारख्या महामारीतून संक्रमण करीत आहे. अजूनही कोरोनाचे संकट दूर झालेले नाही. दररोज रुग्णसंख्या वाढतेय.शेकडो जणांचे बळीही जात आहेत. सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करुन साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आधी लॉकडाऊन करुन साथीला काही प्रमाणात अटकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या पहिल्या साथीत तर मालेगाव राज्यातील सर्वाधिक हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते. तेथे महत्प्रयासाने ही साथ आटोक्यात आणली गेली. त्यासाठी लॉकडाऊन सक्तीने करावा लागला.त्यात सर्वांचेच रोजगार बुडाले. त्यातून सावरण्यासाठी सरकारने अनलॉकची पद्धत अवलंबून महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान केले आहे. ते सुरु असतानाच आता पुन्हा जातीय दंगलीने महाराष्ट्र ठप्प राहणार असेल तर ते कुणालाच न परवडणारे असेच आहे. यासाठी सरकारने आता कठोर पाऊले उचलून मालेगाव, अमरावती, नांदेडच्या कथित दंगलीमागे कोण घटक आहेत. त्यांचा अशा दंगली भडकाविण्यामागे काय हेतू आहे याचा उलगडा करणे गरजेचे आहे. कारण आता अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला न परवडणार्‍या आहेत. ज्यांची हातावरची पोटे आहेत अशा घटकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न यानिमित्ताने उभा राहणार आहे. मालेगाव, नांदेड, अमरावतीच्या दंगलीचे निमित्त करुन भाजपने लगेच बंदचे आवाहन केलेले आहे. यामागेही भाजपची राजकीय चालच आहे हे सर्वांनाच माहित आहे. सत्ता गेल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपला अशा घटनातून राजकारण करायचे आहे. हे यावरुन उघड आहे. वास्तविक अशा दंगलीच्या वेळी तरी भाजपसारख्या जबाबदार राजकीय पक्षाने आणि राज्याचे नेतृत्व केलेल्या भाजपच्या नेतेमंडळींनी राजकारण न करता दंगलग्रस्त भागात शांतता कशी निर्माण होईल, यासाठी राज्य सरकारला काय सहकार्य करता येईल हे गांभीर्याने पाहणे उचित ठरेल. उगीच पराचा कावळा करायला गेलात तर त्याचे गंभीर परिणाम भाजप आणि अशा घटनांना प्रोत्साहन देणार्‍या नेत्यांनाच भविष्यात बसू शकतील हे लक्षात ठेवणे योग्य ठरेल. मालेगाव, नांदेड, अमरावतीमधील सर्वच समाजानी देखील समंजस्याची भूमिका घेत शांतता निर्माण करण्यावरच विशेष भर दिला पाहिजे. कारण सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांना बसतोय. त्यामुळे उगीच कुणाच्या सांगण्यावरुन जर डोकी भडकून आपल्याच शहरातील शांतता भंग करणार असाल त्याची झळ तुम्हालाच बसणार आहे हे लक्षात ठेवावे. त्रिपुरातील जी काही घटना घडली ती निषेधार्ह अशीच आहे. पण त्या घटनेचा निषेध व्यक्त करायचा म्हणून हातात जर धोंडा घेणार असाल तर ते योग्य ठरणारे नाही. कारण त्यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सर्व व्यवहार दीड वर्षे बंदच होते. त्यावेळी दोन वेळच्या खाण्याचे देखील वांदे झालेले होते. त्यानंतर जर अशा दंगली घडवून महाराष्ट्र बंद पडणार असेल तर राज्याला न परवडणारे असेच आहे. यासाठी संयम राखा, अजूनही वेळ गेलेली नाही. आग लागली असली तरी त्यावर फुंकर मारुन भडकावण्यापेक्षा ती आग विझवून टाका आणि संयमाने, शांततेने रहा. तुम्हीही शांततेत जगा आणि सर्वसामान्यांनाही शांततेने जगू द्या, एवढेच सांगणे यानिमित्ताने.

Exit mobile version