लसीकरणानंतरचे दखलपात्र निष्कर्ष

उर्मिला राजोपाध्ये

एकीकडे कोरोना लस घ्यायला नागरिक तयार नसताना दुसरीकडे कोरोना लस घेतल्यानंतर दहा आठवड्यानंतर प्रतिपिंडं (अँटीबॉडीज) तयार करण्याचं काम कमी होतं, असा एक निष्कर्ष समोर आला आहे. दुसर्‍या निष्कर्षानुसार तीस टक्के लोकांवर लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्याचा दावा केला जात आहे. अर्थात हे प्रारंभिक निष्कर्ष असून, त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. लंडनच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इन्फॉर्मेटिक्स’च्या शास्त्रज्ञांना आढळलं की कोरोनाची लस घेतल्यानंतर दहा आठवड्यांनी लसीने कोरोनाविरुद्ध बनवलेल्या अँटीबॉडीज कमी करण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. लसीकरणानंतर लस किती काळ प्रभावी राहील, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. अभ्यासाच्या निष्कर्षानंतर आता खरोखर आणखी बूस्टर डोस घेण्याची गरज असेल का, अशी शंकाही मनात येते. त्यासाठी या अभ्यासाचे निष्कर्ष मुळातून पाहायला हवेत. फायझर आणि अ‍ॅस्ट्राझेनेका या लसींपासून बनवलेल्या अँटीबॉडी सहा आठवड्यांनंतर कमी होऊ लागतात. दहा आठवड्यांनंतर फक्त पन्नास टक्के अँटीबॉडी तयार होतात. या अभ्यास गटाने 50-70 वर्षं वयाच्या लसीकरण झालेल्या 605 लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांचं विश्‍लेषण केलं आहे. त्यांना आढळलं की सर्व व्यक्तींमध्ये अँटीबॉडीची पातळी भिन्न असते; परंतु फायझरच्या लसीने अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीपेक्षा अधिक प्रतिपिंडं तयार केली. ‘लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या निकालांमध्ये, संशोधकांनी 4,500 सहभागींवर केलेल्या अभ्यासात असा कल पाहिला.
लसीकरणाच्या काही आठवड्यांनंतर अँटीबॉडीजच्या पातळीत घट झाल्याने चिंता करण्याची गरज नाही, असाही संशोधकांचा दावा आहे. लसीचा प्रभाव कमी होऊ शकत असला तरी यामुळे लोक संक्रमणाला बळी पडत नाहीत. कोरोनाविरूद्ध संरक्षणात अँटीबॉडीची पातळी महत्त्वाची आहे; परंतु रोगप्रतिकारक शक्तीकडे कोरोनाशी लढण्यासाठी इतर शस्त्रं आहेत. मेमरी बी पेशी विषाणू लक्षात ठेवतात आणि संसर्ग होतो, तेव्हा लगेच प्रतिपिंडं तयार करण्यास सुरुवात करतात. साथीच्या आजारांशी संबंधित तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, केवळ अँटीबॉडीच्या पातळीचा संरक्षण म्हणून विचार करणं योग्य ठरणार नाही. लसीमुळे आपल्याला अनेक स्तरांवर संरक्षण मिळतं आणि ते किती काळ उपलब्ध असेल, याबद्दल अधिक अभ्यास आवश्यक आहे. संशोधकांनी फायझर आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसींच्या प्रभावीतेची तपासणी केली आहे. ते म्हणतात की अभ्यासाचे निकाल सुचवतात की अ‍ॅस्ट्राझेनेका लस घेतलेल्यांनी काही महिन्यांनंतर बूस्टर डोस घ्यावा. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजचे प्रोफेसर रॉब अल्ड्रिज म्हणतात की सुरुवातीला अँटीबॉडीज जास्त असतात आणि काही काळानंतर त्या कमी होऊ लागतात. या दराने अँटीबॉडीजची पातळी कमी होत राहिली तर लसीचं संरक्षणदेखील कमी होऊ लागेल. अँटीबॉडीज हा जोखीम मोजण्याचा परिपूर्ण मार्ग नाही.
इस्त्रायलसह अनेक देशांनी उच्च जोखमीच्या गटाला बूस्टर डोस लागू करण्यास सुरवात केली आहे. बूस्टर डोसच्या गरजेमागे डेल्टा व्हेरिएंट हादेखील एक तर्क आहे. हा व्हेरिएंट सध्या 125 पेक्षा जास्त देशांमध्ये सक्रिय आहे. भारतात, 86 टक्के नवीन प्रकरणं डेल्टा प्रकारातली आहेत. अमेरिकेने म्हटलं आहेे की लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता असू शकते; परंतु या संदर्भात अधिक संशोधन केले जात आहे. लसीचं मिश्रण आणि जुळणी धोरणदेखील विचारात घेतलं जात आहे. संशोधनाच्या निकालानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे की लसीचा बूस्टर डोस किती महत्त्वाचा आहे याबाबत अजून वैज्ञानिक संशोधन झालेलं नाही. विकसित देशांना लसीचा बूस्टर डोस देण्याऐवजी, लसीची कमतरता असलेल्या देशांना ही लस द्यावी.
भारताला जास्तीत जास्त लोकसंख्येचं लसीकरण करायचं आहे. त्यानंतरच, संशोधनाच्या निकालांच्या आधारावर, आवश्यकतेनुसार लसीच्या बूस्टर डोसवर निर्णय घेतला जाईल. फायझर आणि मॉडर्ना लसींच्या प्रभावीतेवर लंडनमध्ये केलेल्या अभ्यासात दिसून आलं आहे की डेल्टा प्रकारामुळे बाधित व्यक्तीला हॉस्पिटलायझेशनपासून वाचवण्यासाठी फायझरचे दोन्ही डोस 96 टक्के प्रभावी आहेत. भारत बायोटेकने कोवॅक्सिनच्या फेज-3 चाचणी डेटामध्ये डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध लसीची 65 टक्के प्रभाविता नोंदवली आहे. रशियन लस स्पुटनिक व्ही डेल्टा प्रकाराविरुद्ध 90 टक्के प्रभावी आहे. डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध चीनी लस सिनोव्हाकची प्रभावीता कमी झाली आहे. थायलंडमध्ये ही लस घेणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांनी चीनी लस घेतली तेव्हा त्यांना अ‍ॅस्ट्राझेनेकाचा तिसरा डोस देण्यात आला. आखाती देशांनाही चिनी लस मिळाली होती आणि तिथे प्रकरणं वाढली तर फायझरचा तिसरा डोस बूस्टर डोस दिला जाणार आहे.
दरम्यान, लसीकरणानंतर 30 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्याला लसीकरण कारणीभूत आहे. लसीच्या दुष्परिणामांवर संशोधन करणार्‍या नॅशनल अ‍ॅडव्हर्स इव्हेंट्स फॉर वॅक्सिनेशन समितीने हे उघड केलं आहे. समितीने अशा 88 प्रकरणांचा अभ्यास केला. यापैकी 22 प्रकरणांमध्ये अस्वस्थता हे दुष्परिणामाचं कारण होतं. संशोधन अहवालानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्वस्थतेची जास्त प्रकरणं आढळली आहेत. या अस्वस्थतेचं एक प्रमुख कारण म्हणजे सुईची भीती. याला ‘सुई फोबिया’ म्हणतात. अस्वस्थतेची तक्रार करणार्‍या 22 लोकांपैकी 16 जणांना कोविशिल्ड लस मिळाली तर बाकीच्यांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा अस्वस्थतेला लसीकरणानंतरचा दुष्परिणाम मानला जाऊ नये. कोव्हिडची लस अद्याप नवी आहे. त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात, हे पूर्णपणे माहीत नाही. म्हणूनच लोक लस घेतल्यानंतर जास्त काळजी करतात. परिणामी चिंता वाढते. लस घेतल्यानंतर, झोप येणं, श्‍वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणं दुष्परिणामांच्या कक्षेत येतात. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप वोहरा म्हणतात की, काळजीमुळे कोरोना लसीची प्रभावीता कमी होऊ शकते. चिंता आणि तणाव रोगप्रतिकारक शक्तीला थेट कमकुवत करतात. यामुळे रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते आणि जळजळ देखील होऊ शकते. डॉ. वोहरा पुढे म्हणतात की, अनेक लोक सुयांना घाबरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी लस घेणार्‍यांनी पुढे येऊन जनजागृती करावी. अशा प्रकारे, नवीन लोकांचा आत्मविश्‍वास वाढेल आणि भीती कमी होईल. लस घ्यायला जाताना मनातल्या दुष्परिणामांची भीती काढून टाकणं आवश्यक आहे. लस घेण्यापूर्वी काही दिवस व्यवस्थित झोप घेणं, अल्कोहोलपासून कटाक्षाने दूर राहणं आणि अनावश्यक काळजी करणं थांबवलं पाहिजे. इंजेक्शन ही एक किरकोळ प्रक्रिया आहे, त्यापासून घाबरण्याची गरज नाही, अशी मानसिकता करून गेल्यास लसीकरणाचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत.

Exit mobile version