क्रूझ आऊट ऑफ कंट्रोल!

अजय तिवारी

आणखी एका हाय प्रोफाईल नशेबाजी प्रकरणाने परवा अवघ्या चित्रसृष्टीची तसंच अंमली पदार्थांचा गजबजाट अनुभवणार्‍या विश्‍वाची झोप उडवली. यातून नैतिकतेबरोबरच गुन्हेगारी वृत्तीचाही प्रश्‍न उपस्थित झाला. समाजासाठी, चित्रसृष्टीसाठी हा विषय अनपेक्षित नाही. मात्र बदलत्या काळात तो जुन्या संदर्भानिशी आणि ठराविक पठडीतच समोर येत आहे. यातून संबंधित तसंच उच्चभ्रू समाज धडा घ्यायला तयार नाही, हेच खरं.
एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला असेल तर तीच गोष्ट त्याला सर्वत्र दिसते. स्वप्नातही त्याच गोष्टी त्याच्या नजरेपुढे नाचतात. मात्र त्या प्रत्यक्षात अवतरल्या तर काय स्थिती होते, हा पुढल्या चिंतनाचा विषय. एका लोकप्रिय गाण्यात ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असं म्हटलं होतं. कधी कधी अजाणतेपणे किंवा विनोदाने एखादं वाक्य उच्चारावं आणि ते प्रत्यक्षात यावं, हा काळानं उगवलेला सूडही असू शकतो. असंच काहीसं शाहरुखच्या बाबतीत घडलं आहे. काही गोष्टी गांभीर्यानं घ्यायच्या असतात, त्याचा विनोद करायला गेलं की अंगलट येतो. सुपरस्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन याच्याबाबतीत आता ते प्रत्यक्षात घडलं आहे. ‘हेच फळ काय मम तपाला’ असं म्हणण्याची वेळ शाहरुखवर आली आहे. मुलाला अटक झाल्यानंतर शाहरूखच्या 24 वर्षांपूर्वीच्या वक्तव्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये शाहरुख पत्नी गौरी खानसोबत गेला होता. त्यावेळी त्याने गमतीत म्हटलं होतं की त्याच्या मुलाने त्या सर्व वाईट गोष्टी केल्या पाहिजेत, ज्या तो स्वत: तरुणपणी करू शकत नव्हता. शाहरुख म्हणाला होता, ‘माझ्या मुलाने मुलींना डेट केलेलं मला पहायचं आहे, त्याने सेक्स आणि ड्रग्जचाही आनंद घ्यावा. तो एक वाईट मुलगा बनला पाहिजे आणि जर तो एका चांगल्या मुलासारखा दिसू लागला तर मी त्याला घराबाहेर फेकून देईन.’ शाहरुखने विनोदी पद्धतीने सांगितलेली तीच बाब आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे.
वडिलांनी कष्टानं कमावलेल्या पैशाची किंमत न कळणं आणि पोरांनी ते व्यसनांवर उडवणं हे पाप आहे. अनेक बड्या बापांची मुलं अशीच बिघडतात, व्यसनांच्या आहारी जातात. पैसा फेकला की आपलं कर्तव्य संपलं, असं मानणारे बाप असल्यावर दुसरं काही होत नाही. शाहरूख खानचा मुलगा आर्यन क्रूझवरील नशेबाजांच्या बेकायदेशीर पार्टीत पकडला गेल्यानं बातमीचा विषय झाला असला तरी यापूर्वी अशी बर्‍याच बापांची मुलं अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची उदाहरणं आहेत. मागे पुण्यातही ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्‍वासराव नांगरे पाटील यांनी रेव्ह पार्टीचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यातही एका मराठी अभिनेत्रीसह बड्या धेंडांची मुलं आढळली होती. त्यामुळे ताज्या प्रकरणाकडे पाहताना धनाढ्यांच्या आयुष्यात ठाण मांडून बसलेल्या बेपर्वाईची, बेफिकिरीची आणि रगेल वृत्तीची नव्याने साक्ष निघाली आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आर्यन खानचा फोन जप्त केला. आर्यनला क्रूज ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी असल्याबद्दल एनसीबीने ताब्यात घेतलं. आर्यनसह एकूण आठजणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये तीन मुली आहेत. या प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमीचा, नुपूर सारिका, इश्मीत सिंग, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, मोहक जसवाल यांची चौकशी केली होती. दिल्लीच्या एका बड्या उद्योगपतीची मुलगीही यात सामील असल्याचं सांगितलं गेलं. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या क्रूझवर एनसीबीने मारलेल्या छाप्यांमध्ये हशिश, एमडी, कोकेनची मोठी मात्रा सापडली. तीन दिवसांपूर्वी एनसीबीला या ड्रग पार्टीची माहिती मिळाली. या पार्टीत सामील होण्यासाठी 80 हजार ते पाच लाख रुपये आकारण्यात आल्याचं उघड झालं. या माहितीच्या आधारे, एनसीबीचे काही अधिकारी पार्टीत सामील होण्याच्या बहाण्याने क्रूझमध्ये दाखल झाले. पार्टीतलं दृश्य पाहिल्यानंतर या टीमने बाहेर बसलेल्या अधिकार्‍यांना माहिती दिली. यानंतर एनसीबीच्या टीमने छापा टाकला. या घटनेचा परिणाम शाहरूख खानच्या व्यावसायिक जीवनावरही झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख खान आपल्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना होणार होता. स्पेनमध्ये शाहरूख आणि दीपिका पादुकोण यांच्यावर एक गाणं चित्रीत होणार होतं; परंतु आर्यन खानला झालेल्या अटकेमुळे शाहरूख खान या प्रकरणाकडे ओढला गेला. आर्यनचा मित्र अरबाज सेठ मर्चंट याचं अंमली पदार्थांशी जास्त जवळचं नातं असल्याचं बोललं जातं. आर्यन खान आपलं आयुष्य जास्तीत जास्त खासगी राखणं पसंत करतो. चित्रपटसृष्टीत होणार्‍या मोठ्या पार्ट्यांमध्ये आर्यनचा खूपच कमी सहभाग असतो. त्यामुळे क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीत आर्यन खानचं नाव समोर आल्यावर बॉलिवूडसह त्याचे मित्रही आश्‍चर्यचकित झाले आहेत. ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकाने या सर्वांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. त्यातून बरेचजण ये-जा करत असत किंवा त्यावर अशा पार्ट्या नियमितपणे व्हायच्या अशी चर्चा ऐकायला मिळत नाही. त्याचप्रमाणे आर्यन खानचा या प्रकरणात थेट समावेश होता की नाही, त्याने ड्रग्ज खरेदी केले होते का नाही यासंदर्भात स्पष्ट माहिती मिळत नाही. अर्थात न्यायालयात हे प्रकरण तडीस निघेलच. मात्र अशा बाबतीत चित्रसृष्टीतल्या बड्या धेंडांची आणि त्यांच्या चिरंजिवांची कुख्यातीच पहायला मिळते. अवघं सुशांतसिंग राजपूत प्रकरण या धाग्याभोवतीच गोवलं गेलं. त्यातून बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन नव्याने अधोरेखीत झालं आणि बराच तपशिल उघड झाला पण यामुळे घडणार्‍या घटनांना चाप बसला नाही. मोठ्या वलयांकित कलाकारांची मुलं-मुली ड्रग्ज केसमध्ये अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये ड्रग्जसेवनाचे प्रकार घडत आले असून त्याबद्दलची माहिती दबक्या स्वरात ऐकायला मिळाली आहे. अनेक वेळा अशी प्रकरणं समोरही आली; मात्र तपासातून फार काहीच निष्पन्न झालं नाही. चित्रपटसृष्टीतल्या काही मंडळींना ड्रग्ज सेवनासाठी तुरुंगात जावं लागलं आहे तर काहींना ड्रग्जच्या विळख्यातून सुटण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटरचा आधार घ्यावा लागला आहे. मोठ्या कलाकारांच्या मुलांचा विषय निघतो तेव्हा सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तचा उल्लेख येतो. आई नर्गिस दत्त यांचं निधन झाल्यानंतर संजयचं ड्रग्जसेवनाचं प्रमाण वाढलं होतं. ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी, यासाठी सुनील दत्त यांनी संजयला अमेरिकेतल्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलं होतं. तिथून ठिक होऊन परतल्यानंतर संजयने चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं. अभिनेते फिरोझ खान यांचा मुलगा फरदीन खानला 2001 मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्जसह पकडलं होतं. चित्रपटात बर्‍यापैकी यश मिळत असतानाही फरदीनला ड्रग्जची सवय लागली होती. यातून सुटका होण्यासाठी त्याला प्रदीर्घ अशी कायदेशीर लढाई लढावी लागली. रिहॅबिलेशन सेंटरच्या माध्यमातून उपचार घेतल्यानंतर त्याने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती.
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. बिघडणारी अवस्था पाहून त्याला रिहॅब सेंटरमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याची ड्रग्जची सवय सुटली. प्रतीक आता सुरळीत आयुष्य जगत आहे आणि त्याने चित्रपटांमध्येही पुनरागमन केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन ड्रग्जप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. त्याच्यावर ड्रग्जसेवनाचा आरोप होता. त्यासाठी त्याला तुरुंगातही जावं लागलं. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती ढासळली तेव्हा त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राहुलने सर्व आरोप फेटाळले होते. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर यांचीही नावं ड्रग्ज सेवनाप्रकरणी समोर आली होती. सुशांत राजपूतच्या कथित ड्रग्जसेवनाच्या व्यसनाशी संबंधित प्रकरणांची एनसीबीकडून चौकशी सुरू असताना सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासह रकुलप्रीतसिंह आणि दीपिका पदुकोणचं नाव समोर आलं होतं.
ताज्या प्रकरणात क्रूझवर सहभागी लोकांनी आपल्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडवेअरच्या शिलाईच्या भागात आणि कॉलरच्या शिलाईत ड्रग्ज लपवल्याचं समोर आलं आहे. दोन हजार प्रवासी क्षमता असलेल्या या क्रूझ शिपमध्ये एक हजारांहून कमी लोक प्रवास करत होते. पार्टीचं निमंत्रण इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरून देण्यात आलं होतं. त्यासाठी काही लोकांना विशेष किट भेट देऊन आमंत्रित करण्यात आलं होतं. या क्रूझ शिपवर आलेले बहुतांश लोक दिल्लीतले होते. विमानातून ते मुंबईला आले आणि नंतर क्रूझवर गेले होते. या प्रकरणाचा छडा लवकरच लागेल पण, त्याची कुप्रसिध्दी लक्षात घेता चित्रसृष्टी योग्य तो धडा घेईल, अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version