विनोबांचे राजयोगी-रणजितभाई देसाई

सुभाष वि. पाटील

पवनार-सेवाग्राम आश्रमाचे अर्ध्वयु रणजितभाई देसाई यांचे .28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8ः30 वाजता निधन झाले. त्यांना नव्वद वर्षाचे दीर्घायु लाभले. त्यांनी केलेले रचनात्मक व्यापक सेवाकार्य पाहता व त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया होऊनही त्यांना लाभलेले हे त्यांचे आयुष्य म्हणजे जीवनाच्या अखेरपर्यंत योगी पुरूषासारखे होते.त्यांच्या ग्रामसेवेचे रचनात्मक कार्याचे केंद्र असलेल्या गोपुरी जि.वर्धा येथील निवासस्थानी त्यांची जीवनज्योत अनंतात विलीन झाली. त्यांचा अंत्यविधी पवनार आश्रम परिसरात करण्यात आला आहे.
मौनातील सामर्थ्य ः गुजरातच्या बलसाड येथून सन 1950 मध्ये रणजितभाईंनी आपले बी.एससीचे शिक्षण पूर्ण करून सर्वोदय कार्यासाठी वर्धा येथे विनोबांच्या सान्निध्यात आले आणि जीवनाच्या अखेरपर्यंत विनोबांच्या सर्वोदयाच्या ग्रामसेवेच्या कार्यात आपले जीवन वाहिले. हे त्यांचे देशासाठीचे समर्पित मोठे योगदान आमच्यासाठी सदैव प्रेरक आहे. आमच्यासाठी ते खरे आयडॉलच होते. पवनार आश्रमात विनोबांच्या शांतीसेनेचे संयमी सेनापती म्हणून आमच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे. विनोबा आणि रणजितभाई यांचे नाते पितापुत्रासमान होते. वर्धा परिसरात व देश विदेशात गांधी-विनोबांच्या स्वप्नातील तंतोतंत सर्वोदयी मार्गाने जे आश्रमीय ग्रामसेवेचे कार्य झाले ते ज्या अनेक थोर व्यक्तिंनी केले अशा थोर व्यक्ति जगभरातून रणजितभाईंचे स्थान फार वरचे आहे. मौनात किती प्रचंड कार्य होऊ शकते याचे मोठे उत्तम भावसपन्न उदाहरण म्हणजे रणजितभाईंचे समस्त जीवन कार्य आहे.
महात्मा गांधी,विनोबांकडे एकाहून एक सरस असे विश्‍वास समाजसेवेत बलिदानात तयार असलेल्या सेवासमर्पित तरूण शांतीसेनेची संयमी दृढनिश्‍चयी फौज होती. या फौजेतील अग्रेसर अशापैकी रणजितभाई देसाई होते. रणजितभाईंकडे काम करणारी मंडळी वर्धा, पवनार, सेवाग्राम, खानापूर, शेलू, सूरगाव या आश्रम परिसरातील खेडेगावातील तरूणाई जशी होती तशीच देशाच्या कानाकोपर्‍यातील तरूणाई होती. रणजितभाईंच्या विशाल मातृपितृहृदयी स्नेहसान्निध्यात ती घडली. यामुळे विचारांची दृष्टी येऊन आपापल्या कार्यक्षेत्रांत पारंगत झाली. कारण रणजितभाईंच्या जीवन पध्दतीत गांधी विनोबांच्या शिक्षण विचारांचा आश्रमीय दृष्टीकोन होता.प्रशिक्षण आधी, काम नंतर अशी वेळखाऊ व खर्चिक तसेच जिवनाशी संबंधीत नसलेली,परावलंबी जीवन पध्दतीच्या दिवाळखोर प्रशिक्षणाची पध्दत रणजितभाईंची नव्हती. काम प्रशिक्षण-स्वावलंबन हे एकमेकांना होणारी अभिन्न आवडीची जीवन प्रक्रिया असल्याचे मला रणजितभाईंच्या संपर्कात समजले. रणजितभाईच्या कार्याची गणना होऊ शकणार नाही. इतके मोठे व्यापक असे त्यांचे जीवनकार्य आहे. वर्धा परिसरात व देशात त्यांच्या कार्यातील गांधी, विनोबा विचारांची आश्रमीय छाप व एखाद्या शिलालेखाप्रमाणे सदैव राहील.
सर्वोदयाचा केंद्रबिंदू ग्रामसेवा- गांधीवादाचा -सर्वोदय कार्याचा केंद्रबिंदू ग्रामसेवेत आहे. हे ग्रामसेवेचे कार्य अजूनही तसे अधिकाधिक उपेक्षितच आहे. अशा उपेक्षित कार्यात ग्रामसेवा हेच सर्वोदयाचा केंद्रबिंदू समजून रणजितभाईंनी ग्रामसेवेच्या अर्थशास्त्र विकासातील पथदर्शी असे कार्य केले आहे. या कार्यानी अनेक तरूण प्रेरित होऊन भारताच्या विविध उपेक्षित ग्रामीण भागात सेवा करीत आहेत. रणजितभाईंकडे कधीच चमकणे वा प्रसिध्दीचा ओढ ही वृत्ती शोधूनही सापडणार नाही. पण त्यांचे कार्य मात्र स्वयंप्रकाशी सूर्यनारायणासारखे असूनही यात चंद्राच्या प्रकाशासारखे शांत, कोमल, शीतल, संयमी, निरभ्रता होती.इतका त्यांच्या कार्याचा प्रभाव आमच्यावर होता. त्यांनी आश्रमाला व परिसरातील गावोगावी आपल्या कार्यानी मोठेे वैभव प्राप्त करून दिले होते. रणजितभाईंच्या कर्तृत्वाचा आवाका मोठा विस्तीर्ण व व्यापक आहे. परंधाम प्रकाशन परंधाम मुद्रणालय, परंधाम आश्रम शेती, गोशाळा, ॠषीशेती, कांचनमुक्ती, गोपूरीचे विविध ग्रामस्वावलंबी ग्रामोद्योग केंद्र, खादी कार्य या त्यांच्या सर्व कार्यात समग्र ग्रामविकासाचे केंद्रबिदू स्पष्ट होते असे. अनेकांना या कार्यात सामावून घेऊन स्थानिक तसेच राष्ट्रीय कार्यकर्ते घडवले, उभे केले, हा मोठा सामुदायीक साधनेचा आविष्कार आम्हां देशभरातील सर्वोदय कार्याकर्त्यांना प्रेरणा देत असे.देशाच्या विविध प्रांतातील सर्वोदय बुक भांडार, खादी ग्रामोद्योग भांडार चालवणारे होतकरू कार्यकर्त्यांनी त्यांनी खंबीर मैत्रीचा आधार देऊन उभे केले. यशस्वी केले. तसेच राज्यात देशात सर्वोदयी आश्रमीय विचारांच्या सेवा संस्था निर्माण करणार्‍या नवनवीन युवा कार्यकर्त्यांची सर्वोदयात परंपराची मालिका निर्माण करण्यात मोठा हातभाार रणजितभाईंचा आहे. रणजितभाईंना गांधी विनोबांच्या आश्रमीय जीवनातील रचनात्मक कार्याच्या परंपरेचा मोठी पक्की अचूक दृष्टी होती. त्यांनी हा वारसा समर्थपणे निष्ठेने यशस्वी चालवला आहे. त्यामुळे आश्रमात अनेकांना ही दृष्टी मिळून अनेक तरूण रचनात्मक सेवेत अग्रेसरपणे पुढे आलेले पाहायला मिळतात.
रणजितभाईंनी आपल्या एकूलत्या कन्या रत्नाला शाळेत न पाठवता विनोबांच्या तालमीत घडविले हा त्यांचा विनोबावरील गाढ विश्‍वासाचे व विनोबाविचारांच्या अभ्यासांचे प्रतिक आहे. असे धाडस हिम्मत रणजितभाईंकडे व फार मोजक्या मातापित्यांकडे मला पाहायला मिळाले. रणजितभाईंचे साधे जीवन ॠषीतुल्य होते. या बापलेकीच्या कार्यांचे मोल देशासाठी अनमोल आहे. विश्‍वाकरताही मोठे प्रेरक आहे. त्यांच्या कन्येकडे एखाद्या विषयातील पदवी नसली तरी अनेक विषयातील त्यांची पारंगतता मोठी विस्मयकारक पूरक आहे. देशदुनियेतून लोक विद्यार्थी त्यांचे काम पाहायला मार्गदर्शनासाठी येतात.
आश्रमाचे अध्वर्यु- गांधी विनोबांचे आश्रम म्हणजे विश्‍वाला शांतीचा, अंहिसेचा मार्ग मिळणारे स्थान म्हणून मानवाला मोठे प्रेरक आहेत. विश्‍वशांतीसाठी जसे या आश्रमस्थानांचे महत्व आहे. तसेच समाजाच्या मानवी निकोप विकासासाठीही महत्व आहे. याचा वस्तुपाठ गांधीविनोबांच्या या आश्रमांतून मिळतो. याचे मूर्तिमंत दर्शन रणजितभाईंच्या सान्निध्यात आश्रमात आम्हांला झाले. या आश्रमसंस्था आपल्या पिढ्यानपिढ्यासाठी प्रेरणेचे जीवन वारसा आहेत, या आश्रमात मी यापुढे कधीही गेलो. तरी रणजितभाईंच्या भेटीविना मला पोरकेपणा वाटणार एवढं मात्र खर आहे.परंतु रणजितभाईंचा आश्‍वासक आवाज येईल ते म्हणतील, तुम्ही सर्व गांधीविनोबांचे कार्यकर्ते निष्ठावंत राहाल तोपर्यंत ती तुमच्या कार्यात सोबत आहेच. दुःख करू नको असे म्हण्ाून तेच माझे सांत्वन करतील.
विनोबांचे वरदान- रणजितभाईंच्या या व्यापक कार्याच्या या दर्शनाबरोबर त्यांच्या सुक्ष्म कार्याचा शोधही मोठा प्रकाशदायी आहे. हा त्यांच्या सुक्ष्म कार्याचा शोध विनोबांच्या पुस्तकांतील पहिल्या पानावरील रणजितभाईंच्या प्रकाशकीय मनोगतील अगदी मोजक्या शब्दात सापडतो. एखाद्या पुस्तकाचा इतक्या कमी शब्दात नेमका परिचय करून देण्याचे त्यांच्या प्रकाशकीय मनोगताला सूत्रमय मंत्राचे सामर्थ्य आले. ॠषितुल्य सान्निध्य- विनोबाजीकडे आश्रमात असताना मला रणजितभाईंच्या सान्निध्यात राहायला मिळाले. त्यांच्या समग्र जीवनाला गांधीविनोबा विचारांचे आश्रमीय सुगंधी प्रकाश वलय होते. गांधीजी-विनोबा-आश्रम या तीन शब्दांचा व त्यांतील अक्षरांचा सगुण निगुर्ण बराच विस्तार व्यक्त अव्यक्तपणे माझ्या हृदयपटलावर पवनार आश्रमात रणजितभाईंनी केल्यामुळे गांधीविनोबा विचारांचा जीवनमार्ग मिळाला. गांधी विनोबा साहित्याच्या प्रचारासाठी दरवर्षीच्या साहित्य संमेलनात पुस्तक महोत्सवात हमखास मला आपल्यासोबत घेऊन काम करण्याची संधी रणजितभाई देत असत. कर्जतला (जि.रायगड) घरी रणजितभाई मला भेटायला व मी करीत असलेले काम पाहायला तीन चार वेळा आले. आठ दहा दिवस मुक्कामी राहिले. त्यांचे येणे-राहणे म्हणजे गांधीविनोबा आश्रमाचा घरभर प्रकाश पडे इतका आनंद मिळत असे. कर्जत नगरपरिषदेतर्फे त्यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रमही आम्ही आयोजित केला होता, शाळाकॉलेजमध्ये गांधी विचार अभ्यासातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमासाठीही त्यांना बोलावले होते. शाळाकॉलेजमधील विद्यार्थ्यानाही त्यांचा परिचय करून त्यांच्या मुलाखतीचा खास कार्यक्रमही आयोजित करून समाजाचे भविष्य असलेल्या तरूणाईला गांधी विनोबा विचारांचे पाणी रणजितभाईंच्या ओजळीने पाजले. यावेळी या तरूणांचा मोठा उत्साही प्रतिसाद मिळाला होता. रणजितभाईंच्या सोबतच्या आठवणी मला थेट गांधी विनोबांच्या जवळ घेऊन जातात हेच त्यांच्या समग्र जीवनाचे मला उमगलेले सार होते. एकादशव्रताच्या सामुहीक साधनेची सर्वोदयी रचनात्मक कार्यातील गांधी विनोबांची आश्रम परंपरा अखंडीपणे जीवनभर चालवणारे रणजितभाईंना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

Exit mobile version