शिवचरित्राचा जिता जागता इतिहास

प्रा. नंदकुमार गोरे

बाबासाहेब पुरंदरे हे नावच पुरेसं भारदस्त आहे. ते स्वतःला इतिहासरकार किंवा संशोधक म्हणत नसतं. कायम त्यांनी शिवशाहीर म्हणवून घेतलं. बाबासाहेब हे शिवशााहीर म्हणून जरी माहिती असले, तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतरच्या दहा वर्षानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. कोपरगाव तालुक्यात ते पूर्णवेळ प्रचारक होते. ते कोपरगावातील अनेक कार्यकर्त्यांकडं राहिले. त्यांच्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बागूल यांच्या एका नागरी सत्कार समारंभाला ते आले, तेव्हा त्यांनी दोन दिवस कोपरगावला मुक्काम केला. त्या वेळी त्यांनी जागविलेल्या आठवणी चिरकाळ स्मरणात राहणार्‍या होत्या.
बाबासाहेब, पु.लं, कौसल्याबाई कोपरगावकरीण एका बैठकीला एकत्र होते. त्या वेळी बाबासाहेबांनी त्यांना लावणी सादर करायला सांगितली. कौसल्याबाई कोपरगावकरीण कोण हे अगोदर सांगायला हवं. त्या पहिल्या तमाशा कलावंत. त्यांचं गाण, नाचणं शृंगारिक होतं. परंतु त्यात बीभत्सपणा नव्हता. बाबासाहेबांना त्यांनी पेचात टाकणारं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, की भाईंनी हार्मोनियमवर साथ दिली, की मी लावणी सादर करील. बाबासाहेबांनी भाईंना कौसल्याबाईंची फर्माईश सांगितली. भाईंनी ती पूर्ण केली. ती मैफल अजरामजर झाली नसती, तरच नवल. बाबासाहेबांनी जाणता राजाच्या माध्यमातून शिवचरित्र घरोघरी पोचविलं. महाराष्ट्र, गुजरात राज्यातही त्याचे प्रयोग झाले. पंतप्रधान नरेंद्रन मोदी यांनी तर जाणता राजाचा प्रयोग पाहण्यासाठी पुण्यात हजेरी लावली होती. बाबासाहेबांनी एका व्याख्यानात सांगितलं होतं, की शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी गेले, तिथं तिथं आपण गेलो होतो. फक्त एकच ठिकाण राहिलं, ते म्हणजे स्वर्ग.
शिवाजी महाराजांचा इतिहास सणावळीसह लोकांसमोर उभा करण्याचं कसब फक्त सेतू माधवराव पगडी आणि बाबासाहेबांकडं होतं. ‘राजाशिवछत्रपती’ या बाबासाहेब लिखित शिवचरित्राच्या लाखो प्रति महाराष्ट्र आणि भारतभर घराघरात पोहोचल्या आहेत. शिवप्रभूंना निरस अशा सनसनावळ्यांतून बाहेर काढत लोकांच्या मनात इतिहासाविषयी प्रेम निर्माण करण्याचं श्रेय बाबासाहेबांना जातं. राजाशिवछत्रपती पूर्वी बाबासाहेबांचं शिवचरित्र लेखमालेच्या रूपात प्रसिद्ध होत असे, तेव्हाही ते संशोधकी बाजाचं असल्यानं फारसं जनमानसात पोहोचत नव्हतं. अखेरीस, पु. लं. किंवा गो.नि.दां. म्हणतात तसं बाबासाहेबांनी संशोधकी पेहराव बाजूला ठेऊन लालित्याचं रूप घेतलं, तेव्हा त्याला मिळालेला प्रतिसाद हा न भूतो न भविष्यती असाच होता. राजाशिवछत्रपतीच्या मागची संदर्भग्रंथांची यादी वाचतानाच एखाद्याला दम लागायचा, पण हे सारं साधनग्रंथ तपासून त्यावर आधारित असं हे शिवचरित्र सध्या-सोप्या भाषेत बाबासाहेबांनी मांडलं आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशकं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचं श्रेय जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली आहे. बाबासाहेब आणि शिवचरित्राचं नातं अतूट आहे. शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे, असं बाबासाहेबांनी त्यांचे चरित्रकार सागर देशपांडे यांना सांगितलं होतं. डॉ. देशपांडे यांनी पुरंदरे यांच्यावर ‘बेलभंडारा’ हे पुस्तक लिहिलं आहे. लहानपणी वाढदिवसाला एखादं खेळणं, खाऊ किंवा फार फार तर आवडतं पुस्तक भेट म्हणून मिळावं, म्हणून अनेक जण हट्ट करतात; पण बाबासाहेबांनी आपल्या आठव्या वाढदिवसाला सिंहगड पाहायचा हट्ट धरला होता. तेव्हापासून त्यांचं शिवाजी महाराजांशी नातं जडलं, ते अखेरच्या क्षणापर्यंत राहिलं. त्यांनी आपल्या वडिलांकडून शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्या कथा त्यांच्यासमोर जिवंत झाल्या, अशी आठवण ‘बेलभंडारा’मध्ये आहे. एका मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं, की शाळेत त्यांनी भाषण दिलं होतं. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना छातीशी धरलं आणि म्हटलं, खूप अभ्यास कर आणि खूप मोठा हो.
तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा संदेश आपण आपल्या मनावर कोरला आहे, असं बाबासाहेब सांगायचे.
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेबांवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी त्यांना विरोध करणार्यांनी ’महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू’ असा इशारा दिला होता. बाबासाहेबांनी टीकाकारांना कधीही उत्तर दिलं नाही. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात आले होते. तेव्हापासून अखेररपर्यंत त्यांचं इतिहास संशोधनाचं कार्य अव्याहतपणे सुरू होतं. त्यांनी इतिहास सामान्यांना वाचता येईल, अशा भाषेत लिहिला. इतका अभ्यास आणि विशिष्ट भाषाशैली असलेली काही मोजकी उदाहरणं आहेत. जितका लोक त्यांचा आदर करतात तितका आदर ते लोकांचा करतात. लहान मुलाला देखील ते आहो-जाहो करीत. ’गणगोत’मध्ये पु. ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहितात, कीव इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायची नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. शिवाजी महाराजांसंदर्भात कुठेही आलेला बारीक तपशील त्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या अभ्यासात सातत्य आहे. ते ’हार्ड कोअर’ संशोधक होेते. 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेबांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती. ’दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेबानी मांडला’, हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्या वेळी होता. बाबासाहेबांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठंच घेतलेली नव्हती, असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 10 लाख रकमेपैकी फक्त 10 पैसे स्वतःकडे ठेवून त्यात 15 लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती. त्यावरून त्यांचा निर्मोहीपणा दिसतो.
बाबासाहेबांमुळे इतर लोकांनी वाद केलेले आपल्याला दिसतील. पण, ते स्वतःहून कोणत्या वादात अडकले, असं दिसत नाही. त्यांच्यात एक अलिप्तपणा आहे. स्वतःच्या कार्याकडं ते एका वेगळ्या दृष्टीनं पाहतात असं वाटतं. ते स्वतःच्या कार्याबद्दल ’बेलभंडारा’मध्ये सांगतात, की मी जे काही केलं ते टीपकागदाप्रमाणं आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठंच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यापाड्यातील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण माझं काय आहे? मी टीपकागद आहे. हा माझा विनय नाही प्रामाणिकपणा आहे. पद्मविभूषण मिळाल्यानंतर ते म्हणाले होते, की छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दर्याखोर्या भटकलो, कागदपत्रं गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे. शिवचरित्र हे काय मराठी माणसांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. गेल्या आठ दशकात महाराष्ट्रात आठ पिढ्या बदलल्या असतील तर प्रत्येक पिढी समोर हे शिवचरित्र मांडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आमच्या मनात जे शिवाजी महाराज उभे राहतात, ते बाबासाहेबांनी उभे केलेले शिवाजी महाराज असतात. शिवचरित्र जगणं ही गोष्ट वेगळी. मूर्तिमंत शिवचरित्र बाबासाहेब ते जगले आहेत. मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर रामायण आणि महाभारतातील कथन बरोबरच त्यांनी शिवचरित्राच्या कथा सांगणे गरजेचे आहे हे बाबासाहेबांच्या शिवचरित्रावरील व्याख्यान यामुळे लोकांपर्यंत पोहोचले. बाबासाहेबांनी कथा लिहिलेल्या कादंबर्या लिहिल्या शिवचरित्रावर राजा छत्रपती हे चरित्र लिहिलं, जाणता राजा हे प्रयोग केले. शिवचरित्र या विषयात ते पुरेसे रममाण झाले. शिवाजी महाराजांनी अनेकांना जगण्यासाठी स्फूर्ती दिली, ती घेऊन स्वतःचं जगणं समृद्ध करणारा आणि ते होताना तसंच लोकांचं आयुष्य समृद्ध करणारे बाबासाहेब हे खर्या अर्थानं शिवचरित्र जगले. शिवचरित्र कसं जगायचं याचा वस्तुपाठ सामान्य मराठी माणसाला घालून दिला.

Exit mobile version