पालकमंत्री यांना सर्व पक्षीय नेते मंडळींचा धक्का
। अलिबाग । भारत रांजणकर ।
सध्याच्या निर्माण झालेल्या राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्याची सर्वच आमदारांची मागणी करूनही रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यावर पालकमंत्री अदिती तटकरे मात्र ठाम होत्या. मात्र कृषीवलमधून शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी या निर्णयावर टीका केल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नमते घेत दूरध्वनीवरून सदर बैठक रद्द करण्याची सूचना दिली. त्यानुसार सदर बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी जे.डी. मेहेत्रे यांनी सर्व सदस्यांना कळविली आहे.
सोमवार दिनांक 27 जुन रोजी जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही बैठक पुढे ढकलण्याची मागणी शेकाप आमदार जयंत पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आणि सेनेच्या सहा आमदारांनी केली होती. मात्र कुठल्याही परिस्थितीत ही बैठक होण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे कमालीच्या आग्रही होत्या. त्यासाठी त्या जिल्हा प्रशासनावर दबाव आणत असल्याचे पुढे आले होते.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद यांची मुदत संपलेली असल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्यत्व आपोआप रद्दबातल ठरले आहे. त्यामुळे आता या समितीत पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन, डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे सदस्य तसेच आमदार भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. प्रशांत ठाकूर, आ. रवींद्र पाटील, आ. महेश बालदी तसेच निमंत्रित सदस्य या सभेला उपस्थितीत राहू शकणार होते.
शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या कारवायांमुळे सध्या राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. सरकारचेच भवितव्य अधांतरी आहे. या पार्श्वभूमीवर सध्यातरी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करणे योग्य होणार नाही. अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. प्रशांत ठाकूर, आ. रवींद्र पाटील, आ. महेश बालदी यांची होती. त्याबाबतचे पत्र देखील या आमदारांनी जिल्हा नियोजन अधिकार्यांना दिले होते. मात्र कुठल्याही परिस्थितीत ही बैठक होण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे कमालीच्या आग्रही होत्या. त्यासाठी त्या जिल्हा प्रशासनावर दबाव आणत असल्याचे वृत्त होते. मात्र कृषीवलने या विरोधात आवाज उठवला. तसेच शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी देखील सदर बैठक घेणे चुकीचे असल्याचे मत मांडत बैठक रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सर्व पक्षीय आमदार, खासदार यांच्यापुढे झुकून ही बैठक रद्द करण्याची नामुष्की पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर ओढवली. त्यानुसार आज सदर बैठक रद्द करण्यात आली आहे.
पनवेल मनपा सदस्यांना आमंत्रणच नव्हते
पनवेल मनपा वगळून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाल्याने जिल्हा नियोजन बैठकीत फक्त पनवेल मनपाचे सहा सदस्य उरले आहेत. तथापि या सदस्यांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.