| अलिबाग | वार्ताहर |
गणेशोत्सवापूर्वी वडखळ बायपास सर्व्हिस रोडची दुरुस्ती करावी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा पंधरा दिवसांपूर्वी पत्रकार आणि रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिला होता. तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. दरम्यान, याबाबत कृषीवलने ही बातमी लावून धरल्याने त्यास यश आले असून, या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी आदेश देत या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.अखंड रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. या चळवळीत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे कोकण विभागीय समादेशक डॉ. श्रीकांत पाटील, पत्रकार बळवंत वालेकर, आम्ही पेणकर संस्थेचे चंद्रकांत म्हात्रे, तेजस्विनी फाऊंडेशनच्या संस्थापिका जीविता पाटील, माणूसकी प्रतिष्ठानचे डॉ. हुलवान, आरएसपीचे राज्य कायदेशीर सल्लागार ॲड. के.डी. पाटील, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, ॲड. विकास पाटील, दिलीप पाटील, श्री. निळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील तसेच स्वाभिमानी आगरी ग्रुप, राजिसेनिमुस, वाहतूक सुरक्षा दल, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ, आगरी साहित्य विकास मंडळ, आम्ही पेणकर, तेजस्विनी फाऊंडेशन, माणुसकी प्रतिष्ठान, मॉर्निंग वॉक ग्रुप, इंडियन मेडिकल असोसिएशन, अलिबाग आदी विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला होता.
मात्र, कृषीवलच्या माध्यमातून हे यश आले असून, रोज या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची त्यांच्या वाहनांची पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांतून सुटका झाल्यामुळे प्रवासी कृषीवल आणि सर्व संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धन्यवाद देत आहेत.