| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामातच खताची टंचाई भासत आहे. शेतकऱ्यांना खत कंपनी व्यवस्थापन मागणी केलेल्या युरिया खताचा पुरवठा करत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकांना खताची मात्रा देण्याची कामे खोळंबली होती. मात्र, ‘कृषीवल’ने खताच्या टंचाईचे वृत्त सोमवारी (दि.4) प्रसिद्ध करताच तालुक्यातील विंधणे येथे सोमवारी (दि.5) 25 टन युरिया खताची गाडी उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागाचे एस.जी. गटकळ यांनी दिली. त्याचबरोबर दोन-तीन दिवसात आणखी 50 टन युरिया खत उरणमधील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले. एकंदरीत, कृषीवलच्या वृत्ताचा दणका खत कंपनी व्यवस्थापनाला बसला असून, व्यवस्थापनाने या वृत्ताची दखल घेतली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात सध्या आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील थळ येथे खत निर्मितीसाठी आरसीएफचा कारखाना आहे. मात्र, कारखाना जिल्ह्यात अन् जिल्ह्यातच खताचा तुटवडा, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. उरण तालुक्यात तर ही खताची बोंबाबोंब दरवर्षीच आहे. मात्र, यावर्षी कृषीवलमध्ये खतटंचाईचे वृत्त प्रकाशित होताच आरसीएफ कंपनीने तालुक्यासाठी लागणारा खतपुरवठा केला. रायगड जिल्ह्यातील उरणसारख्या हजारो हेक्टर शेती असलेल्या भागात शेतकऱ्यांना खतासाठी वाट पाहावी लागली होती. ऐन हंगामात उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरीवर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागली. खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात रोपांच्या उत्तम वाढीसाठी शेतकरी खतांचा वापर करतात. मात्र, भात रोपांची वाढ जलद व्हावी, यासाठी देखील या भागात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून ऐकावास मिळत होत्या. तालुक्यात भातलावणीची कामे आता शंभर टक्के पूर्णत्वास गेली आहेत.
यावर्षी पावसाने वेळेपूर्वीच, म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यापाठोपाठ लगेच मान्सूनची हजेरी, त्यामुळे शेतीच्या कामात मोठ्या अडचणी आल्या. शेतकऱ्यांना धूळ वाफ्याची पेरणी करताच आली नसल्यामुळे, येथील शेतकऱ्यांना चिखल पेरा करावा लागला. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार भाताची पेरणी करावी लागली. एकंदरीत, शेतकऱ्यांपुढे निसर्गाचे मोठे आव्हान होते. त्यानंतर भात रोपे तयार झाल्यावर जुलै महिन्याच्या मध्यंतरी भात लावणीला सुरुवात झाली. अशातच शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. मात्र, भातरोपांची कमतरता असल्यामुळे भात खाचरातील शेतकऱ्यांना शेतीची लागवड करण्यासाठी भातरोपे कमी पडली. मात्र अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी कशीबशी भात लावणी पूर्ण केली. दरम्यान काही विरळ प्रमाणात शिल्लक राहिलेल्या आणि आपली शेती ओसाड राहू नये यासाठी अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांनी भाताची रोपे विकत आणून, त्या रोपांची लागवड आपल्या शेतात केली आहे. या भात पिकांच्या भरघोस वाढीसाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला होता. उरण पनवेलमध्ये कुठेही खते उपलब्ध नसल्याची माहिती मिळत असतानाच, कृषीवलच्या वृत्ताच्या दणक्याने उरण तालुक्यासाठी सध्या 50 टन खत उपलब्ध झाले आहे. अजून 50 टन खत उरण तालुक्यासाठी पुरविले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
उरण तालुक्यात सध्या लागवडीखालील क्षेत्रफळ 24.11 हेक्टर आहे. साधारणतः एका हेक्टरला 100 किलो खताची मात्रा द्यावी लागते. परंतु 400 टनपर्यंत खत उरण तालुक्यासाठी पुरेसे असून, काही प्रमाणात खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित खत लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल.
एस.जी. गटकळ,
कृषी विभाग, उरण
आरसीएफ कंपनीकडे खताचा मुबलक साठा आहे. परंतु, जोपर्यंत मागणी होत नाही, तोपर्यंत पुरवठा करता येत नाही. कोणत्या तालुक्यात किती खताची आवश्यकता आहे, ती माहिती पुरविण्याची तसेच आमच्याकडे मागणी करण्याची जबाबदारी संबंधित कृषी विभागाची आहे. त्यांच्याकडून जशी मागणी होईल, तेवढाच पुरवठा आरसीएफ कंपनीकडून करण्यात येईल.
रोहन वर्तक,
वरिष्ठ अभियंता, विपणन विभाग, आरसीएफ







