| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील निजामपूर मस्जिद मोहल्ला येथील खचलेल्या रस्त्याबाबत दैनिक कृषीवल वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल निजामपूर ग्रामपंचायतीने घेऊन या रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे. मोहल्ल्यातील सदर रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थ लियाकत जालगावकर व सहकाऱ्यांनी तसेच जालगावकर कुटुंबीयांनी दैनिक कृषीवल वृत्तपत्राचे मनापासून आभार मानले आहेत.
तालुक्यातील निजामपूर मोहल्ल्यातील खचलेला हा रस्ता रायगडकडे जात असुन या रस्त्याची समस्या अत्यंत बिकट होती. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. शिवाय ही वाहने जालगावकर यांच्या संरक्षक भिंतीला (कंपाऊंड वॉल) घासून जात असल्याने कंपाऊंड वॉलचे नुकसान होण्याची शक्यता होती. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही या जाळ्यांमुळे दुखापत होण्याची शक्यता होती. या प्रश्नाकडे भागातील कोणीच लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ लियाकत जालगावकर यांनी सदर समस्येबाबत ग्रामपंचायतीला जुलै 2025 मध्ये सुरवातीला लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दिला होता. परंतु महिना उलटूनही या समस्येकडे कोणी लक्ष देत नव्हते. या समस्येबाबत जालगावकरांनी प्रसार माध्यमांजवळ संपर्क साधून सदर समस्येबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या बाबतचे वृत्त दैनिक कृषीवलमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल निजामपूर ग्रामपंचायतीने घेऊन मोहल्ल्यातील या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात केली असून लवकरच हे काम मार्गी लागणार आहे.







