। ठाणे । प्रतिनिधी ।
डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असो. आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत सलग दुसर्यांदा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या क्षमा पाटेकरच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा 7 फलंदाज राखून पराभव केला असून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. क्षमा पाटेकरच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे राजावाडी क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्धी संघाचे 186 धावांचे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात 190 धावा करत पार करत विजय निश्चित केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना प्रिशा देवरुखकर, नंदिता त्रिवेदी, क्रितिका यादव आणि अलिना मुल्लाने जबाबदारीपूर्ण फलंदाजी केली. प्रिशाने 44 धावा बनवल्या. नंदिता आणि क्रितीकाने प्रत्येकी 27 धावांची भर टाकली. अलिनाने 22 धावा केल्या. या डावात क्षमाने तीन आणि दिक्षा पवारने दोन फलंदाज बाद केले. माफक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या सलोनी कुष्टेने दोन महत्वपूर्ण भागिदार्या रचत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. अर्धशतकी 66 धावांची खेळी करताना सलोनीने किमया राणेच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी रचली. किमया 27 धावांवर बाद झाल्यावर सलोनीने क्षमाच्या साथीने दुसर्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना क्षमाने नाबाद 55 धावा केल्या. निव्या आंब्रे 10 धावांवर नाबाद राहिली.