‌‘कुछ मिठा हो जाये’….बेस्ट बिफोरचा बोर्ड गायब

नवीन नियम धाब्यावर, ग्राहकराजा जागरुक नसल्याचा परिणाम, कारवाई करण्याची मागणी

| रायगड | खास प्रतिनिधी |

सध्या बाजारात मिळणारी मिठाई, ड्रायफ्रुट यांनाही एक्सपायरी डेट असते याची फारशी माहिती ग्राहकांना नसते अथवा त्याकडे कोणी लक्ष देत नाही. नियमानुसार प्रत्येक मिठाईच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मिठाईसमोर बेस्ट बिफोरचा बोर्ड लावणे बंधणकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश मिठाई दुकानातून बेस्ट बिफोरचे बोर्ड गायब झाले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने अशा दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ड्रायफ्रुट आणि मिठाई खाण्यासाठी एखादा सणच असायला पाहीजे, असा काही नियम नाही. त्यामुळे आजकाल मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. नफेखोरीसाठी भेसळयुक्त दूध, मावा यांची विक्री करण्यात येत असते. याच माव्यापासून विविध प्रकारची मिठाई तयार केली जाते. अन्न व औषध प्रशासनाच्यामार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. परंतु त्यामध्ये सातत्य नसल्याने भेसळ करणाऱ्यांचे चांगलेच फावते.

मिठाईच्या दुकानांमध्ये मिठाई ठेवलेल्या ट्रेच्या समोर बेस्ट बिफोर म्हणजेच ती मिठाई किती दिवसात खावी असे लिहणे बंधणकारक केले आहे. नियम लागू होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, काही मिठाई दुकानदार असे बोर्ड लावण्यास टाळाटाळ करतात आणि खराब झालेली मिठाईची विक्री करतात. मिठाई खराब निघाली, तर ग्राहक तातडीने संबंधीत मिठाई दुकानदारांवर कारवाई करावी, अशी तक्रार करत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सवय ग्राहकांच्या अंगवळणी पडली आहे. मात्र, ते घातक ठरु शकते. खराब मिठाई खाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई कधी तयार केली आहे आणि किती दिवसात ती संपवली पाहिजे, हे पाहणे गरजेचे आहे.

सूचनांचे पालन करा

मिठाई किती दिवसांपर्यंत खाण्यास योग्य आहे, हे सर्व मिठाई विक्रेत्यांनी जाहीर करणे गरजेचे आहे. मिठाई कधी तयार केली आहे, हे सुद्धा दुकानदाराने प्रदर्शित केले पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व मिठाई विक्रेत्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

बेसनापासून तयार मिठाई (10-15 दिवस, बेसन लाडू, बुंदी लाडू म्हैसुरपाक आदी)

दुधापासून बनवलेले मिल्क केक, बर्फी, पेढे-एक दिवस

अधिक साखर टाकलेला पेढा -10 दिवस

खव्यापासून बनवलेले पेढे 6-7 दिवस

ड्रायफ्रुट मिठाई- 7-8 दिवस

मोतीचुर लाडू- 2 दिवस

Exit mobile version