| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील सर्वात उंच असलेले ब्रिशकालीन थंड हवेचे ठिकाण कुडपण बुद्रुक येथे यंदा सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होणार असून यानिमित्त राज्यभरातून असंख्य वारकरी मंडळींची गर्दी उसळणार आहे. मात्र, तत्पूर्वी कुडपण बुद्रुक रस्ता आणि थोरली नदीवरील पुलाच्या दुरूस्तीची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
ब्रिटिशांनी महाबळेश्वर हे हिलस्टेशन विकसित केले त्याच काळात पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक गावाचीही हिलस्टेशन अशी नोंद ब्रिटीशदप्तरी तसेच नकाशामध्ये करून विकसित करण्याचा विचार केला होता. या गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने माजी मंत्री स्व. प्रभाकर मोरे यांच्याप्रमाणेच माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांनी यशस्वी प्रयत्न केले. सद्यःस्थितीत क्षेत्रपाळ या पायथ्याच्या गावापासून थेट कुडपण खुर्द शेलारांच्या कुडपणपर्यंत रस्ता करण्यात आला. मात्र, आता या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे.
कुडपण गावाचे सुपुत्र नायक कृष्णा सोनावणे यांनी ब्रिटीशांच्या बॉईज कंपनीतून सैन्यात प्रवेश घेतल्यानंतर स्वतंत्र भारतातील सेनादलामधून पाकिस्तानी सैन्याची आणि कबाली घुसखोरांची दाणादाण उडविल्याबद्दल त्यांचा महावीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याकाळी जन्मगावी कुडपण येथे सेवानिवृत्तीनंतर राहून उर्वरित आयुष्य कंठणे, तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे केवळ अशक्य असल्याने त्यांनी येथे राहणे टाळले. कुडपण येथील भिमाची काठी या दूर्गम सुळक्यावर चढाईसाठी प्रस्तरारोहक तसेच बर्मा ब्रिज बांधून काही गिर्यारोहकही तीन-तीन दिवसांचे कॅम्प करत असत.अलिकडेच, पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी शेलारमामांची समाधीदेखील असणे, हा निव्वळ कल्पनाविलास असल्याची चर्चा होऊ लागल्याने शेलारांच्या कुडपणची आध्यात्मिक एकजूट पाहता शेलारमामा कुडपणमधील असल्याची आणि त्यांची समाधी आढळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कुडपण बुद्रुक येथील दि. 29 डिसेंबर 2025 ते दि.1 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त येथे चार मोठे प्रशस्त मंडप उभारण्यात येणार असून, वारकरी भाविकांसाठी तंबू उभारून राहण्याची सोयही करण्यात येणार आहे. मात्र, कुडपण ते क्षेत्रपाल रस्त्याची अतिशय बिकट आणि धोकादायक अवस्था तसेच थोरली नदीवरील साकव व बांधाची जीर्णावस्था पाहता वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह कायम राहणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थानिक प्रशासन, तहसीलदार तसेच रायगड जिल्ह्यातील दोन्ही मंत्रीमहोदयांनी तातडीने लक्ष घालून राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
कुडपण बुद्रुक रस्ता अन् थोरली नदी पुलाच्या दुरूस्तीची गरज
