महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत गारद
। पाटणा । प्रतिनिधी ।
हरियाणाने 48व्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग दुसर्यांदा विजेतेपद मिळविले. पाटणा येथील पाटलीपुत्र बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणाने यजमान बिहारचा कडवा प्रतिकार 48-34 असा मोडून काढत ही किमया साधली. सामन्याची सुरुवातच आक्रमक करणार्या हरियाणाने पहिल्या डावातच यजमान संघावर दोन लोण देत 35-12 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसर्या डावात सावध खेळ करीत विजय आपल्या हातून निसटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. दुसर्या डावात अतिसावध खेळणार्या हरियाणाच्या बेसावधपणाचा फायदा घेत बिहारने एक लोण परतवून लावला. तसेच तीन अव्वल (सुपर कॅच) पकड करीत आपली गुणसंख्या वाढविली. पण या जोशपूर्ण खेळाचे विजयात रूपांतर बिहारला करता आले नाही.
सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने अत्यंत कडव्या लढतीत हिमाचल प्रदेशचे आव्हान 44-42 असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. तर यजमान बिहारने बलाढ्य अशा गतउपविजेत्या साईचा प्रतिकार 49-33 असा मोडून काढत पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक दिली. रात्री उशीरा झालेल्या सामन्यात बिहारने महाराष्ट्राला 39-23 असे नमवित महाराष्ट्राचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपविला. मध्यांतराला 13-12 अशी एका गुणाची आघाडी घेणार्या बिहारने मध्यांतरानंतर मात्र जोरदार मुसंडी मारत 16 गुणांच्या फरकाने विजय साकारला. महाराष्ट्राचा बचाव व आक्रमण आज अगदीच दुबळे ठरले.
उपांत्यपूर्व फेरीचे इतर निकाल:- 1) हरियाणा वि वि तेलंगणा- (54-12); 2)हिमाचल प्रदेश वि वि चंदीगड (40-27); 3)साई वि वि पश्रि्चम बंगाल (46-31).