कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

ठाणे संघाचा यशस्वी प्रतिकार

। सांगली । क्रीडा प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने, युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने 51 व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन सांगलीतील सांगलीवाडी येथील चिंचबाग मैदानावर करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत गत विजेत्या पिंपरी-चिंचवडसह अहमदनगर, पुणे ग्रामीण यांनी कुमारी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. ठाणे शहरला मात्र उपांत्य फेरी गाठण्याकरीता 5-5 चढायांच्या डावापर्यंत झुंजाव लागले.

पहिल्या सामन्यांत पिंपरी-चिंचवडने नाशिक ग्रामीणचा 37-19 असा पराभव केला. आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत 23-10 अशी पहिल्या डावात आघाडी घेणार्‍या पिंपरी-चिंचवडने दुसर्‍या डावातदेखील आणखी एक लोण देत सामना आपल्या नावे केला. रुपाली डोंगरे, पूजा तेलंग यांच्या दमदार चढाया त्याला संचिता यादव, भूमिका गोरे यांच्या भक्कम बचावाची मिळालेली साथ यामुळेच पिंपरी-चिंचवड संघाला 18 गुणांच्या फरकाने विजय मिळविता आला. दुसर्‍या सामन्यात अहमदनगरने मुंबई शहर पूर्ववर 45-13 असा सहज विजय मिळविला. पूर्वार्धात 2 लोण देत 23-06 अशी आघाडी घेणार्‍या नगरने उत्तरार्धाच्या खेळात देखील आणखी दोन लोण देत 32 गुणांच्या फरकाने सामना आपल्या खिशात टाकला. वैष्णवी काळे कार्तिकी फडतरे यांच्या झंझावाती खेळामुळे हा मोठा विजय शक्य झाला.

तिसर्‍या सामन्यात पुणे ग्रामीणने जालनाचा दुबळा प्रतिकार 51-13 असा संपविला. मध्यांतरापर्यंत 2 लोण देत 25-08 अशी आघाडी घेत पुणे ग्रामीणने विजयाचा भक्कम पाया रचला. मध्यांतरानंतर आणखी 2 लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वैष्णवी जाधव, साक्षी रावडे यांच्या भन्नाट खेळाला याचे श्रेय जाते. जालनाची मोनिका पवार चमकली. चौथ्या आणि थरारक सामन्यात ठाणे ग्रामीणने 5-5 चढायांच्या डावात परभणीच्या कडवा प्रतिकार 38-34 असा मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात 10-18 अशा गुणांनी पिछाडीवर पडलेल्या ठाण्याने पूर्ण डावात परभणीला 29-29 असे रोखले. नंतर 5-5 चढायात 9 गुण घेत बाजी मारली. परभणीने दुसर्‍या डावात लोण देत व पूर्ण डावात 4 बोनस करीत शर्थीचे लढत दिली. ठाण्याने पूर्ण डावात 11 बोनस गुणाची कमाई करीत सामन्यात बरोबरी साधली. वेदिका वावेकर, ऐश्‍वर्या राऊत यांच्या जोशपूर्ण खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत पिंपरी-चिंचवड वि. मुंबई शहर पश्‍चिम 34-24, नाशिक ग्रामीण वि. नंदुरबार 39-37, अहमदनगर वि. पुणे शहर 35-34, मुंबई शहर पूर्व वि. मुंबई उपनगर पूर्व 23-21, पुणे ग्रामीण वि. रायगड 49-12, जालना वि. सांगली 39-37, ठाणे शहर वि. पारघर 42-39, परभणी वि. कोल्हापूर 31-24 हे संघ विजयी झाले आहेत.

Exit mobile version